पोलिसांनी चौकशीसाठी किंवा अन्य कारणांसाठी पोलीस ठाण्यात बोलावल्यास काय करावे ?

सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना सूचना

सध्या विविध प्रकरणांमध्ये सनातनचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी यांच्या मागे पोलिसांकडून चौकशीचा ससेमिरा चालू आहे. या चौकशीसाठी किंवा अन्य कारणांमुळे पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलावल्यास कोणती कृती करावी, याविषयी येथे माहिती देत आहोत.

१. पोलिसांना स्वतःची ओळख सांगणे

पोलिसांनी साधकाला ओळख विचारल्यास स्वतःची ओळख सांगणे, हे आपले कर्तव्य आहे.

२. पोलिसांनी लेखी न कळवता दूरभाषद्वारे अथवा अन्य माध्यमातून संपर्क करून पोलीस ठाण्यात येण्यास सांगणे

पोलिसांनी लेखी न कळवता दूरभाषद्वारे अथवा इतर कोणत्याही माध्यमातून संपर्क करून पोलीस ठाण्यात येण्यास सांगितल्यास साधकांनी गोंधळून जाऊ नये. साधकांनी शांतपणे संबंधित पोलिसाला त्याचे नाव आणि ते कोणत्या पोलीस ठाण्यातून बोलत आहेत, हे प्रथम विचारून घ्यावे. त्यानंतर कोणत्या कारणासाठी पोलीस ठाण्यामध्ये बोलावले आहे, हे विचारावे. पोलिसाने सांगितलेले कारण अपुरे असल्यास किंवा कारण सांगण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्यास त्यांना लेखी सूचना देण्याविषयी विनंती करावी. लेखी सूचना देण्याचे पोलिसांनी टाळल्यास पोलीस ठाण्यामध्ये जाणे नागरिकांवर बंधनकारक नाही.

३. शारीरिक समस्या, एखादे महत्त्वाचे काम किंवा बाहेरगावी जायचे असल्यास, तसेच अन्य कारणांमुळे पोलीस ठाण्यात जाणे शक्य नसल्यास तशी कल्पना पोलिसांना देणे

शारीरिक समस्या, एखादे महत्त्वाचे काम, बाहेरगावी जायचे असल्यास किंवा अन्य कारणांमुळे पोलीस ठाण्यात जाणे शक्य नसल्यास तशी कल्पना पोलिसांना द्यावी. शक्य असल्यास लेखी कळवावे. पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलावले; म्हणून स्वतःचे एखादे महत्त्वाचे काम करण्याचे टाळू नये. अगदीच महत्त्वाचे असल्यास पोलीस घरी येऊनही माहिती घेऊ शकतात.

४. पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १६० अन्वये उपस्थित रहाण्याचे आदेश दिल्यास पोलीस ठाण्यात जाणे बंधनकारक असणे

पोलीस फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १६० अन्वये आदेश देऊन पोलीस ठाण्यात उपस्थित (हजर) रहाण्याचा आदेश देऊ शकतात. हा आदेश लेखी असतो. या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे अन्यथा आपल्यावर फौजदारी कारवाई केली जाऊ शकतेे (उपरोक्त सूत्रे गृहीत धरून हा न्याय लागू होतो.); परंतु याला पुढील दोन अपवाद आहेत.

४ अ. पंधरा वर्षांखालील पुरुष

४ आ. कोणत्याही वयाची स्त्री. तिला तिच्या रहात्या घरीच उपस्थित रहाण्यास सांगितले जाते.

५. पोलीस ठाण्यात नाहक ताटकळत बसवणे, हा गुन्हा असणे

पोलीस कोणालाही उगाचच पोलीस ठाण्यात ताटकळत बसवून ठेवू शकत नाहीत. सर्वसाधारणपणे होणारा विलंब लक्षात घेऊन नंतर आपण पोलीस ठाण्यातून निघून येऊ शकतो. लेखी सूचना दिल्याशिवाय पोलीस कुणाला प्रतिबंध करू शकत नाहीत. औपचारिक अटक न करता तुमच्या इच्छेच्या विरोधात पोलीस ठाण्यात ताटकळत बसवून ठेवणे, हा गंभीर गुन्हा आहे. नाहक बसवून ठेवल्यास वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडे किंवा अधिकारक्षेत्रातील न्यायालयात तक्रार करता येते.

५ अ.  पोलिसांनी अटक केल्यास किंवा पोलीस ठाण्यात बसवून ठेवल्यास त्याची कल्पना नातेवाइकांना देण्याचा अधिकार संबंधित व्यक्तीला असणे

पोलिसांनी अटक केल्यास किंवा पोलीस ठाण्यात बसवून ठेवल्यास त्याची कल्पना नातेवाइकांना देण्याचा अधिकार संबंधित व्यक्तीला आहे. अटक केल्यास त्या अटकेमागील कारण सांगणे, हे पोलिसांचे दायित्व आहे. पोलिसांकडे जबाब नोंदवण्यापूर्वी अधिवक्त्यांचा सल्ला घेणे, हा संबंधित व्यक्तीचा अधिकार आहे.

५ आ. पोलिसांनी एखाद्या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यास किंवा अटक केल्यास त्या व्यक्तीला मारहाण करण्याचा अधिकार पोलिसांना नसणे

पोलिसांनी एखाद्या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यास किंवा अटक केल्यास त्याला पोलीस मारहाण करू शकत नाहीत. तसे केल्यास संबंधित व्यक्ती त्याची तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडे किंवा अधिकारक्षेत्रातील न्यायालयात करू शकतो. (अशा प्रसंगात संबंधित व्यक्तीने पोलीस अधिकार्‍याशी उद्धटपणे बोलणे कटाक्षाने टाळावे. त्यामुळे शासकीय कामकाजात अडथळे आणला; म्हणून पोलीस संबंधित व्यक्तीच्या विरोधात खोटा खटला दाखल करू शकतात)

 

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now