प्रसारमाध्यमांचा उन्माद !

१० ऑगस्टला हिंदु गोवंश रक्षा समितीचे श्री. वैभव राऊत, शिवप्रेमी श्री. सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर यांना मुंबई आतंकवादविरोधी पथकाने (‘एटीएस्’ने) अटक केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी ‘सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार …’, अशी आरोळी ठोकत ‘मीडिया ट्रायल’ चालवली आणि सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांना दोषी ठरवण्यास प्रारंभ केला. या घटनेवरून प्रसारमाध्यमांनी या दोन्ही संस्थांना अशा प्रकारे कलंकित करण्याचा प्रयत्न केला की, जणूकाही या देशामध्ये या दोन संघटनांच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही राष्ट्रीय बातमीच नव्हती. त्यानंतरही आजतागायत प्रसारमाध्यमांकडून ‘सनातन संस्था आतंकवादी कशी आहे’, हे विनापुरावा सिद्ध करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला जात आहे.

श्री. भूषण कुलकर्णी

या सप्ताहात आणखी एका मोठ्या बातमीने देशभरात खळबळ उडवून दिली. ती म्हणजे नक्षलवाद्यांच्या ‘थिंक टँक’मधील सदस्यांना अटक ! खरेतर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेने या दोन्ही घटनांना एकाच दृष्टीने पहायला हवे होतेे; मात्र दुर्दैवाने हिंदुत्वनिष्ठांच्या बातमीमध्ये सरधोपटपणे ‘कट्टरपंथी हिंदुत्वनिष्ठ’, ‘हिंदु आतंकवादी’, ‘भगवे आतंकवादी’ असे उल्लेख करणारी माध्यमे देशद्रोही नक्षलप्रेमींच्या वृत्तांचे प्रसारण करतांना त्यांना ‘कथित नक्षल समर्थक’, ‘सामाजिक कार्यकर्ते’, ‘विचारवंत’ अशी विशेषणे लावत होती. ज्या नक्षलवादाने आजवर १२ सहस्र लोकांना मारले, तो आजही देशभर मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. असे असूनही त्यांची पाठराखण करणार्‍यांना ‘नक्षलप्रेमी’ म्हणण्याचे धाडस वाहिन्यांनी दाखवले नाही. यामागे नेमके षड्यंत्र काय आहे ? या सर्वांमागे कोण आहे ?, हे सर्व शोधून वास्तव समाजासमोर मांडायला हवे होते; मात्र सनातनद्वेषाचा कंड शमवण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांची नाहक अपकीर्ती केली जात आहे.

१. प्रसारमाध्यमांची सनातनद्वेषी आणि हिंदुद्वेषी गरळओक !

हिंदुत्वनिष्ठांना ‘एटीएस्’ने अटक केल्यानंतर एटीएस्चे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ‘अद्याप कोणत्याही संघटनेचे नाव अन्वेषणात पुढे आलेले नाही !’, असे स्पष्ट सांगितले. असे असतांनाही ‘अटकेत असलेल्या हिंदुत्वनिष्ठांचा सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याशी कसा संबंध आहे अन् ते संस्थेचे साधक आणि समितीचे कार्यकर्ते कसे आहेत’, ‘या प्रकरणात संस्था अन् समिती कशी दोषी आहे’, हे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न प्रसारमाध्यमे सातत्याने करत आहेत.

२. प्रशासकीय यंत्रणा आणि तथाकथित पुरोगामी यांची बटीक प्रसारमाध्यमे !

खरेतर ‘एटीएस्’ने हिंदुत्वनिष्ठांना अटक करतांना ‘मुद्देमालाचा पंचनामा न करणे’, ‘हिंदुत्वनिष्ठांना मारहाण करणे’, अशा अनेक कायदाबाह्य आणि अमानवीय कृती केल्या. असे असतांनाही प्रसारमाध्यमांनी त्याविषयी साधा ‘ब्र’देखील काढला नाही; कारण ज्यांना अटक झाली होती, ते हिंदु धर्मीय होते. हीच गोष्ट जर धर्मांधांविषयी घडली असती, तर त्याची उलट अर्थाने ‘ब्रेकिंग न्यूज’ आणि त्यावरून चर्चासत्रे झडली असती ! पोलिसांनी केलेल्या कायदाबाह्य कृतींचे पितळ उघडे पाडण्याचा प्रयत्न प्रसारमाध्यमांकडून झाला नाही. यात भर म्हणून कि काय, अटकेनंतर जी काही चर्चासत्रे झाली, त्यामध्ये ‘हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने हिंदु विधीज्ञ परिषद, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे प्रवक्ते भूमिका मांडत असतांना त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला’, हे महाराष्ट्राने पाहिले. यातून ‘प्रसारमाध्यमे ही प्रशासकीय यंत्रणा आणि तथाकथित पुरोगामी यांची बटीक बनली आहेत का ?’, अशी शंका येते.

३. ‘भगवा आतंकवाद’ सिद्ध करण्यासाठी ‘हिंदु अतिरेकी’ संबोधणे !

अटक केलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या न्यायालयीन प्रक्रियेसाठी हिंदु विधीज्ञ परिषद त्यांच्या मागे ठामपणे उभी राहिली आणि त्यावरून सनातनवर आगपाखड चालू झाली. ‘हिंदुत्वनिष्ठांच्या घरी सापडलेली कथित स्फोटके ही बकरी ईदच्या निमित्ताने, तसेच मराठा आरक्षण आंदोलन यांमध्ये घातपात घडवण्यासाठी जमवली होती’, असा जावईशोध काही तथाकथित जात्यंध लोकप्रतिनिधींनी लावला. असे कोणतेही आरोप पोलिसांनी केलेले नसतांनाही माध्यमांनी हिंदुत्वनिष्ठांना ‘हिंदु अतिरेकी’ संबोधण्यास प्रारंभ केला. एरव्ही धर्मांध आतंकवादी देशभरात सातत्याने पकडले जात असतांना ‘मुसलमान अतिरेकी’ असे संबोधण्याचे धाडस कधीही या माध्यमांना झाले नाही. उलट ‘आतंकवादाला धर्म नसतो’, अशी बांग प्रसारमाध्यमे त्या वेळी न विसरता देतात.

४. खोट्या बातम्या पसरवण्याची सुपारी घेतलेली प्रसारमाध्यमे !

हिंदुत्वनिष्ठांच्या अटकेनंतर आजपर्यंत सातत्याने सनातनद्वेषी आणि हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमांनी अन्वेषण यंत्रणांच्या ‘सूत्रांच्या’ हवाल्याने अनेक बातम्या प्रसारित केल्या. या बातम्या म्हणजे एखाद्या चित्रपट पटकथा लिहिणार्‍यालाही मागे टाकतील, अशा स्वरूपाच्या आहेत. नुकतीच अन्वेषण यंत्रणांनी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी पत्रकारांनी ‘एटीएस्’च्या अधिकार्‍यांना ‘आरोपी कोणता ‘कोडवर्ड’ (सांकेतिक शब्द) वापरत होते ? त्याविषयी काहीतरी ‘क्लू’ सांगा. आम्ही बातमी तयार करतो’, असे सांगितले. यावरून कपोलकल्पित कहाण्या आणि बातम्या कशा रचल्या जातात, हे सोदाहरण स्पष्ट होते.

यावरूनच आतापर्यंत ज्या काही बातम्या प्रसारमाध्यमांवरून प्रसिद्ध झाल्या, त्यांचा अंदाज बांधता येईल. यातून लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे ‘वृत्तवाहिन्या आणि त्यांचे पत्रकार यांनी हिंदुत्वनिष्ठ अन् हिंदु धर्म यांना संपवण्याची सुपारीच तथाकथित पुरोगामी, तसेच जात्यंध लोकप्रतिनिधी यांच्याकडून घेतली आहे’, असे वाटल्यास आश्‍चर्य ते काय ?

५.  न्यायालयाचा अवमान करणारी प्रसारमाध्यमे !

प्रसारमाध्यमे अनेक वेळा विविध चर्चासत्रे आणि त्यांनी केलेल्या लघुपटांमध्ये ‘सनातन संस्थेने नांदेड, परभणी, मालेगाव, ठाणे, वाशी, मडगाव अशा ठिकाणी बॉम्बस्फोट केले आहेत, तसेच ४ विचारवंतांच्या (?) हत्या केल्या’, असे वारंवार दाखवले जात होते. खरेतर वरील कोणत्याही गुन्ह्यांमध्ये सनातन संस्थेचा दुरान्वयेही संबंध नाही. आजपर्यंत कोणत्याही अन्वेषण यंत्रणेने आणि न्यायालयानेही निकालपत्रात त्याविषयी उल्लेख केलेला नाही. असे असूनही स्वतःला न्यायाधिशांच्याही पुढे समजणारी प्रसारमाध्यमे ‘सनातनला दोषी ठरवतात’, न्यायालयांचा अवमान करतात आणि समाजाची दिशाभूल करतात.

६. सनातनसारख्या राष्ट्रनिष्ठ संघटनेचे ‘स्टिंग ऑपरेशन’ करणारी वृत्तवाहिनी !

सनातनचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक शिवसेनेचे राज्यमंत्री श्री. अर्जुन खोतकर यांच्या दालनातून बाहेर पडतांना त्या व्हरांड्यातील जेमतेम १० सेकंदाची ध्वनीचित्रफीत एका वाहिनीने प्रसारित केली. त्यात ‘श्री. अभय वर्तक त्या पत्रकाराकडे पाहून स्मितहास्य करत तेथून निघून जात आहेत’, इतकेच चित्रीकरण होते, तरी जणू राणा भीमदेवी थाटात ‘आम्ही स्टिंग ऑपरेशन केले’ असा या वाहिनीकडून डांगोरा पिटण्यात आला. अभय वर्तक मंत्र्यांना भेटायला कशाला गेले होते ?’, आदी अनेक प्रश्‍न उपस्थित करण्यात आले. एका राज्यातील एक सामान्य नागरिकही एका मंत्र्याला भेटू शकतो. अशी स्थिती असतांना ‘सनातनचे धर्मप्रसारक मंत्र्यांना कसे काय भेटले ?’, असे म्हणणे निवळ हास्यास्पदच होते. हे अल्प होते कि काय, तोच दुसर्‍या एका वाहिनीने यापुढे जाऊन पत्रकारितेला कलंक लावणारे वृत्त प्रसारित केले. या वृत्तवाहिनीने ‘मंत्र्यांना भेटायला मंत्रालयात गेलेले अभय वर्तक चक्क ‘अंडरग्राऊंड’ आहेत’, असे तारे तोडले ! केवळ स्टुडिओमध्ये बसून ब्रह्मांडाची माहिती असल्याचा आव आणणारी भोंगळ माध्यमे आजच्या पत्रकारितेची पातळी किती घसरली आहे, याचे दर्शन घडवतात. असले ‘स्टिंग ऑपरेशन’ आणि ‘अंडरग्राऊंड’ वार्ता देणारे यांचे बोलविते धनी कोण आहेत ?, हे शोधणे आवश्यक आहे.

‘स्टिंग ऑपरेशन’च करायचे तर देशद्रोही धर्मांध, नक्षलसमर्थक, हिंदूंच्या हत्यांचे मनोरे रचणारे कम्युनिस्ट यांच्यापैकी कोणाचे तरी करण्याचे धाडस दाखवा ! असे धाडस कधी केल्याचे ऐकिवात आलेले नाही.

पोलीस प्रशासन, प्रसारमाध्यमे आणि तथाकथित पुरोगामी यांनी सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी भगवान श्रीकृष्ण आणि संत यांच्या कृपाशीर्वादाने चालू असलेल्या सनातन संस्थेवर बंदी आणण्याचे प्रयत्न निष्फळ ठरतील, हे नक्की ! सध्या जरी प्रसारमाध्यमांनी सनातन संस्थेचे नाव मलीन केले असले, तरी संत, संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ संघटना, धर्माभिमानी सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. या अग्नीपरीक्षेतून संस्था तावून सुलाखून बाहेर पडेल आणि हिंदु राष्ट्राच्या दिशेने घोडदौड आणखी जोमाने होईल. सनातनच्या कार्याला खीळ बसणे सोडाच, उलट त्याची उत्तरोत्तर कार्यवृद्धीच होईल, हेही तितकेच खरे !’

– श्री. भूषण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.


Multi Language |Offline reading | PDF