अटकेत असलेल्या हिंदुत्वनिष्ठ तरुणांचा पोलीस अधिकार्‍यांकडून अमानुष छळ, तसेच अश्‍लील भाषेचा वापर !

अटकेतील हिंदुत्वनिष्ठांवर होणार्‍या अमानुष अत्याचारांना हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी वाचा फोडली !

डावीकडून अधिवक्ता धर्मराज चंडेल आणि बोलतांना अधिवक्ता संजीव पुनाळेकर

मुंबई – नालासोपारा येथे कथित स्फोटके सापडल्याच्या प्रकरणानंतर अटक करण्यात आलेल्या अन्य हिंदुत्वनिष्ठांचा पोलीस कोठडीत अन्वेषण यंत्रणांच्या पोलीस अधिकर्‍यांकडून अमानुष शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असून त्यांच्या पत्नीवर अत्याचार करण्याची अश्‍लाघ्य भाषाही त्या विकृत अधिकार्‍यांकडून केली जात आहे, तसेच त्या अधिकार्‍यांना मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा असून उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीही त्यांच्या कह्यात आहेत, असेही त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे, असा आरोप नालासोपारा प्रकरणी अटकेत असलेल्या संशयित आरोपींचे अधिवक्ता आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव श्री. संजीव पुनाळेकर यांनी केला. मुंबई मराठी पत्रकारसंघात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ९ सप्टेंबर या दिवशी त्यांच्या अधिवक्त्यांनी या आरोपींची भेट घेतली, त्या वेळी आम्हाला वरील अत्यंत धक्कादायक माहिती मिळाली, असे हिंदु विधीज्ञ परिषदेने या वेळी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. या पत्रकार परिषदेला हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता धर्मराज चंडेल आणि अन्य अधिवक्ते उपस्थित होते. ‘या प्रकरणाची तक्रार गृहमंत्री असणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, तसेच पंतप्रधान कार्यालय यांच्याकडे पाठवली आहे’, असेही अधिवक्ता पुनाळेकर यांनी या वेळी सांगितले.

या वेळी अधिवक्ता पुनाळेकर यांनी मांडलेली सूत्रे

१. श्री. राजेश बंगेरा आणि श्री. अमोल काळे यांना कोल्हापूर एस्.आय.टी.तील (विशेष अन्वेषण पथकातील) पोलीस अधीक्षक दर्जाच्या एका अधिकार्‍याने बेलापूर येथील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या कार्यालयात घुसून अमानुष मारहाण केली आणि ‘कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील सहभागाची स्वीकृती न दिल्यास यापेक्षा गंभीर छळाला तोंड द्यावे लागेल. आम्ही तुमचा लवकरच ताबा घेऊ’, अशी धमकीही दिली. कॉ. पानसरे हत्याप्रकरणी न्यायालयाकडून अधिकृतपणे कोठडी घेतलेली नसतांना कोल्हापूर तपास पथकातील पोलीस अधिकार्‍यांनी अशी बेकायदेशीरपणे मारहाण केली, हे अत्यंत गंभीर आहे.

२. १० सप्टेंबर या दिवशी सध्या न्यायालयीन कोठडीत असणारे श्री. सचिन अंधुरे यांची त्याच्या अधिवक्त्यांनी भेट घेतली असता महाराष्ट्र शासनाच्या याच अधिकार्‍याने वरिष्ठ पोलीस अधिकारी नंदकुमार नायर यांच्या उपस्थितीत अत्यंत हिंस्रपणे श्री. सचिन अंधुरे यांना मारहाण केली होती, असे समजले.

३. नंदकुमार नायर या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सी.बी.आय.च्या) पश्‍चिम भारत शाखेचे प्रमुखपद भुषवणार्‍या अधिकार्‍यानी सुद्धा श्री. सचिन यांना मारहाण केली आणि ‘अमोल काळे अन् डॉ. वीरेंद्र तावडे यांनी तुझ्या बायकोचा उपभोग घेतल्याचे कबूल केले आहे’, अशा आशयाची अत्यंत गलीच्छ भाषा वापरली.

४. नंदकुमार नायर यांनी ‘तुझा बचाव करणार्‍या वकिलांचेच नाव खुनाचा सूत्रधार म्हणून सांगून टाक’, असे म्हणत सचिन अंधुरे यांच्यावर प्रचंड दबाव आणला. ‘तुझ्या बायकोवर बलात्कार करीन’, अशी धमकीही नायर यांनी दिली. ‘आता कबुली दिली नाहीस, तर कोल्हापूर पोलिसांच्या कोठडीत गेल्यावर तुला कल्पनाही येणार नाही, असा तुझा छळ करू’, अशीही धमकी नंदकुमार नायर आणि महाराष्ट्र पोलीस दलातील हिरवट निळे डोळे असणार्‍या अधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍याने सचिन अंधुरे यांना दिली.

५. सर्वांत खेदाची गोष्ट अशी की, हे दोन्ही अधिकारी ‘आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आहे आणि उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आमच्या खिशात आहेत’, अशी आक्षेपार्ह भाषा वापरत होते.

पत्रकार परिषदेचे ‘फेसबूक’वरील थेट प्रक्षेपण ३ सहस्र २०० जणांनी पाहिले !

या पत्रकार परिषदेचे ‘फेसबूक’ या सामाजिक माध्यमातून करण्यात आलेले थेट प्रक्षेपण ३ सहस्र २०० जणांनी पाहिले. १२ सहस्र ६११ जणांपर्यंत हे प्रक्षेपण पोहोचले, तर  ७९१ जणांनी ते ‘शेअर’ केले. त्याला २२० जणांनी पसंती (लाईक) दिली.

आरोपींना छळणार्‍या पोलीस अधिकार्‍यांची नार्को चाचणी करा !

आरोपींच्या छळवणुकीच्या संदर्भात केलेल्या तक्रारीच्या पडताळणीसाठी आरोपींसमवेत संबंधित पोलीस अधिकार्‍यांची नार्को चाचणी करावी आणि वेळ पडल्यास आरोपींच्या अधिवक्त्यांचीही नार्को चाचणी करावी, अशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी या पत्रकार परिषदेत केली.

जनतेचा पैसा खाऊन हिंदूंविषयी द्वेष पसरवणे, हिंदूंवर अत्याचार करणे आणि हिंदुत्वासाठी काम करणार्‍या निष्पाप हिंदु युवकांना नाहक छळणे, असे कार्य हिंदुद्वेषी विचारसरणी बाळगणारे अधिकारी सत्ताधारी पक्षाच्या आड दडून कसे करत आहेत, हेही जनतेसमोर येईल. मुख्यमंत्र्यांनी या अतिशय गंभीर अशा तक्रारीची त्वरित नोंद घ्यावी, संबंधित पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करावी आणि नालासोपारा, कोल्हापूर, सातारा, पुणे, ठाणे, संभाजीनगर, गोवा अशा अनेक ठिकाणी संघटित होऊन मोर्चे काढणार्‍या हिंदूंना मुख्यमंत्री आणि संबंधित पोलीस अधिकारी यांची कार्यालये यांवर मोेर्चा घेऊन जाण्याची पाळी येऊ देऊ नये, असे हिंदु विधीज्ञ परिषदेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात अधिवक्ता पुनाळेकर यांनी म्हटले आहे.


Multi Language |Offline reading | PDF