(म्हणे) ‘आरक्षण पालटण्याचा विचार नाही !’ – पंतप्रधान मोदी

आरक्षण म्हणजे गुणवत्ता असणार्‍यांना डावलून गुणवत्ता नसणार्‍यांना संधी देणे होय ! यामुळेच गेल्या ७० वर्षांत देशाची सर्वच स्तरावर अधोगतीच झाली आहे  आणि गुणवत्ता असणारे परदेशात जाऊन विदेशांचे भले करत आहेत, हे  सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद आहे !

नवी देहली – जातनिहाय आरक्षणात कोणताही पालट करण्याचा सरकारचा विचार नाही. त्यामुळे याविषयी कोणीही मनात शंका ठेवू नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वप्ने हीच देशाची शक्ती आहे. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ पहिले १० वर्षेच आरक्षण ठेवण्याची सूचना केली होती; मात्र सर्व राजकीय पक्षांनी स्वार्थासाठी गेली ६ दशके आरक्षणाला मुदतवाढ दिली, हे सत्य आहे. – संपादक) ‘सबका साथ, सबका विकास’ या आमच्या उद्देशानुसार डॉ. आंबेडकर यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. (आरक्षणामुळे कधीतरी देशातील सर्व समाजाची साथ सरकारला मिळेल का ? – संपादक) याद्वारे देशातील गरीब, पीडित, मागास, आदिवासी आणि ओबीसी (इतर मागासवर्ग) समाजाचे हित जपणे आमच्यासाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एएन्आय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले. (जातीपातीच्या आधारे नव्हे, तर एक भारतीय म्हणून प्रत्येक नागरिकाचे हित जपणे शासनकर्त्यांचे कर्तव्य आहे ! – संपादक)

मोदी यांनी अन्य विषयांवर मांडलेली भूमिका 

१. देशात सध्या जमावाकडून मारहाणीच्या ज्या घटना घडत आहेत, त्या अत्यंत दुर्दैवी आहेत. यावरून कोणीही राजकारण करू नये. सर्वांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजात शांतता निर्माण करणे आवश्यक आहे. अशा मारहाणीच्या घटनांचे समर्थन होऊ शकत नाही. (मारहाणीचे समर्थन होऊ शकत नाही; मात्र मारहाण का होते, याचाही तत्त्वनिष्ठतेने विचार करणे आवश्यक आहे आणि त्यामुळेच ही समस्या सोडवता येऊ शकते ! – संपादक)

२. आसामच्या राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या सूचीत ज्या नागरिकांची नावे नाहीत, त्यांना त्यांचे नागरिकत्व सिद्ध करण्याची पूर्ण संधी दिली जाईल. त्यामुळे कोणत्याही भारतीय नागरिकाला देश सोडावा लागणार नाही. ज्या लोकांचा स्वतःवर विश्‍वास नाही, देशातील महत्त्वाच्या संस्थांवर ज्यांचा विश्‍वास नाही, असेच लोक देशाचे तुकडे करण्याची भाषा करतात.

३. गेल्या वर्षी १ कोटी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात सरकारच्या विविध योजनांचा समावेश आहे. या योजनांमुळे रोजगार निर्माण झाले नाहीत का ?

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now