१ ऑगस्ट २०१८ या दिवशी शुक्र ग्रहाचा कन्या राशीत प्रवेश आणि त्या कालावधीत होणारे परिणाम

‘बुधवार, १.८.२०१८ (आषाढ कृष्ण पक्ष चतुर्थी) या दिवशी दुपारी १२ वाजून २७ मिनिटांनी शुक्र या ग्रहाने कन्या या त्याच्या नीच राशीत प्रवेश केला आहे. शुक्र हा ग्रह एका राशीत एक मास रहातो. या एका मासातील मधल्या सात दिवसांमध्ये अधिक परिणामकारक फळ मिळते. १ ऑगस्टपासून १ सप्टेंबरपर्यंत शुक्र कन्या राशीत असून १ सप्टेंबर या दिवशी रात्री ११ वाजून २८ मिनिटांनी तो तूळ राशीत प्रवेश करणार आहे.

सौ. प्राजक्ता जोशी

१. कन्या राशीत शुक्र ग्रह नीच मानण्याचे कारण

कन्या रास ही पृथ्वीतत्त्वाची रास आहे. तिचा स्वामी बुध आहे. त्यामुळे कन्या राशीत चिंतन, मनन, अभ्यासू वृत्ती, चिकित्सकपणा, स्वच्छता इत्यादी बौद्धिक गुणधर्म आहेत. शुक्र जलतत्त्वाचा आणि स्त्रीकारक ग्रह आहे. शुक्राला त्याचे सुख, सौंदर्य, विलास, कला, विषयवासना, हर्ष हे शृंगारिक गुणधर्म प्रकट करण्यास कन्या राशीत वाव मिळत नाही. त्यामुळे कन्या राशीत शुक्र ग्रह अशुभ मानला गेला आहे.

२. राशीपरत्वे शुक्राची स्थाने

कन्या राशीत प्रवेश केलेला शुक्र कन्या राशीला पहिला, सिंह राशीला दुसरा, कर्क राशीला तिसरा, मिथुन राशीला चौथा, वृषभ राशीला पाचवा, मेष राशीला सहावा, मीन राशीला सातवा, कुंभ राशीला आठवा, मकर राशीला नववा, धनु राशीला दहावा, वृश्‍चिक राशीला अकरावा आणि तूळ राशीला बारावा आहे.

३. आध्यात्मिक दृष्टीकोनातून शुक्राचे महत्त्व

अध्यात्मात ‘भावा’ला पुष्कळ महत्त्व आहे. आपण हे वाक्य अनेकदा ऐकतो, ‘साधनेच्या प्रयत्नांमध्ये ‘भावाचा ओलावा’ हवा.’ भाव म्हणजे देवाप्रती असणारे प्रेम ! प्रेम हे शुक्राचे वैशिष्ट्य आहे; कारण शुक्र हा जलतत्त्वाचा कारक आहे आणि रस हा त्याचा गुण आहे. अध्यात्मातील रस म्हणजे ‘भाव’. येथे लक्षात घ्यावयाची गोष्ट अशी की, शुक्राच्या प्रेमाला गुरु ग्रहाच्या सत्त्वगुणाची जोड हवी. अन्यथा ते प्रेम केवळ एखाद्या व्यक्तीवरील असेल, देवावरील नव्हे ! त्यामुळे कुंडलीत शुक्र आणि गुरु यांची स्थिती चांगली असून त्यांच्यात शुभयोग होत असेल, तर ती व्यक्ती भावाने युक्त असेल. तत्त्वदृष्ट्या विचार करायचा झाला, तर गुरु हा आकाशतत्त्वाचा आणि शुक्र हा जलतत्त्वाचा ग्रह आहे. आकाशतत्त्व हे पंचतत्त्वांपैकी सर्वांत श्रेष्ठ तत्त्व होय. आकाशतत्त्व आणि जलतत्त्व यांचा संगम झाल्यास भावाची निर्मिती होते !

४. ऐहिक दृष्टीकोनातून शुक्राचे महत्त्व

मानवाचे जीवन रसपूर्ण असेल, तर तो सुखाने जीवन व्यतीत करतो. शुक्र जलतत्त्वाचा कारक असून जलतत्त्वाचा गुण ‘रस’ आहे. (अध्यात्मातील रस म्हणजे भाव.) त्यामुळे शुक्र हा सौख्याचा कारक ग्रह मानला गेला आहे. शुक्राच्या अधिपत्याखाली प्रेम, कला, कवित्व, धन, विवाह, सौंदर्य, वासना, वीर्य इत्यादी गोष्टी येतात. ज्या गोष्टींमुळे शारीरिक किंवा ऐहिक सुख मिळते, अशा बहुतेक गोष्टी शुक्राच्या अधिपत्याखाली येतात. कुंडलीत शुक्राची स्थिती चांगली असतांना व्यक्तीचे जीवन सुखवस्तू असते, तर स्थिती चांगली नसतांना जीवन कष्टप्रद असते.

५. कन्या राशीतील शुक्राचे होणारे परिणाम

ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या उच्च आणि नीच राशी ठरवून दिलेल्या आहेत. ‘ग्रह जेव्हा नीच राशीत असतो, तेव्हा तो ज्या गोष्टींचा कारक आहे आणि कुंडलीतील ज्या स्थानांचा स्वामी आहे, त्यांसंबंधी अशुभ फलदायी ठरतो’, असा नियम आहे. शुक्र ग्रह विवाहाचा कारक असल्याने जर व्यक्तीच्या कुंडलीत तो सप्तम स्थानात (विवाहकारक स्थानात) कन्या राशीत असेल, तर वैवाहिक सौख्याच्या संदर्भात अशुभ फल मिळण्याची शक्यता असते. ‘कन्या राशीत शुक्र असता कन्या राशीचा अधिपती बुध ग्रह कोणत्या राशीत आहे आणि व्यक्तीच्या जन्मकुंडलीत (लग्नकुंडली) हे ग्रह कसे आहेत ?’, हे अभ्यासणे महत्त्वाचे असते.

५ अ. शारीरिक परिणाम

१. प्राणशक्ती उणावणे (थकवा जाणवणे)

२. त्वचाविकार होणे

३. घशाला कोरड पडणे

४. स्त्रियांचे आजार वाढणे

५ आ. मानसिक परिणाम

१. उदास वाटणे

२. मानसिक त्रास होणे

३. वासनेचे विचार वाढणे

५ इ. आध्यात्मिक परिणाम

१. साधनेपेक्षा मायेतील विचारांचे प्रमाण वाढणे

२. साधनेच्या प्रयत्नांतील सातत्य उणावणे

६. ग्रहांच्या अशुभ स्थितीत साधनेचे महत्त्व

गोचर कुंडलीतील (चालू ग्रहमानावर आधारित कुंडलीतील) ग्रह अशुभ स्थितीत असेल, तर साधना न करणार्‍या व्यक्तीला अधिक त्रास होण्याचा संभव असतो. याउलट साधना करणार्‍या व्यक्तीला सात्त्विकतेमुळे ग्रहांच्या होणार्‍या अशुभ परिणामांचा फारसा त्रास होत नाही. या कालावधीत अधिकच त्रास होत असेल, तर कुलदेवतेची उपासना करावी.

अध्यात्मातील एक वैशिष्ट्य असे आहे की, अनुकूल काळापेक्षा प्रतिकूल काळात केलेल्या साधनेमुळे आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होते. त्यामुळे साधकांनी अशुभ ग्रहस्थितीचा मनावर परिणाम करून न घेता साधनेचे प्रयत्न अधिकाधिक वाढवण्याकडे लक्ष द्यावे.’

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.८.२०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now