पावसाळा चालू असल्याने औषधी वनस्पतींची तातडीने लागवड करा !

साधकांना सूचना

१. भावी संकटकाळाच्या दृष्टीने घरगुती औषधांचे महत्त्व लक्षात घेऊन आपल्या घराभोवती औषधी वनस्पतींची लागवड आतापासूनच करा !

पूर, भूकंप, महायुद्ध यांसारख्या संकटकाळात आधुनिक वैद्य (डॉक्टर), वैद्य, तसेच औषधे उपलब्ध होणे कठीण असते. अशा वेळी स्वतःकडे घरगुती औषधे असणे आवश्यक आहे. अशी औषधे तात्काळ उपलब्ध होण्यासाठी प्रत्येकाने स्वतःच्या क्षमतेनुसार औषधी वनस्पतींची लागवड करायला हवी. आपल्या घराच्या अंगणात किंवा आगाशीत निर्गुंडी, ओवा, तुळस, जास्वंद, अडुळसा अशा प्रकारच्या औषधी वनस्पती लावता येतील. शहरातील बहुतेक लोक सदनिकांमध्ये (फ्लॅट्समध्ये) किंवा भाड्याच्या खोल्यांत रहात असतात. त्यांना यांतील निवडक वनस्पती कुंड्यांमध्ये लावून खोलीच्या आगाशीत ठेवता येतील.

२. स्थानिक स्तरावर रोपे मिळवून त्वरित लागवड करा !

काही साधकांकडे औषधी वनस्पतींची रोपे किंवा त्या वनस्पतींचे मातृवृक्ष (ज्या झाडापासून नवीन झाडे निर्माण करता येऊ शकतील, अशी परिपक्व झाडे) आधीपासून लावलेले असू शकतात, उदा. कोरफड, अडुळसा, निर्गुंडी, देशी शेवगा, पारिजात. काही रोपे कृषी खाते किंवा कृषी विद्यापिठाच्या रोपवाटिकांमध्ये अल्प दरात मिळू शकतात. काही औषधी वनस्पतींची रोपे स्थानिक आयुर्वेद महाविद्यालये, वनखाते यांच्या रोपवाटिकांमध्ये विनामूल्य मिळू शकतात. याविषयी स्थानिक स्तरावर चौकशी करून त्यांची त्वरित लागवड करावी.

३. भूमी विनावापर (पडीक) ठेवण्यापेक्षा तिच्यात औषधी वनस्पती लावा !

काही जणांकडे मोठी भूमी विनावापर पडून असते. तिच्यामध्ये अत्यल्प श्रमांत आणि न्यूनतम व्ययामध्ये (खर्चामध्ये) औषधी वनस्पतींची लागवड करता येऊ शकते. पावसाळा चालू झाल्याने अशा भूमीवर औषधी वनस्पतींची लागवड लगेच करता येईल.

४. शेतजमिनींवरही औषधी वनस्पतींची लागवड करा !

सर्वत्रच्या साधकांना संकटकाळात साहाय्य व्हावे, या हेतूने औषधी वनस्पतींच्या लागवडीची फार मोठी समष्टी सेवा भगवंताने उपलब्ध करून दिली आहे. काळाची आवश्यकता आणि गांभीर्य लक्षात घेऊन स्वतःच्या शेतजमिनीच्या काही भागात औषधी वनस्पतींची लागवड करावी. ही लागवड चालू शेतीत आंतरपीक म्हणूनही करता येईल. वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी औषधी वनस्पतींची लागवड करण्यासाठी इच्छुक असल्यास साधकांनी त्यांनाही यासाठी उद्युक्त करावे. शेतीमध्ये स्वतंत्र किंवा आंतरपीक म्हणून औषधी वनस्पतींची लागवड करण्यास सांगून त्यांनाही धर्मकार्यात सहभागी करून घ्यावे.

या संदर्भात काही प्रश्‍न असल्यास श्री. विष्णु जाधव यांच्याशी ८२०८५१४७९१ या क्रमांकावर संपर्क करावा.


Multi Language |Offline reading | PDF