श्री गणेशचतुर्थी आणि हरितालिका व्रत यांच्यासंदर्भात करावयाच्या शास्त्रोक्त कृती !

गणेशोत्सव : धर्मशास्त्रासह अन्य वैशिष्ट्यपूर्ण माहिती !

समस्त हिंदूंचे आराध्य दैवत श्री गणपति ! गणेशोत्सवाची चाहूल लागताच गणरायाचे स्वागत करण्यासाठी आपण एकत्रितपणे सिद्धतेला लागतो. आपले आराध्य देवतेचे कार्य कोणते, त्याचे आपल्या जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व आदी सूत्रांसंदर्भात धर्मशास्त्रीय माहिती मिळाल्यास देवतेप्रती आपला भक्तीभाव वृद्धींगत होण्यास साहाय्य होते. या पार्श्‍वभूमीवर प्रतिदिन श्री गणेशासंदर्भातील धर्मशास्त्रीय तसेच अन्य वैशिष्ट्यपूर्ण माहिती आमच्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

१. श्री गणेशमूर्ती घरी आणणे

श्री गणेशचतुर्थीसाठी श्री गणेशाची मूर्ती घरी आणणे, ही या सणातील एक महत्त्वाची कृती आहे. येथे मूर्ती आणणार्‍यांनी ‘केवळ काही दिवसांसाठी घरी येणार्‍या अतिथीला आणत आहोत’ एवढाच विचार न ठेवता ‘प्रत्यक्ष देवतेला घरी आणत आहोत’, असा भाव ठेवून त्या संबंधीच्या सर्व कृती करायला हव्यात. या कृती अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य, म्हणजेच उपासकाला पोषक आणि सर्वांना आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक अशा असाव्यात. यासाठी या कृती नीट समजून घेऊन त्याप्रमाणे करणे महत्त्वाचे आहे.

जी व्यक्ती मूर्ती आपल्या हातात धरणार आहे, तिने टोपी घालणे आवश्यक आहे. श्री गणेशमूर्ती आणतांना ती पाटावर ठेवावी. मूर्तीचे मुख मूर्ती हातात धरणार्‍याच्या दिशेने ठेवावे. मूर्ती स्वच्छ रेशमी अथवा सुती वस्त्राने झाकावी. मूर्ती घराकडे नेतांना वाटेत श्री गणेशाचा जयजयकार करावा. घराच्या दारात पोहोचल्यानंतर मूर्तीचे मुख घराच्या दिशेने करून मूर्तीवरील वस्त्र बाजूला करावे. त्यानंतर ज्याच्या हातात मूर्ती आहे, त्याच्या पायांवर घरातील सुवासिनी स्त्रीने पाणी घालावे. नंतर दूध घालावे. त्यानंतर मूर्तीचे औक्षण करावे. मूर्तीला तिच्या नियोजित स्थानी ठेवण्याआधी तेथे थोडे तांदूळ घालावेत. त्यावर मूर्ती ठेवावी.

२. श्री गणेशमूर्ती तांदुळाच्या राशीवर ठेवण्यामुळे होणारे आध्यात्मिक स्तरावरील लाभ

श्री गणेशाचे पूजन केल्याने गणेशतत्त्व मूर्तीमध्ये आकृष्ट होते. त्यामुळे गणेशतत्त्वाने संपूर्ण मूर्ती भारित होते. गणेशतत्त्व मूर्तीमध्ये साठून रहाते. गणेशतत्त्व वलयांच्या रूपात मूर्तीमधून वातावरणात प्रक्षेपित होते. मूर्ती भारित झाल्याने मूर्तीच्या खाली असलेले तांदुळाचे दाणेही गणेशतत्त्वाने भारित होतात.ज्या तांदुळावर

श्री गणेशमूर्ती ठेवली आहे, त्यांच्यामध्ये गणेशाची स्पंदने येतात. जवळ असणार्‍या दोन तंबोर्‍यांच्या समान कंपनसंख्या असणार्‍या तारांपैकी एक छेडली असता दुसर्‍या तंबोर्‍याच्या तारेमध्येही तेच कंपन जसे निर्माण होते, त्याच प्रकारे घरातील तांदुळाच्या साठ्यांमध्येही ज्या तांदुळावर श्री गणेशमूर्ती ठेवली आहे, तिच्यात निर्माण झालेली गणेशाची स्पंदने निर्माण होतात. शेवटच्या दिवशी विसर्जनापूर्वीची उत्तरपूजा झाल्यानंतर मूर्तीच्या खाली असणारे तांदूळ घरातील तांदुळाच्या साठ्यामध्ये मिसळावेत. त्यामुळे गणेशाच्या स्पंदनांचा लाभ त्या दाण्यांद्वारे आपल्याला वर्षभर होतो.

३. मूर्ती घरी आणल्यानंतर घ्यावयाची दक्षता

बर्‍याच ठिकाणी श्री गणेशमूर्ती आदल्या दिवशीच घरी आणतात. अशा वेळी जरी त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली नसली, तरी घरातील वातावरण, मूर्ती असलेल्या खोलीतील वातावरण चांगले सात्त्विक कसे राहील, याकडे लक्ष द्यावे. अन्यथा आपले वर्तन नेहमीसारखेच राहिले असेल, तर ते कोणती तरी एक वस्तू घरात आणल्यासारखे होईल. श्री गणेशचतुर्थीच्या दिवशीच मूर्ती घरी आणली असेल, तर पूजेची सिद्धता नीट आहे ना, याकडे लक्ष देणे, घरी श्री गणेशाचा नामजप लावणे असे काही करून वातावरण चांगले राहील, याकडे लक्ष दिले जाऊ शकते.

४. हरितालिका व्रत

भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला येणारी श्री गणेशचतुर्थी कुटुंबातील सर्वजण ‘सण’ म्हणून साजरी करतात. सार्वजनिकरीत्या ती एक ‘उत्सव’ म्हणून साजरी करण्यात येते. असे असले तरी मूलत: ते एक व्रतच आहे. त्याला ‘सिद्धीविनायक व्रत’, असे म्हणतात. या काळात काही अन्य व्रतेही येतात. त्यांतील एक म्हणजे हरितालिका व्रत ! माता पार्वतीने ‘भगवान शिवाची वर रूपाने प्राप्ती व्हावी’ म्हणून हे व्रत केले होते. ‘सुयोग्य पती मिळावा’, यासाठी कुमारिका आणि ‘मिळालेले सौभाग्य अखंड रहावे’, यासाठी विवाहित स्त्रिया हे व्रत करतात. हे व्रत भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीयेच्या दिवशी करतात. या व्रतामध्ये महेश्‍वर म्हणजे भगवान शिव आणि उमा म्हणजे पार्वती यांच्या मूर्तींची स्थापना करून त्यांचे यथाशक्ती पूजन करतात. हरितालिका पूजनासाठी सर्वप्रथम स्त्रिया आचमन, प्राणायाम करून देशकालकथन करतात. त्यानंतर

मम उमामहेश्‍वरसायुज्यसिद्धये हरितालिकाव्रतम् अहं करिष्ये ।

म्हणजे ‘श्री उमामहेश्‍वर यांच्या कृपेने सायुज्य मुक्ती प्राप्त होण्यासाठी मी हे हरितालिका व्रत करत आहे’, असा संकल्प करतात. सायुज्य मुक्ती म्हणजे भगवंताशी एकरूप होणे !

४ अ. हरितालिका व्रतातील भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या मूर्तींची स्थापना अन् त्यांचे पूजन

या दिवशी स्त्रिया नदीच्या अथवा उपलब्धतेनुसार वहात्या अथवा शुद्ध जलस्रोताच्या ठिकाणी जाऊन तेथील वाळू घरी घेऊन येतात. घरात पूजेसाठीच्या चौरंगावर या वाळूची शिवपिंड बनवतात. हल्ली गावांतून आणि मोठ्या शहरांतून शिवलिंगासह देवी पार्वती आणि तिची सखी यांच्या मूर्तीही उपलब्ध असतात. सखी-पार्वतीच्या मूर्ती चौरंगावर स्थापित करून त्यांचे पूजन करतात. हरितालिका पूजनात बेल, आघाडा, पारिजात, करवीर, अशोक अशा सोळा प्रकारच्या पत्री शिवपिंडीवर वाहतात. शिवपिंडीवर स्त्रिया पांढरी फुलेही समर्पित करतात. गूळ-खोबरे, दूध आणि उपलब्धतेनुसार फळे यांचा नैवेद्य दाखवतात. नंतर देवी हरितालिकेची आरती करतात. हरितालिका पूजन झाल्यावर स्त्रिया भावपूर्ण प्रार्थना करतात. या दिवशी पूजेच्या वेळी प्रज्वलित केलेला दिवा पूजेच्या विसर्जनापर्यंत म्हणजे दुसर्‍या दिवसापर्यंत अखंड तेवत ठेवतात. असे केल्याने पूजकाच्या भावानुसार त्याला शिवतत्त्व आणि तेजतत्त्व यांचा लाभ मिळतो. सकाळी हरितालिकेचे पूजन करणार्‍या स्त्रिया सायंकाळी पुन्हा आरती करतात आणि रात्री हरितालिकेच्या कथेचे श्रवण करून जागरणही करतात. काही प्रांतांत देवतापूजनासह तीळ आणि तूप इत्यादींची आहुती देऊन हवनही करतात. या दिवशी हरितालिकेचे पूजन करण्यासमवेतच स्त्रिया दिवसभर उपवास करतात. उपवास करणे, म्हणजे अन्नग्रहण न करता नामस्मरण करत सतत देवाच्या अनुसंधानात रहाणे. स्त्रिया जीवनात येणारी विघ्ने दूर करण्यासाठी शिवाला प्रार्थना करतात. भावपूर्ण प्रार्थनेमुळे स्त्रीकडे शिव-शक्तीचा प्रवाह आकृष्ट होतो आणि याचा स्त्रीच्या भावानुसार तिला लाभ मिळतो. अशा प्रकारे उमा महेश्‍वराच्या म्हणजेच शिव-पार्वतीच्या स्मरणात व्रतस्थ राहून स्त्री संपूर्ण दिवस आणि रात्र घालवते.

४ आ. हरितालिका व्रताच्या दुसर्‍या दिवशी करावयाचे विधी

स्त्रिया सकाळी स्नान करून देवीची आरती करतात. देवीला दही-भाताचा नैवेद्य दाखवतात. त्यानंतर शिवपिंडी आणि सखी-पार्वती यांच्या मूर्ती जलस्रोतावर घेऊन जातात. तेथे वहात्या पाण्यात त्यांचे विसर्जन करतात.

संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्री गणपति’

सनातनचे गणपतीविषयक ग्रंथ आणि उत्पादने ‘ऑनलाइन’ खरेदी करण्यासाठी भेट द्या : SanatanShop.com/shop/en/search?tag=Shri-Ganapati

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now