मुंबईसह देशातील बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर काढा, तसेच ‘गेट वे ऑफ इंडिया’ हे नाव पालटून ‘भारत द्वार’असे नामकरण करा !

दादर, भाईंदर आणि सानपाडा येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात मागणी

राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे राष्ट्राभिमान जोपासणार्‍या राष्ट्रप्रेमींचे अभिनंदन !

दादर स्थानकाबाहेर आंदोलन करतांना राष्ट्रप्रेमी

मुंबई, १२ ऑगस्ट (वार्ता.) – आसाममध्ये बांगलादेशी घुसखोर कोण ? आणि मूळ आसामी नागरिक कोण ?, याची माहिती देणारी ‘राष्ट्रीय नागरिक नोंदणी’ची प्राथमिक सूची प्रसिद्ध झाली. आसामप्रमाणेच मुंबईमध्ये ठिकठिकाणी बांगलादेशी घुसखोर शिरले आहेत. या घुसखोरांना बाहेर काढा. मुंबईचा मानबिंदू असलेल्या कमानीचे इंग्रजांनी केलेले ‘गेट वे ऑफ इंडिया’ हे नाव पालटून ‘भारत द्वार’, असे करण्यात यावे, अशा मागण्या ११ ऑगस्ट या दिवशी दादर (मुंबई), भाईंदर (ठाणे) आणि सानपाडा (नवी मुंबई) येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात करण्यात आल्या.  या आंदोलनांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल, श्री शिवकार्य प्रतिष्ठान हिंदुस्थान, गोरक्षा समिती, विश्‍व सनातन सेना (नवी मुंबई), हिंदुस्थान नॅशनल पार्टी, हिंदु जनजागृती समिती आदी हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि इंटरनल हिंदू फाऊंडेशन, वारकरी संप्रदाय, योग वेदांत सेवा समिती, सनातन संस्था आदी आध्यात्मिक संस्था, तसेच श्री रामगणेश मित्रमंडळ यांसारखी स्थानिक मंडळे यांचे कार्यकर्ते यांसह बहुसंख्येने राष्ट्रप्रेमी नागरिक सहभागी झाले होते.

आंदोलनातील अन्य मागण्या

१. ‘बकरी ईद’च्या दिवशी होणारी गोहत्या रोखण्यासाठी प्रशासनाने सतर्क राहून ठिकठिकाणी टेहळणीसाठी पोलीस पथके सिद्ध ठेवावीत. शासन आदेशानुसार शासकीय पशूवधगृहांच्या व्यतिरिक्त अन्यत्र कुठेही प्राण्यांची हत्या करता येत नाही. त्यामुळे ‘बकरी ईद’च्या निमित्ताने तात्पुरते पशूवधगृह उभारण्यास अनुमती देऊ नये.

२. सलमान खान निर्मित चित्रपटाचे ‘लवरात्री’ हे नाव हेतूतः हिंदूंच्या ‘नवरात्री’ उत्सवावरून ठेवले आहे, म्हणजे हिंदू त्याला विरोध करतील आणि वाद निर्माण करून चित्रपटाचा धंदा अधिक चालेल. ‘लवरात्री’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही ‘तिला पटवण्यासाठी तुझ्याकडे ९ दिवस आणि ९ रात्रीच आहेत’, असे संवाद असल्याने ‘हिंदूंचे धार्मिक उत्सव हे प्रेमप्रकरणे करण्यासाठीच असतात’, असा चुकीचा संदेश यातून जात आहे. त्यामुळे या चित्रपटाचे नाव त्वरित पालटण्यात यावे.

३. उत्तरप्रदेशमधील देवरिया येथील सरकारी शाळेचे नाव पालटून ‘इस्लामिया प्रायमरी स्कूल’ केले गेले, तसेच अन्य ४ सरकारी शाळांना शुक्रवारी सुट्टी घोषित करण्यात आली. हा भारताचे पद्धतशीरपणे ‘इस्लामीकरण’ करण्याच्या षड्यंत्राचा भाग आहे. त्यामुळे शासनाने देशभरातील सर्व शाळांचे या दृष्टीने अन्वेषण करावे आणि भारताचे इस्लामीकरण रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत.

या मागण्यांच्या निवेदनांवर नागरिकांच्या स्वाक्षर्‍या घेण्यात आल्या असून ही निवेदने शासनाकडे सुपुर्द करण्यात येणार आहेत.

(तिन्ही ठिकाणच्या आंदोलनांचा सविस्तर वृत्तांत लवकरच प्रसिद्ध करत आहोत.)

क्षणचित्र : दादर येथील आंदोलनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (राष्ट्रप्रेमींच्या शांततामार्गाने होणार्‍या आंदोलनाच्या ठिकाणी बंदोबस्त करण्याऐवजी धर्मांधांच्या कार्यक्रमांच्या ठिकाणी असा बंदोबस्त केल्यास पोलिसांचा वेळ राष्ट्राच्या कारणी लागेल ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now