पुन्हा राममंदिर !

संपादकीय

वर्ष २०१९ ला होणार्‍या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. नेहमी निवडणूक जवळ आली की, राममंदिराचे सूत्र उगाळले जाणे, हे ठरलेले असते. आताही तसेच दिसून येत आहे. भाजपमधील काही निवडक दिग्गज नेते राममंदिराविषयी बोलू लागले आहेत. अलीकडेच उत्तरप्रदेशातील भाजपचे आमदार मुकुटबिहारी वर्मा यांनी असेच वक्तव्य केले. ते म्हणाले, ‘‘राममंदिराविषयी भाजप कटीबद्ध आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे आणि सर्वोच्च न्यायालय आमचे आहे.’’ ‘राममंदिरासाठी भाजप कटीबद्ध आहे’, हे पक्षाच्या विविध नेत्यांनी वारंवार पुढे येऊन सांगितले आहे; मात्र त्याचा काय उपयोग ? एखाद्या सूत्राशी स्वतः बांधील असणे; म्हणजे त्या सूत्राच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करणे, ते पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा घेणे, ते पूर्ण होण्यासाठी येणार्‍या अडचणींवर मात करण्यासाठी उपाययोजना काढणे होय. राममंदिराविषयी असे काही होतांना दिसत नाही. त्यामुळे या वक्तव्याचे मोल शून्य ठरते. हिंदूबहुल भारतात हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले प्रभु श्रीरामचंद्र यांचे मंदिर बांधण्याची धमक एकाही राजकारण्याने दाखवलेली नाही. असा एकही राजकारणी भारताला लाभू शकला नाही, हे लोकशाहीचे अपयश नव्हे का ?

राममंदिर लवकरात लवकर बांधले जावे, हे प्रत्येक हिंदूचे स्वप्न आहे. त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी हिंदूंनी वर्ष २०१४ मध्ये भाजपला निवडून दिले; पण हिंदूंच्या पदरी निराशा आली. या ४ वर्षांत राममंदिराचे सूत्र रखडलेलेच आहे. याच पार्श्‍वभूमीवर प्रख्यात ज्योतिषी आचार्य राजीव नारायण शर्मा यांनी केलेले भाकित हिंदूंना चिंतन करायला लावणारे आहे. ‘मार्च २०२० पूर्वी अयोध्येत कुणीही कितीही प्रयत्न केले, तरी कोणताही पक्ष, व्यक्ती किंवा संस्था यांना राममंदिर उभारता येणार नाही’, असे भविष्य त्यांनी वर्तवले आहे. त्याही पुढे जाऊन ‘भाजप आणि त्याचे सर्वोच्च नेते यांच्या कुंडलीचा अभ्यास केला असता त्यांच्या प्रारब्धात मंदिर बांधण्याचे कर्म नाही आणि प्रारब्धही नाही’, असेही शर्मा यांनी म्हटले आहे. राममंदिर उभारणे, हे भारताच्या अस्मितेशी निगडित आहे. त्यामुळे ‘आध्यात्मिक स्तरावर प्रयत्न केल्यास हा प्रश्‍न सुटू शकतो’, हे हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे. स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनीही राममंदिर उभारले गेले नाही. आताही भाजप सरकारची एकंदरीत भूमिका पहाता ते उभारले जाईल, याची शाश्‍वती नाही. अशा वेळी ‘संत-महंतांचे आशीर्वाद आणि संकल्प यांद्वारेच राममंदिराची उभारणी शक्य आहे’, हे हिंदूंनी जाणले पाहिजे. राममंदिराच्या उभारणीसाठी येणार्‍या अडथळ्यांची शृंखला थांबावी, असे हिंदूंना वाटत असेल, तर त्यांनी आध्यात्मिक बळ वाढवावे. त्यासाठी साधनेशिवाय तरणोपाय नाही. ईश्‍वर भक्ताच्या हाकेला धावून येतो. हिंदूंनी ‘राममंदिराच्या उभारणीसाठी येणारे अडथळे दूर व्हावेत’, अशी ईश्‍वराला कळकळीने प्रार्थना केल्यास ईश्‍वर त्याला नक्कीच प्रतिसाद देईल.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now