सनातनच्या साधक-मूर्तीकारांनी अध्यात्मशास्त्रानुसार बनवलेली आणि साधकांना भाव अन् चैतन्य यांची अनुभूती देणारी ‘सनातनची सात्त्विक श्री गणेशमूर्ती’ !

गणेशोत्सव : धर्मशास्त्रासह अन्यवैशिष्ट्यपूर्ण माहिती !

समस्त हिंदूंचे आराध्य दैवत श्री गणपति ! गणेशोत्सवाची चाहूल लागताच गणरायाचे स्वागत करण्यासाठी आपण एकत्रितपणे सिद्धतेला लागतो. आपले आराध्य देवतेचे कार्य कोणते, त्याचे आपल्या जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व आदी सूत्रांसंदर्भात धर्मशास्त्रीय माहिती मिळाल्यास देवतेप्रती आपला भक्तीभाव वृद्धींगत होण्यास साहाय्य होते. या पार्श्‍वभूमीवर प्रतिदिन श्री गणेशासंदर्भातील धर्मशास्त्रीय तसेच अन्य वैशिष्ट्यपूर्ण माहिती आमच्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

‘सनातन संस्थेच्या साधक-मूर्तीकारांनी अध्यात्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती बनवली आहे. त्यांनी ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी कला’ असा दृष्टीकोन ठेवून सेवा म्हणून भावपूर्णरित्या मूर्ती बनवली असल्याने ती सात्त्विक झाली आहे. भविष्यपुराणात ‘कलियुगात ‘धूम्रकेतू’ किंवा ‘धूम्रवर्ण’ नावाचा श्री गणपतीचा चौथा अवतार होणार आहे’, असे वर्णिले आहे. त्यामुळे सनातनने धूम्रवर्ण (धुरकट रंगात) आणि रंगीत अशा दोन प्रकारच्या मूर्ती बनवल्या आहेत. धूम्रवर्णाची मूर्ती निर्गुण तत्त्वाशी, तर रंगीत मूर्ती सगुण तत्त्वाशी संबंधित आहे.

सनातन संस्थेच्या साधक-मूर्तीकारांनी बनवलेली श्री गणेशमूर्ती सनातन संस्थेच्या रामनाथी, देवद, मिरज येथील आश्रमातील आणि मंगळूरू (कर्नाटक) सेवाकेंद्रातील ध्यानमंदिरात ठेवली आहे.

१. सनातन-निर्मित श्री गणेशमूर्तीचे वैशिष्ट्य

१ अ. पर्यावरण पूरक : ही मूर्ती शाडूच्या मातीपासून बनवली असून ती पाण्यात विरघळणार्‍या रंगांनी रंगवली आहे. त्यामुळे विसर्जन केल्यावर मूर्ती पाण्यात विरघळत असल्याने ही पर्यावरणाला पूरकही आहे.

१ आ. गणेशतत्त्व आकृष्ट करणारी : या मूर्तीमध्ये २८.३ टक्के गणेशतत्त्व आकृष्ट झाले आहे. (कलियुगात मूर्ती किंवा चित्र यांमध्ये अधिकाधिक ३० टक्के एवढ्या प्रमाणात देवतेचे तत्त्व येऊ शकते.) ही मूर्ती मोठ्या प्रमाणावर गणेशतत्त्व प्रक्षेपित करत असल्याने तिच्यामुळे सभोवतालचे वातावरण चैतन्यमय होते.

१ इ. भावाच्या स्तरावर अनुभूती देणारी : या मूर्तीच्या दर्शनाने, तिच्यासमोर बसून नामजप केल्याने किंवा तिला प्रदक्षिणा घातल्याने सात्त्विकता मिळते आणि सहजपणे भावजागृती होते.

२. ‘श्री गणपति अथर्वशीर्षा’नुसार श्री गणेशाचे मूर्तीविज्ञान

‘श्री गणपति अथर्वशीर्षा’त श्री गणेशमूर्तीचे वर्णन ‘एकदंत, चतुर्भुज, पाश आणि अंकुश धारण करणारा, एका हातात (मोडलेला) दात धारण करणारा आणि दुसर्‍या हाताची वरदमुद्रा असलेला, ज्याचा ध्वज मूषकचिन्हांकित आहे असा, रक्त (लाल) वर्णी, लंबोदर, सुपासारखे कान असलेला, रक्त (लाल) वस्त्र नेसलेला, अंगाला रक्तचंदनाचा अनुलेप लावलेला आणि रक्त (लाल) पुष्पांनी पूजन केलेला’, असे आहे.

३. अथर्वशीर्षात वर्णन केलेली श्री गणेशमूर्ती आणि सनातन-निर्मित श्री गणेशमूर्ती यांमुळे गणेशभक्तांना येणार्‍या अनुभूती !

अथर्वशीर्ष लिहिणार्‍या गणकऋषींना श्री गणेशाच्या ज्या रूपाचे दर्शन झाले, त्यानुसार त्यांनी त्या रूपाचे वर्णन केले, तर सनातनने सध्याच्या काळानुसार आवश्यक अशी धूम्रवर्णीय गणेशमूर्ती बनवली आहे. त्यामुळे ही गणेशमूर्ती ‘श्री गणपति अथर्वशीर्षा’तील वर्णनाशी तंतोतंत जुळत नाही. अथर्वशीर्षात वर्णन केलेली मूर्ती ही शक्तीची अनुभूती देणारी आहे, तर सनातन-निर्मित श्री गणेशमूर्ती साधकांना त्यांच्या भावाप्रमाणे भाव, आनंद आणि शांती यांच्या अनुभूती देणारी आहे.’

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्री गणपति’)

– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.९.२०१८)

सनातनचे गणपतीविषयक ग्रंथ आणि उत्पादने ‘ऑनलाइन’ खरेदी करण्यासाठी भेट द्या : SanatanShop.com/shop/en/search?tag=Shri-Ganapati

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now