बुद्धीदात्या, संकट निवार !

आज श्री गणेशचतुर्थी ! घरोघरी गणरायाचे आगमन होईल.

जो तो आपापल्या भावाप्रमाणे पूजाअर्चा करील. आपापले मनोरथ पूर्ण होण्यासाठी ईश्‍वरासमोर हात जोडणे, हा हिंदूंच्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे. ‘श्रद्धेने केलेली याचना ईश्‍वर पूर्ण करतोच’, याची अनुभूती सहस्रो वर्षे प्रत्येक हिंदू घेत आला आहे. श्री गणेश हे तर प्रतिवर्षी घरोघरी येऊन आनंदाची उधळण करणारे बाप्पा आहेत. अशा वेळी प्रत्येकाने आपले व्यक्तीगत मनोरथ सांगण्यासह घोर संकटात सापडलेल्या हिंदु समाजालाही संकटमुक्त करण्यासाठी प्रार्थना करणे, ही खरी काळानुसार गणेशभक्ती आहे !

बुद्धीवादाचे संकट !

श्री गणेश बुद्धीदाता आहे. शुभकार्यारंभी ज्याप्रमाणे गणेशपूजन केले जाते, त्याचप्रमाणे विद्याभ्यासारंभीही बुद्धीदात्या गणेशाची पूजा केली जाते. श्री गणेशाची अनेक कार्यवैशिष्ट्ये असली, तरी ‘बुद्धीदाता’ हे येथे विशद करण्याचे कारण म्हणजे आज राष्ट्र आणि धर्म यांवर बुद्धीप्रामाण्यवादी आणि बुद्धीच्या अहंगंडाने पछाडलेले, अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले (अ)विचारवंत यांचे संकट उभे ठाकले आहे. पुरोगामी म्हणवणारा हा कंपू हिंदूंच्या सहस्रो वर्षांपासून चालत आलेल्या श्रद्धांचे भंजन करण्यासाठी आकाश-पाताळ एक करत आहे. त्याला वैज्ञानिक जाणिवांचे ‘लेबल’ लावून हिंदूंना ‘अवैज्ञानिक’ अथवा ‘विज्ञानविरोधी’ ठरवले जात आहे. विदेशींचा उदोउदो करून ‘हिंदु धर्म आणि पर्यायाने हिंदूंचा देश असलेला भारत किती मागास आणि बुरसटलेला आहे’, हे भारतियांवर थोपवण्यासाठी जोरदार प्रयत्न चालू आहेत. हिंदूंचे सण आले की, या बुद्धीवाद्यांना अधिकच चेव येतो. गणेशोत्सवातही ‘नद्यांचे प्रदूषण होते’ असे खोटे कारण सांगून मूर्तीदानाची धर्मविरोधी कृती करण्यास बाध्य करणे, झाडांच्या बियांपासून मूर्ती बनवून विसर्जनानंतर त्यातून रोप उगवेल, अशी व्यवस्था करणे, डाळी, बिस्किटे, वैद्यकीय कचरा (उदा., रिकाम्या सलाईनच्या बाटल्या, सिरींज) आदींपासून श्री गणेशमूर्ती साकारणे, असे हिंदूंचा बुद्धीभेद करण्याचे प्रकार गेल्या मासाभरापासून अल्प-अधिक प्रमाणात चालू आहेत. हिंदूंच्या सर्वच सणावारी असे धर्मविरोधी अपप्रकार चालू असतात. हे आता केवळ सण-समारंभापुरते मर्यादित न रहता हा बुद्धीभेद आता वर्षभर चालू असतो. ‘खोटे बोल; पण रेटून बोल’ अशी नीती वापरून चुकीचे विचार लादले जात आहेत. सामाजिक वातावरण इतके धर्मविरोधी बनले आहे की, कुणी साधा टिळा जरी लावला, तरी तो कट्टरवादी हिंदू ठरतो. काही कारण नसतांना मोठे हिंदूविरोधी षड़्यंत्र रचले जात आहे. हिंदूंना आतंकवादासारख्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये गोवून ‘भगवा आतंकवाद’ सिद्ध करण्याची धडपड केली जात आहे. प्रसारमाध्यमे अन् सामाजिक माध्यमे यांतून हिंदू कसे कट्टरवादी बनत चालले आहेत आणि त्यांनी धर्मनिरपेक्ष म्हणजे (आपल्या भाषेत षंढ) राहिले पाहिजे, याविषयी उपदेशाचे डोस पाजले जात आहेत. त्यासह विदेशींचे खाणे-पिणे-वावरणे यांची रसभरित वर्णने करून हिंदू कसे बुरसटलेले आहेत, याविषयी ‘ब्रेन वॉश’ केले जात आहे. आता हिंदूंच्या बुद्धीची सर्वत्र कसोटी लागली आहे. धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामित्व यांच्या आडून हिंदु धर्म संपवण्याचे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी हिंदूंना वैचारिक पातळीवर मोठा लढा द्यावा लागत आहे.

पूर्वीच्या काळी शरीरिक स्तरावरील युद्ध होत असे. आता कालानुसार त्याचे स्वरूप पालटले आहे. आता धर्म-अधर्म लढा वैचारिक आणि बौद्धिक पातळीवर आला आहे. हे छूपे आक्रमण आहे. शत्रू शस्त्रे घेऊन आला, तर ‘तो शत्रू आहे. त्यापासून दूर रहायला पाहिजे’, हे लक्षात तरी येते. गोड भाषा, फसवी उदाहरणे, सुधारलेपनाचा आव आणि नसलेल्या राष्ट्रभक्तीचा बाऊ केला की, ‘सामान्य हिंदू सहज जाळयात अडकतो’, हे या बौद्धिक आक्रमकांनी हेरले आहे. त्यामुळे व्यवस्थेच्या विरुद्ध लढा देण्याच्या नावाखाली नक्षलवाद पोसणे, त्याचे समर्थन करणार्‍यांना ‘विचारवंत’ म्हणून सामाजिक सहानुभूती मिळवून देणे, आतंकवाद्यांना पाठीशी घालणे, त्यांच्या कुटुंबियाना भेटून आर्थिक साहाय्य देणे आदी प्रकारही आता होऊ लागले आहेत. यविरुद्ध बोलणारे मूलतत्त्ववादी ठरतात; कारण या राष्ट्रविरोधी कृत्यांचे समर्थन करण्यासाठी पुरोगामी (अ)विचारवंतांची फौज सिद्ध असते. असहिष्णुतेचा बगुलबुवा करून केवळ हिंदूनाच नव्हे, तर भारतियांना न्यून लेखणे, प्रसारमाध्यमांचा वापर करून २४ घंटे हिंदूविरोधी विचार पसरवणे, हेही याच (अ)विचारवंतांनी हिंदूंच्या दिशेने सोडलेले पिल्लू आहे.

अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करून सत्तासोपान चढणारे राजकारणी, अल्पसंख्यांकांचा विकास करण्याच्या नावाखाली धर्मांतर आणि राष्ट्रविरोधी कारवाया करण्यासाठी विदेशी निधी मिळवणार्‍या तथाकथित समाजसेवी संघटना आणि ‘स्वतः फार पुढारलेले आहोत’, याचा दिखावा करण्यासाठी जाणीवपूर्वक धर्मविरोधी कृत्य करणारे पुरोगामी याच माळेतील पुढचे मणी आहेत.

मोठे आव्हान !

या बुद्धीभेद्यांच्या तावडीतून केवळ धर्मच नाही, तर राष्ट्रही सोडवणे आणि हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांची बुद्धी सात्त्वि करणे, हेच आता धर्मप्रेमींसमोरील मोठे आव्हान आहे. त्यामुळेच या बौद्धिक आणि वैचारिक आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आणि हिंदूंचा बुद्धीभेद करण्याचे षड्यंत्र उलथवून लावण्यासाठी त्या बुद्धीदात्याला शरण जाणे प्रत्येक धर्मप्रेमीचे कर्तव्य आहे. राष्ट्र आणि धर्म यांवर घोंगावणारे हे बुद्धीप्रामाण्यवादाचे संकट सरून ‘हिंदूंना चांगली बुद्धी द्यावी’, अशी त्या बुद्धीदात्या गणेशाच्या चरणी प्रार्थना !!


Multi Language |Offline reading | PDF