(म्हणे) ‘ज्यांची माणूस बनण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही, ते नथुराम बनतात किंवा डॉ. जयंत आठवले बनून दंगली घडवतात !’

सनातनद्वेषाचा कंड शमवून घेणार्‍या संधीसाधू निखिल वागळे यांची पोपटपंची !

निखिल वागळे यांनी केलेल्या विधांविषयी सनातन कायदेशीर तज्ञांचा समुपदेश घेत आहे आणि त्यानुसार पुढील कार्यवाही करत आहे !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे कार्य केवळ भारताला नव्हे, तर जागतिक स्तरावर मार्गदर्शक ठरणारे आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्थापन केलेली सनातन संस्था आणि तिचे साधक गेल्या दोन दशकांहून अधिक काळ निःस्पृहपणे हिंदु धर्म आणि संस्कृती यांचा प्रचार करून समाजाला अध्यात्म, साधना, संस्कृती आणि राष्ट्र यांविषयी जागृती करत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य अनेक संतांनी गौरवलेले आहे. त्यामुळे ऋषितुल्य डॉ. आठवले यांची तुलना दंगली घडवणार्‍यांच्या समवेत करणे म्हणजे वागळे यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच आहे ! काही वर्षांनी वागळे कोण होते, ते लोक विसरतील; मात्र यापुढील सहस्रो वर्षे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य लोकांच्या स्मरणात राहील ! – संपादक

ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली), २२ ऑगस्ट (वार्ता.) – माणूस ज्या वेळी माणूस म्हणून जन्माला येतो, तेव्हा तो माणूस नसतो. त्याच्यात जनावराचा अंश शिल्लक असतो. आयुष्यात माणूस बनण्याची प्रकिया होते. ज्याची प्रक्रिया पूर्ण होते, ते डॉ. दाभोलकर बनतात. ज्यांची प्रक्रिया पूर्ण होत नाहीत, ते नथुराम तरी बनतात किंवा डॉ. जयंत आठवले तरी बनतात. मग ते दंगली घडवतात, माणसांची घरे जाळायला सांगतात. हे सर्व मी १९८४, १९९२, २००२ मध्ये पाहिले आहे, अशी अश्‍लाघ्य टीका पत्रकार निखिल वागळे यांनी केली. ते अंनिसच्या वतीने २० ऑगस्ट या दिवशी ‘दाभोलकर-पानसरे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्‍न’ या विषयावर लोकनेते राजारामबापू पाटील नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात बोलत होते.

या वेळी निखिल वागळे म्हणाले…

माझी देशातील युवा शक्तीवर श्रद्धा आहे. ते कधीही आतंकवादाकडे वळणार नाहीत. दुर्दैवाने काही लोक तिकडे गेले आहेत. मला सचिन अंधुरेशी बोलायचे आहे. मला बाकीचे काही तज्ञ जे सनातनमध्ये गेले आहेत, त्यांच्याशी बोलायचे आहे. त्यांना मला विचारायचे आहे की, तुमच्यावर कोणती गुंगी केली आहे ? युवतींना विचारायचे आहे की, तुमच्यावर कोणती गुंगी केली आहे ? (सनातनमध्ये सर्व जण साधना करण्यासाठी येतात. ‘गाढवाला गुळाची चव काय कळणार’, या म्हणीप्रमाणे सनातनद्वेषींना साधना, नामजप आणि सनातन संस्थेचे महत्त्व काय कळणार ? – संपादक)

युवतींना विचारायचे आहे की, सनातनमध्ये जाऊन तुम्ही काय करता ? ते तुम्हाला आजारी करत आहेत, विकृत करत आहेत. अशा वाट चुकलेल्या युवकांमधूनच एक नथुराम निर्माण होतो किंवा डॉ. दाभोलकर, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचा खुनी निर्माण होतो. (डॉ. दाभोलकर, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचा खुनी कोण आहे, हे अद्याप कोणत्याही न्यायालयात सिद्ध झालेले नाही. असे असतांना कोणत्या पुराव्यांच्या आधारे निखिल वागळे वाट चुकलेल्या युवकांमधून एक नथुराम निर्माण होतो, असे म्हणत आहेत ! केवळ सनातनद्वेषापोटीच, तसेच सवंग लोकप्रियतेसाठी अशी विधाने करणार्‍यांना सनातनचे राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य काय कळणार ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF