भारतीय वंशाचे नोबेल विजेते साहित्यिक व्ही.एस्. नायपॉल यांचे निधन

लंडन – नोबेल पारितोषिक विजेते आणि भारतीय वंशाचे ज्येष्ठ साहित्यिक विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल यांचे ११ ऑगस्टला लंडन येथील त्यांच्या घरी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. १७ ऑगस्ट १९३२ या दिवशी त्रिनिदाद (वेस्टइंडिज) येथे जन्मलेल्या नायपॉल यांच्या रचनांमध्ये त्रिनिदादपासून लंडनपर्यंतचा प्रवास आणि विविध देशांतील प्रवासाचा प्रभाव जाणवतो. नायपॉल यांच्या वंशजांना भारतातून वेस्टइंडिजमध्ये बलपूर्वक मजुरीसाठी आणण्यात आले होते.

मुसलमान आक्रमकांनी भारताची कधीही न भरून येणारी हानी केली ! – व्ही.एस्. नायपॉल

नायपॉल यांनी भारतीय इतिहासावर अनेक पुस्तके लिहिली. त्यांनी एका मुलाखतीत असे म्हटले होते, ‘जेव्हा कुणी म्हणते ‘मुसलमान जेव्हा भारतात आले..’ तेव्हा त्याची कीव येते. ‘मुसलमान भारतात एका पर्यटकासारखे आले आणि गेले’, असे नाही. त्यांनी १ सहस्र वर्षे येथे राज्य केले. या काळात भारतातील मंदिरे आणि मूर्ती, वास्तूशास्त्राचे अजोड नमुने, कला आणि इतर विषयांवरील बहुमूल्य ग्रंथ यांची कधीही न भरून येणारी हानी केली. येथील जनतेला गुलाम केले आणि काही रुपयांत विकले. त्यांनी त्यांच्या विजयाला श्रद्धेचा विजय मानला. या आधीही भारतावर आक्रमणे झाली; मात्र त्याची तुलना मुसलमान आक्रमणाशी करता येऊ शकत नाही. त्या काळाचा इतिहासही उपलब्ध नाही; कारण विजेतेच इतिहास लिहितात. पराभूत केवळ त्या काळाला अंधारयुग म्हणून पाळतात. वर्ष १५६५ मध्ये मुसलमान आक्रमकांनी विजयनगर साम्राज्याची धूळधाण केली. अकबराने ओडिशा राज्यात धुमाकूळ घातला. अत्यंत श्रीमंत असलेली ही दोन्ही राज्ये होत्याची नव्हती झाली. तेथे आजही गरिबी आहे. ख्रिस्ती लोकांनी मात्र अशी हानी केली नाही. त्यांच्यासमवेत शिक्षणाची नवी पद्धत आली. त्यांच्या राज्यकर्त्यांत वैयक्तिक  श्रद्धेचा भाग होता. त्याच्या पाठोपाठ मिशनरी भारतात आले; मात्र या सर्वांनी भारताच्या समृद्ध परंपरेचा मुसलमानांसारखा विनाश केला नाही.’ (ख्रिस्ती असलेल्या ब्रिटिशांनीही भारताची सांस्कृतिक आणि धार्मिक हानी केली, हा इतिहास बहुदा नायपॉल यांना ठाऊक नसावा. तरीही एका भारतीय वंशाच्या नोबेल पारितोषिक विजेत्या व्यक्तीला धर्मांधांविषयी जे लक्षात आले, ते भारतातील एकाही निधर्मीवादी, पुरोगामी यांना कळत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF