रामनामाचा १३ कोटी जप करणारे बेळगाव (कर्नाटक) येथील पू. अरुण शिवकामत यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

एकमेकांना नमस्कार करतांना परात्पर गुरु  डॉ. आठवले आणि पू. अरुण शिवकामत
सनातन प्रभात नियतकालिकांविषयी जाणून घेतांना डावीकडून डॉ. (सौ.) गौरी कुलकर्णी, त्यांचे पती श्री. चिंतामण कुलकर्णी, पू. अरुण शिवकामत आणि माहिती सांगतांना श्री. निषाद देशमुख

रामनाथी (गोवा), १० सप्टेंबर (वार्ता.) – ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे भक्त आणि रामनामाचा १३ कोटी जप करणारे बेळगाव (कर्नाटक) निवासी पू. अरुण शिवकामत यांनी ९ सप्टेंबर या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांच्या समवेत त्यांचे भक्त तथा नगर येथील प्रसिद्ध आधुनिक वैद्य तथा ‘ब्रह्मचैतन्य रुग्णालया’चे संस्थापक डॉ. चिंतामणी कुलकर्णी, त्यांच्या पत्नी डॉ. (सौ.) गौरी कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. पू. अरुण शिवकामत यांचे सायंकाळी ६ वाजता आश्रमात आगमन झाले. या वेळी ६४ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले सनातनचे साधक श्री. प्रकाश मराठे यांनी त्यांचे प्रवेशद्वारावर पाद्यपूजन, तसेच  औक्षण केले. त्यानंतर साधक श्री. निषाद देशमुख यांनी त्यांना आश्रमात चालणार्‍या राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील कार्याची, तसेच आध्यात्मिक संशोधनाची सविस्तर माहिती दिली.

पू. अरुण शिवकामत आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची हृद्य भेट !

आश्रमात पू. अरुण शिवकामत आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची हृद्य भेट झाली. या वेळी त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना वाकून नमस्कार केला आणि ते म्हणाले, ‘‘फार दिवसांपासून तुम्हाला भेटण्याची इच्छा होती. गुरूंनी आज ती पूर्ण केली. आपल्या दर्शनाने फार आनंद झाला.’’ ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपाने त्यांच्या गुरुंचेच त्यांना दर्शन झाले’, असा त्यांचा भाव होता. यानंतर सनातनचे साधक श्री. प्रकाश मराठे यांनी पू. शिवकामत यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करून सन्मान केला. या वेळी पू. शिवकामत यांनी तो पुष्पहार स्वतः घालून न घेता परात्पर गुरु डॉ. आठवले यांना घालण्याची इच्छा व्यक्त केली आणि तो त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना घातला.

या प्रसंगी पू. शिवकामत म्हणाले, ‘‘जगात केवळ भगवंताचे नामच शाश्‍वत आहे. जे काम भगवंत करू शकत नाही, ते त्याचे नाम करू शकतो; म्हणून सर्वांनी नामाला धरून राहिले पाहिजे. प्रार्थनेने मन आनंदी होते; म्हणून तीही सतत करायला हवी.’’ यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सनातनवर संतांची असलेली कृपा आणि त्यांचे आशीर्वाद यांविषयी, तसेच सनातन संस्था अन् महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय यांच्या कार्याविषयीची माहिती दिली. याप्रसंगी उपस्थितांना साधनेविषयी मार्गदर्शन करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले, ‘‘साधनेत मनोलय होणे महत्त्वाचे आहे. स्वेच्छेने नव्हे, तर परेच्छेने वागता आले पाहिजे. साक्षीभावाने पहाता आले पाहिजे. अध्यात्मात तन, मन आणि धन देवाला अर्पण करायचे असते. प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वभावदोष आणि अहं असतो. त्यामुळे वर्षानुवर्षे नामजप करूनही मन एकाग्र होत नाही; म्हणून स्वभावदोष आणि अहं घालवणे आवश्यक आहे. मग अध्यात्मात जलदगतीने पुढे-पुढे जाता येते.’’ याशिवाय परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी उपस्थितांनी विचारलेल्या आध्यात्मिक शंकांचे निरसनही केले. शेवटी पू. अरुण शिवकामत यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा निरोप घेतांना त्यांना आलिंगन दिले.

क्षणचित्रे

१. पू. अरुण शिवकामत यांच्या आगमनाप्रीत्यर्थ प्रवेशद्वारावर पायघड्या घातल्या होत्या, तसेच साधक हात जोडून त्यांच्या स्वागतासाठी उभे होते.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी वास्तव्यास असलेल्या खोलीत गेल्यावर पू. अरुण शिवकामत यांनी त्यांना पिवळसर आणि निळसर प्रकाश दिसल्याचे सांगितले.

३. त्यांनी सनातनचे संत पू. सौरभ जोशी यांची भेट घेतली. त्या वेळी पू. शिवकामत यांना त्या ठिकाणी त्यांचे गुरु सूक्ष्मातून आल्याचे जाणवले. त्यांनी ‘पू. सौरभदादांमध्ये तेज आहे, हे दिसते. ते सांगावे लागत नाही’, असे सांगितले.

पू. अरुण शिवकामत यांचा अल्प परिचय

मूळचे कर्नाटक राज्यातील बेळगाव येथील रहिवासी असलेले पू. अरुण शिवकामत हे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे निस्सीम भक्त आहेत. पू. अरुण शिवकामत यांनी वयाच्या ५४ व्या वर्षी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा अनुग्रह घेतला आणि त्यांनी नामात स्वत:ला रममाण केले. महाराजांच्या प्रेरणेने त्यांनी १३ कोटी रामनामाचा जप करण्याचा संकल्प केला आणि त्यांनी तो ११ वर्षे अन् ११ मासांमध्ये पूर्ण केला.


Multi Language |Offline reading | PDF