समलैंगिक संबंध गुन्हा नाही ! – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी देहली – समलैंगिकांनाही समान अधिकार आहेत. त्यामुळे २ सज्ञान व्यक्तींनी ठेवलेले संबंध ही खासगी गोष्ट असल्यामुळे तो गुन्हा ठरत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ६ सप्टेंबरला दिला. परस्पर संमतीने ठेवल्या जाणार्‍या समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणार्‍या भारतीय दंड विधानाच्या कलम ३७७ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणार्‍या याचिकांवर न्यायालयाने हा निकाल दिला.

१. केंद्र सरकारने २ प्रौढांनी परस्पर संमतीने केलेल्या अनैसर्गिक संभोगाला गुन्हा ठरवण्याशी संबंधित दंडात्मक तरतुदींच्या घटनात्मक वैधतेचे सूत्र न्यायालयाच्या सद्सद्विवेकबुद्धीवर सोडले होते. अल्पवयीन मुले आणि प्राणी यांच्याशी अनैसर्गिक संभोगाविषयीच्या दंडात्मक तरतुदींचे इतर पैलू कायद्यात तसेच कायम राहू दिले जावेत, अशी भूमिका घेतली होती. त्यानुसार न्यायालयाने समलैंगिक संबंध गुन्हा नसल्याचे सांगतांनाच अल्पवयीन मुले आणि प्राणी यांच्याशी अनैसर्गिक संभोग करणे हा कलम ३७७ अंतर्गत गुन्हाच असल्याचे स्पष्ट केले आहे.

२. जगभरातील एकूण ७३ देशांमध्ये समलैंगिकांना परस्पर सहमतीने शारीरिक संबंध ठेवण्यास कायद्याने मान्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने मध्य पूर्वेकडील देश, आफ्रिका, आशियायी देश यांचा समावेश आहे. अमेरिकेमध्ये वर्ष २०१५ मध्ये समलैंगिक संबंधांना मान्यता देण्यात आली.

थॉमस बॅबिग्टंन मॅकोले याने केलेला कायदा

‘ईस्ट इंडिया कंपनी’चा अधिकारी थॉमस बॅबिग्टंन मॅकोले याने वर्ष १८५२ मध्ये भारतीय संहितेत ‘कलम ३७७’ कलम अंतर्भूत केले. एखाद्याने निसर्ग नियमांच्या विरोधात जाऊन कोणतीही लैंगिक कृती केल्यास त्याला जन्मठेप किंवा १० वर्षांची शिक्षा देण्याची तरतूद यात करण्यात आली.

समलैंगिकता हे हिंदु धर्मशास्त्रानुसार पाप ! – चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

समलैंगिकतेविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा पूर्ण आदर करतो. असे असले, तरी समलैंगिक संबंध न्याय दृष्टीकोनातून आणि व्यक्तीगत स्वातंत्र्याच्या दृष्टीकोनातून न्यायालयाला योग्य वाटत असले, तरी हिंदु धर्मशास्त्राच्या दृष्टीने हे पाप आहे. आपल्या धर्मग्रंथांनुसार आपल्या मानवाचा विकास हा संस्कृतीच्या दिशेने झाला पाहिजे. तो विकृतीच्या दिशेने होऊन उपयोग नाही. आपल्याकडे लैंगिक संबंध विशेषतः संभोग हा केवळ प्रजोत्पत्ती या एकमेव उद्देशाने केला जातो. समलैंगिक संबंधात प्रजोत्पत्ती हा उद्देश नाही, तेथे केवळ भोगवाद आहे. आपली संस्कृती भोगवादाचे समर्थन करत नाही.  न्यायदेवतेने जो काही निर्णय दिला आहे, तो आजच्या व्यक्तीगत स्वातंत्र्याच्या दृष्टीकोनातून जरी असला, तरी ‘पाप केल्याने मृत्यूनंतर जीव दुर्गतीला जातो’, हे धर्मश्रद्ध समाजाने लक्षात घेतले पाहिजे.

भारतीय संस्कृतीला समलैंगिकता मान्य नसल्याने आम्ही याला गुन्हाच मानणार ! – स्वामी नरेंद्रगिरी, अध्यक्ष, आखाडा परिषद

न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही मान राखतो; मात्र आम्हाला वाटते की, यामुळे समाजामध्ये चुकीचा संदेश जाऊ नये. या निर्णयावर सरकारने विचार केला पाहिजे. समलैंगिकता ही पाश्‍चात्त्य विकृती आहे आणि भारतात पसरत आहे. याचा आपल्या समाजामध्ये प्रसार होऊ नये.

जर हा गुन्हा नाही, तर ३-४ विवाह करणे हाही गुन्हा समजला जाऊ नये ! – मौलाना कल्बे जव्वाद, शिया धर्मगुरु

समलैंगिकतेला जर धर्मापासून वेगळे केले, तरी भारतीय संस्कृती याच्या विरोधातच आहेत. जर हा गुन्हा नाही, तर ३-४ विवाह करणे हाही गुन्हा समजला जाऊ नये. प्रत्येक जण स्वतःच्या मर्जीप्रमाणे काहीही करत राहील. सरकारने, यावर आळा घातला पाहिजे.

पंतप्रधान मोदी यांनी समलैंगिकता गुन्हा असल्याचा कायदा बनवावा ! – स्वामी चक्रपाणी महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदू महासभा

न्यायालयाचा निर्णय समाज आणि राष्ट्र यांच्या हिताचा होऊ शकत नाही. यामुळे समाजात अराजकता निर्माण होऊ शकते आणि त्यातून समाजाच्या चारित्र्याचे आणि युवकांचे पतन होऊ शकते. त्यातून गुन्हेगारीही वाढू शकते. कोणत्याही धर्मानुसार हा निर्णय योग्य नाही. पंतप्रधान मोदी यांना विनंती आहे की, त्यांनी या निर्णयाला रोख लावावी आणि हा गुन्हा असल्याचा कायदा बनवावा.


Multi Language |Offline reading | PDF