अशाने कधीतरी ‘स्मार्ट सिटी’ निर्माण होईल का ?

नोंद

‘स्मार्ट सिटी’च्या अंतर्गत सोलापूर स्वच्छ रहावे आणि रहिवाशांना कचरा विघटन करून तो घंटागाडीत टाकण्याची सवय लागावी, यासाठी सर्व कुटुंबांना विनामूल्य कचरापेटी देण्यात येत आहे. कचरापेटी वाटपाची स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित असूनही येथील काही नगरसेवकांकडून हस्तक्षेप केला जात असल्याने या कचरापेटी वाटपाची गती मंदावली असल्याच्या तक्रारी काही अधिकार्‍यांनी केल्या आहेत.

स्मार्ट सिटीअंतर्गत सोलापूर येथे आतापर्यंत ४ टप्प्यांत ४८ सहस्र कचरापेट्या देण्यात आल्या आहेत. ‘मिटकॉन’ या संस्थेकडे वाटपाचे दायित्व देण्यात आले असून उत्पन्न कराची पावती पाहून नागरिकांना वाटप करून त्याचा अहवाल आयुक्तांकडे सादर करणे अपेक्षित आहे; मात्र वाटप करण्याआधीच विविध नगरसेवकांकडून ‘आमच्याच प्रभागात आज वाटप झाले पाहिजे’, असा आग्रह धरला जात आहे. तेथे वाटपासाठी अधिकारी पोहोचल्यावर तेथे समारंभ करून वाटपाची सिद्धता चालू असते. त्यानंतर नगरसेवक प्रमुख पाहुणे म्हणून विलंबाने येतात आणि आल्यानंतर भाषण, सत्कार यांतच अधिक वेळ जातो. त्यानंतर नगरसेवकांनी गोळा केलेल्या काहींकडे कर भरल्याची पावती नसल्याने त्यांना कचरापेटी देतांना अनेक अडचणीही येतात. त्यामुळे वाटपाची प्रक्रिया आणखी संथ होते. स्मार्ट सिटीचा हा उपक्रम असल्याने एकाच ठिकाणी एकत्रित उद्घाटन करून प्रतिदिन वाटप होऊ शकले असते; मात्र नगरसेवकांच्या आडमुठेपणामुळे मोठा समारंभ करून वाटप होत असल्याने याची गती मंदावली. काही ठिकाणी तर पावती नसलेल्या नागरिकांनाही कचरापेटी देण्याचा आग्रह होत असल्याने अनेकांना पावतीविना भाडेकरूचा (कोड नंबर) आणि आधार क्रमांक घेऊन त्यांना कचरापेटी वाटप करण्यात येत आहे. याहूनही हद्द म्हणजे एका नगरसेविकेच्या पतीने त्यांच्या प्रभागात कचरापेटी वाटपासाठी अधिकार्‍यांवर दबाव निर्माण करून कर भरल्याची पावती नसलेल्यांनाही कचरापेटी देण्याचा हट्ट धरला. आता याला काय म्हणावे ?

या सर्व प्रकारानंतर असे वाटते की, छोट्याशा कचरापेटी वाटपासाठी एवढा सावळा गोंधळ होत असेल आणि कामाची गती मंदावत असेल, तर अन्य नियोजित अन् अधिक वेळ लागणार्‍या विकासकामांचे कसे होत असेल ? ही दु:स्थिती दूर करण्यासाठी संकुचित विचार बाजूला सारून ‘सर्व कामे माझीच आहेत’, हा विचार वाढवणे आवश्यक आहे. कचरापेटी वाटप कोणत्याही राजकीय हेतूने न होता त्याचा उद्देश ‘स्वच्छ सोलापूर’ हा आहे. तो साध्य होण्यासाठी राजकीय गोष्टी आणि बडेजाव यांना फाटा देत सर्वांनीच प्रयत्न केल्यास काही अंशी तरी उद्देश साध्य होण्यासाठी दिशा मिळाली, असे होईल.

– श्रीमती वर्षा कुलकर्णी, सोलापूर

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now