अध्यात्मशास्त्रदृष्ट्या श्री गणेशमूर्ती मातीची असावी !

श्री गणेशचतुर्थीला गणेशाचे पूजन करण्यासाठी आणायची मूर्ती कशापासून बनवलेली असावी, यासंबंधी गेल्या काही वर्षांत उलटसुलट सांगितले जात आहे. सामान्य गणेशभक्ताला यासंबंधी त्याने ‘नेमके काय करावे आणि काय करू नये’, हे लक्षात येत नाही. येथे लक्षात ठेवण्यासारखे सूत्र म्हणजे जेव्हा धार्मिक कृतीविषयी काही नवे सूत्र मांडण्यात येत असते, तेव्हा सर्वप्रथम ‘धर्मशास्त्र काय सांगते’, याचा अभ्यास करायला हवा.

१. धर्मशास्त्रानुसार गणेशमूर्ती कशापासून बनवलेली असावी ?

स्कंद पुराणामध्ये श्रीकृष्णाने धर्मराजाला ‘सिद्धीविनायक व्रत’ करण्यास सांगितले आहे. तेथे ‘मूर्ती कशी असावी ?’ याचे सविस्तर वर्णन आले आहे. ते असे आहे.

स्वशक्त्या गणनाथस्य स्वर्णरौप्यमयाकृतिम् । अथवा

मृण्मयी कार्या वित्तशाठ्यंं न कारयेत् ॥ – स्कंदपुराण

भावार्थ : या म्हणजे सिद्धीविनायकाच्या पूजेसाठी स्वतःच्या ऐपतीप्रमाणे सोने, रूपे म्हणजे चांदी अथवा माती यांची मूर्ती बनवावी. यामध्ये कंजूषपणा करू नये.

यावरून स्पष्ट होते की, ‘धर्मशास्त्रामध्ये सोने, चांदी अथवा माती यांपासूनच मूर्ती बनवावी’, असा स्पष्ट उल्लेख असल्याने या व्यतिरिक्त अन्य वस्तूंपासून मूर्ती बनवणे, शास्त्रानुसार अयोग्य आहे. येथे ‘व्यावहारिकदृष्ट्या मातीपासून मूर्ती बनवण्याचा एकच पर्याय दिला आहे’, हे स्पष्ट आहे.

‘धर्मसिंधू’ नामक ग्रंथातही ‘विनायकाच्या व्रतासाठी मृण्मयी म्हणजे मातीची मूर्ती बनवावी’, असे सांगितले आहे. अध्यात्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती चिकण मातीपासून अथवा शाडूच्या मातीपासून बनवलेली असावी. ती नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी. त्यामुळे श्री गणेशाची स्पंदने मूर्तीकडे मोठ्या प्रमाणात आकृष्ट होतात. त्याचा आध्यात्मिक दृष्टीकोनातून लाभ होतो. तसेच मूर्तीमुळे प्रदूषण होत नाही. अध्यात्मशास्त्रानुसार केलेली कुठलीही गोष्ट ही निसर्गाच्या जवळ जाणारी, म्हणजे पर्यावरणपूरकच असते.

२. गोमयापासून म्हणजे गाईच्या शेणापासून बनवलेली श्री गणेशमूर्ती वापरणे अयोग्य का ?

सामाजिक प्रसारमाध्यमांवर (‘सोशल मीडिया’वर) काही जणांकडून गणेशोत्सवात ‘गोमय गणेशमूर्ती’ बनवण्याविषयी मोठ्या प्रमाणात प्रसार केला जातो. ‘गोमयापासून म्हणजे गायीच्या शेणापासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तीचे पूजन केल्यास लवकर शुभ फलप्राप्ती होते. माती आणि गोमय यांच्यापासून बनवलेल्या मूर्तीमध्ये पंचतत्त्व वास करते’, असेही त्यात सांगितले जाते. मात्र गोमय आणि गोमूत्र यांपासून बनवलेली श्री गणेशमूर्ती अशास्त्रीय आहे.

गोमय किंवा गोमूत्र यांमध्ये मुळातच गोमातेचे तत्त्व असते. शास्त्रानुसार एखाद्या वस्तूमध्ये एखादे तत्त्व असेल, तर तिथे दुसरे तत्त्व येत नाही. त्यामुळे गोमातेचे तत्त्व निसर्गत: असलेल्या गोमयात गणेशतत्त्व आकर्षिले जाऊ शकत नाही. त्यामुळे गोमयापासून बनविलेली मूर्ती पूजेसाठी वापरणे, हे अशास्त्रीय आहे तसेच अध्यात्मशास्त्रदृष्ट्या लाभकारकही नाही.

३. ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’पासून बनवलेली मूर्ती वापरू नये !

महाराष्ट्रासारख्या काही राज्यांत प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेली मूर्ती वापरण्याची पद्धत गेल्या काही दशकांत पडलेली आहे. अशी मूर्ती तिच्यापासून आध्यात्मिक लाभ होत नसल्याने वापरू नये. येथे आवर्जून नोंद करण्याची गोष्ट म्हणजे गोवा राज्यात मात्र प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेल्या मूर्ती वापरण्यावर बंदी असून केवळ मातीच्याच मूर्ती वापरण्याचा शासकीय आदेश आहे.

श्री गणेशचतुर्थीला गणेशाचे पूजन करण्यासाठी आणावयाची मूर्ती एक ते दीड फूट उंच असावी, ती पाटावर बसलेली असावी. मूर्ती डाव्या सोंडेची असावी.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्री गणपति’ आणि सनातन-निर्मित ‘श्री गणेशचतुर्थी आणि श्री गणेश उपासना’ हा दृकश्राव्य लघुपट)


Multi Language |Offline reading | PDF