मराठा आरक्षणासाठी केलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला हिंसक वळण !

  •  पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड !

  •  सिंधुदुर्ग येथे एस्.टी. बस जाळण्याचा प्रयत्न

  •  हिंगोली येथे बस जाळली !

  •  नाशिक येथे एस्.टी. गाड्यांची तोडफोड !

  •  संभाजीनगर येथे पोलिसांची गाडी आणि अन्य दोन वाहने पेटवली !

  • आंदोलनाला हिंसक वळण लागू देणारे प्रशासन आणि पोलीस जनहित साधू शकतील का ? यापूर्वी केलेल्या आंदोलनांची पार्श्‍वभूमी लक्षात घेता या आंदोलनाच्या वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात का आल्या नाहीत ? कायदा-सुव्यवस्था राखू न शकणारी पोलीस यंत्रणा आणि प्रशासन काय कामाचे ?
  • गुणवत्ता डावलून लिंग आणि जात यांच्या आधारे दिले जाणारे आरक्षण देशाला कधीही प्रगतीपथावर नेऊ शकत नाही, हे जाणून सरकारने या संदर्भात आता ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता आहे !

मुंबई – मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने ‘महाराष्ट्र बंद’चे आयोजन करण्यात आले होते. मराठा क्रांती मोर्चाने ‘महाराष्ट्र  बंद’चे आवाहन केल्यानंतर राज्यातील अनेक ठिकाणच्या शाळा, महाविद्यालये यांनी सुट्टी घोषित केली होती. राज्य परिवहन महामंडळानेही महाराष्ट्रातील एस्टी बससेवा बंद ठेवली होती. अनेक जिल्ह्यांमध्ये सकाळी ९ वाजल्यापासूनच इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी राज्यातील पोलीसदलाने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता; मात्र राज्यात काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे दिसून आले. पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड करण्यात आली, तर सिंधुदुर्ग येथे राज्य परिवहन महामंडळाची बस जाळण्याचा प्रयत्न केला. हिंगोली येथे बसगाडी जाळण्यात आली, तर नाशिक येथे राज्य परिवहनाच्या बसगाड्यांवर दगडफेक करण्यात आली. येथे मराठा आंदोलकांच्या दोन गटांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली.

आमदार त्र्यंबक भिसे यांना धक्काबुक्की !

लातूर येथे आमदार त्र्यंबक भिसे यांना आंदोलनकर्त्यांकडून धक्काबुक्की करण्यात आली, तसेच त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. संभाजीनगर येथे पोलिसांची गाडी आणि अन्य दोन गाड्या पेटवण्यात आल्या. नागपूर येथे एका आंदोलकाने रेल्वेखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबीटकर यांनी आंदोलनाला पाठिंबा म्हणून विधानभवनात जाऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्यांना प्रवेशद्वाराजवळच रोखले. पोलीस आणि प्रशासन यांच्या वतीने आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत असूनही अनेक ठिकाणी जमाव आक्रमक झाल्याचे दिसून आले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now