शरद कळसकर यांना १० सप्टेंबरअखेर केंद्रीय अन्वेषण यंत्रणेची कोठडी

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण

शरद कळसकर यांनी दोन गोळ्या झाडल्याचा केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचा दावा

पुणे – अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर शरद कळसकरने दोन गोळ्या झाडल्या असून त्या त्यांना लागल्या होत्या. शरद कळसकर हा शस्त्रे हाताळण्यात आणि बॉम्ब बनवण्यात पारंगत असल्याचा दावा केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सीबीआयने) न्यायालयात केला. मुंबई उच्च न्यायालयाने ३ सप्टेंबर या दिवशी शरद कळसकर यांची केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला कोठडीत देण्यास संमती दिली. त्यानंतर कळसकर यांना ४ सप्टेंबर या दिवशी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस्.एम्. सय्यद यांच्या न्यायालयात उपस्थित करण्यात आले. न्यायाधिशांनी दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकून कळसकर यांना १० सप्टेंबरपर्यंत केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

तिघांना समोरासमोर बसूवन अन्वेषण करायचे असल्याने १४ दिवसांची कोठडी द्या ! – अधिवक्ता विजयकुमार ढाकणे

केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचे अधिवक्ता विजयकुमार ढाकणे म्हणाले, ‘‘कळसकर याचे राज्य आतंकवादविरोधी पथकाने केलेल्या अन्वेषणात त्याचे गुन्ह्यांशी संबंध असल्याचे दिसून आले आहे. या गुन्ह्यात यापूर्वी अटक केलेल्या सचिन अंधुरे याला राजेश बंगेरा आणि अमित डेगवेकर यांनी अग्निशस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिल्याचे अन्वेषणात पुढे आले आहे. या तिघांना समोरासमोर बसवून अन्वेषण करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कळसकर याला १४ दिवसांची कोठडी देण्यात यावी.’’

यापूर्वीच्या दोषारोपपत्रात वेगळीच नावे, तर आता वेगळेच सांगितले जात आहे ! – अधिवक्ता धर्मराज

शरद कळसकर यांचे अधिवक्ता धर्मराज म्हणाले, ‘‘सचिन अंधुरे यांची केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने १४ दिवसांची कोठडी घेतली. त्यात ते गुन्ह्यात वापरलेले वाहन, शिरस्त्राण असे काहीही हस्तगत करू शकलेले नाहीत. केंद्रीय अन्वेषण यंत्रणा पूर्वग्रहदूषितपणे अन्वेषण करत आहेत. यापूर्वी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या दोषारोपपत्रात त्यांनी विनय पवार आणि सारंग अकोलकर यांनी गोळ्या झाडल्याचे म्हटले. आता वेगळेच सांगितले जाते. शरद कळसकर यांच्याकडून काहीही हस्तगत करायचे नाही. संभाजीनगर येथून पिस्तूल हस्तगत करण्यात आल्याचे केंद्रीय अन्वेषण यंत्रणा सांगत आहे; मात्र त्याचा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही. त्या संदर्भातील वेगळा गुन्हा संभाजीनगर पोलीस ठाण्यात प्रविष्ट आहे. त्यामुळे कळसकर यांना कोठडी न देता न्यायालयीन कोठडी द्यावी.’’

सीबीआयची दाभोलकर हत्या प्रकरणातील सर्व मांडणी विसंगत !

अधिवक्ता धर्मराज चंडेल म्हणाले, ‘‘सचिन अंधुरेच्या १४ दिवसांच्या कोठडीमध्ये दाभोलकर हत्या प्रकरणी काहीही प्रगती झाली नाही. सचिन अंधुरेला हत्येच्या ठिकाणी घेऊन जाऊन सीबीआयने घटनाक्रम कसा घडला, ते पाहिले; पण यापूर्वी सीबीआयने दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी न्यायालयात दिलेल्या चार्जशीटमध्ये आधीपासूनच सविस्तर घटनाक्रम दिला आहे. सीबीआयची दाभोलकर हत्या प्रकरणातील ही सर्व मांडणी विसंगत आहे.’’


Multi Language |Offline reading | PDF