पाश्‍चात्त्य देशांतील एक प्रथितयश गायिका म्हणून स्वच्छंदी जीवन जगतांना अनुभवलेले दुःखमय प्रसंग आणि साधनेला आरंभ केल्यावर लाभलेला पुनर्जन्म यांविषयी एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका मायासम नाहस यांनी प्रांजळपणे व्यक्त केलेले मनोगत !

४ ते १० ऑगस्ट या कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात चालू असलेल्या ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’च्या कार्यशाळेच्या निमित्ताने…

सौ. मायासम नाहस

‘मी वर्ष १९९९ ते २०१४ या कालावधीत पश्‍चिमेतील राष्ट्रांमध्ये एक प्रथितयश गायिका होते. संगीत क्षेत्रात व्यतीत केलेल्या जीवनाच्या या टप्प्याविषयी मला सांगायचे आहे. पैसा आणि प्रसिद्धी यांचे हे आकर्षक जगत् सामान्य जनतेने पाहिलेले स्वप्न असते. त्यामुळे प्रसिद्ध व्यक्तींना पाहून ‘यांच्याकडे जगातील सर्व सुखे आहेत’, असा विचार त्यांच्या मनात येणे साहजिक आहे. प्रत्यक्षात मात्र ‘असूनी सर्वकाही, दारिद्य्र असे अंतरी’, अशी आमची अवस्था असते.

१. सारे कुटुंबच संगीतप्रेमी असल्याने स्वाभाविकपणे तेच क्षेत्र निवडणे आणि ऐन तारुण्यात संगीत क्षेत्रात प्रवेश करणे

ऐन तारुण्यात मी संगीत क्षेत्रात प्रवेश केला. त्या वेळी मला ‘माझ्या वयाच्या इतर मुलींसारखे ‘कोणावर तरी निस्सीम प्रेम करावे. कोणीतरी माझ्या प्रेमाला त्याच उत्कटतेने प्रतिसाद द्यावा. मी यशाच्या शिखरावर आरूढ व्हावे’, असे वाटायचे. विशीत असतांना मला माझे पहिले गाणे ध्वनीमुद्रित करण्याची संधी मिळाली. पहिल्या वेळी माझे वडील मला ध्वनीमुद्रणासाठी घेऊन गेले होतेे. माझे सारे कुटुंबच संगीतप्रेमी आहे; किंबहुना संगीत ही आमच्या कुटुंबाची विशेष ओळख आहे. त्यामुळे मी संगीत क्षेत्र निवडणे, हे स्वाभाविक होते. माझे कुटुंबीयही माझ्या या क्षेत्रातील यशाविषयी आशावादी असल्याने त्यांनाही ‘माझी निवड योग्य आहे’, असे वाटत होते.

२. संगीत क्षेत्रात प्रवेश केल्यावर पहिल्या भावी पतीची भेट होऊन त्याच्याशी विवाह होणे आणि मिळकत मर्यादित असल्याने लहानसहान गोष्टीही नियोजनपूर्वक करणे

त्या वेळी मी खरोखरच निरागस होते आणि माझ्या आचार-विचारांत निर्मळता होती. ‘प्रसिद्धीचे हे क्षेत्र भविष्यात मला कुठे घेऊन जाणार आहे ?’, याची तेव्हा मला पुसटशीही कल्पना नव्हती. या क्षेत्रात प्रवेश केल्यावर अल्पावधीतच माझी पहिल्या भावी पतीशी भेट झाली. नंतर आमचा प्रेमविवाह होऊन आम्हाला मुलगा झाला. माझे पती याच क्षेत्रातील असल्यामुळे आम्ही दोघांनी आयुष्य आणि व्यवसाय यांविषयी पुष्कळ स्वप्ने पाहिली. त्या काळात आमची मिळकत मर्यादित असल्याने आम्ही जीवनातील लहानसहान गोष्टीही नियोजनपूर्वक करायचो.

३. गायनाच्या क्षेत्रात पुष्कळ प्रसिद्धी मिळाल्यावर व्यक्तीगत आयुष्यात झालेली घसरण !

३ अ. प्रसिद्धी, आर्थिक सुबत्ता, तसेच मिळालेले यश यांमुळे वास्तवापासून लांब जाणे : विवाह झाल्यानंतर एका वर्षाने मला गायनाच्या क्षेत्रात पुष्कळ प्रसिद्धी मिळू लागली आणि त्यासमवेत मायेतील आकर्षणेही वाढू लागली. या काळात कार्यक्रमाच्या निमित्ताने माझा युरोप आणि मध्य पूर्व येथे पुष्कळ प्रवास व्हायचा. साहजिकच तेव्हा पैशाचा ओघही पुष्कळ होता. दिवसागणिक मिळणारी प्रसिद्धी, आर्थिक सुबत्ता, तसेच मिळालेले यश माझ्या डोक्यात जाऊ लागले (माझा अहंभाव वाढू लागला.) आणि मी वास्तवापासून लांब जाऊ लागले.

३ आ. धन मिळवण्याची लालसा वाढणे आणि अन्य गायिकांविषयी असूया निर्माण होणे : त्या काळात मला ‘अधिकाधिक धन मिळवावे’, असे वाटत असे. ‘मानधन अल्प आहे’, या कारणावरून मी कित्येक संगीत समारंभांत गायला नकार दिला. प्रत्यक्षात ‘एका संगीत समारंभाच्या मिळकतीतून कित्येक कुटुंबांचा वर्षभराचा चरितार्थ चालू शकतो’, याची मला जाणीव होती; परंतु माझी धन मिळवण्याची लालसा वाढली होती. या समारंभातून गाणार्‍या आणि माझ्यापेक्षा अधिक मानधन मिळवत असलेल्या प्रत्येक गायिकेविषयी मला असूया वाटे, जी मी उघडपणे दाखवत नसे. ‘इतर गायकांपेक्षा स्वतःला अधिक यश, धन आणि प्रसिद्धी मिळावी’, असे मला वाटत असे. ‘वाईट शक्ती माझ्यातील या स्वभावदोषांचा लाभ घेऊन मला पापमय आयुष्याच्या गर्तेत ढकलत आहेत’, याची मला पुसटशीही कल्पना त्या वेळी आली नाही.

३ इ. बाह्य सौंदर्याविषयी सतर्कता वाढणे आणि मायेत अधिकाधिक अडकत जाणे : गाण्यासमवेतच बाह्य सौंदर्याविषयीही मी पुष्कळ सतर्क होते. मी इतरांपेक्षा ‘अधिक सुंदर, आकर्षक आणि सडपातळ दिसावे’, यासाठी मी प्रयत्न करत असे. माझ्याकडे ‘इतरांपेक्षा अधिक दागिने आणि कपडे असावेत’, असे मला वाटे. अशा प्रकारे मी मायेत अधिकाधिक अडकत चालले होते.

३ ई. घटस्फोट झाल्यामुळे दिशाहीन होणे, आसपासच्या लोकांनी याचा लाभ घेणे आणि त्यातच मादक पदार्थांच्या आहारी गेलेल्या लोकांशी संबंध येणे : यातच माझा घटस्फोट झाला आणि मी दिशाहीन झाले. या परिस्थितीमुळे माझ्या आसपासचे लोक माझा लाभ घेऊ लागले. तशातच मादक पदार्थांच्या आहारी गेलेल्या लोकांशी माझा संबंध आला. मी ते पदार्थ सेवन करून पाहिले; परंतु केवळ देवाच्या कृपेने त्या व्यसनाच्या आहारी गेले नाही. अन्यथा माझे आयुष्य अंधःकारमय झाले असते. तेथे मद्यपानही चालत असे. माझ्या भोवताली असणारे सर्व लोक मादक पदार्थ आणि कामवासना यांचे गुलाम होते. माझ्या मते वाईट शक्ती या दोन कुप्रसिद्ध माध्यमांंच्या साहाय्याने व्यक्तीवर नियंत्रण मिळवतात.

३ उ. मनोकायिक आजाराने ग्रासणे : त्या काळात मी अन्न वर्ज्य केल्यातच जमा असल्याने माझे वजन केवळ ४८ कि.ग्रॅ. झाले होते. मला ‘एनोरेक्सिया’ (वजन वाढू नये; म्हणून कमी खाण्याचा मनोकायिक आजार) झाला होता; पण त्या वेळी मी हे मान्य करत नसे.

३ ऊ. ‘खरे प्रेम पैशाने मिळू शकत नाही’, याची जाणीव होणे : जीवनात अनुभवत असलेली पोकळी भरून काढण्यासाठी मी प्रेमाच्या शोधात होते. माझ्याकडे मुबलक असलेले धन देऊन मी प्रेम मिळवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांत मी कित्येक अपात्र लोकांना धन दिले; पण ‘खरे प्रेम पैशाने मिळू शकत नाही’, याची मला जाणीव झाली. या काळात मी माझ्या कुटुंबियांपासूनही पुष्कळ दूर गेले होते.

३ ए. ज्योतिषशास्त्र आणि परलोकातील आत्म्यांशी संवाद साधणार्‍या माध्यमांनी जीवनात प्रवेश करणे अन् भविष्य जाणून घेण्याच्या वेडापायी त्यांच्या आहारी जाऊन पुष्कळ पैसे खर्च करणे : जीवनाच्या या टप्प्यावर मी अधिकाधिक वहावत जाऊन वास्तवापासून दूर जात होते. त्यातच माझा परिचय भविष्य सांगणारे, परलोकातील आत्म्यांशी संवाद साधणारे इत्यादी माध्यमांशी (‘मिडीयम्स’शी) झाला. ते लोक सांगत, त्याप्रमाणे मी वागू लागले. मादक पदार्थ घेणार्‍या व्यक्तीला ज्याप्रमाणे तो पदार्थ घेतल्याविना चैन पडत नाही, तशीच माझी अवस्था झाली होती. ‘आयुष्यात काय करावे ?’ आणि ‘माझे पुढे काय होईल ?’, यांसारखे प्रश्‍न विचारून त्यांच्याकडून येणार्‍या उत्तरांची मी चातकासारखी वाट पहात असे. पुढे माझे हे वेड पुष्कळ वाढले. मी ‘टॅरोट’ (यामध्ये पत्त्यांप्रमाणे असलेल्या कार्डांच्या आधारे जीवनातील प्रश्‍नांची उत्तरे कथन केली जातात.), ‘हस्तरेषा’, ‘कॉफी मार्क (फलज्योतिषाचा एक प्रकार)’ आणि ‘लोलक चिकित्सा’ या पद्धतींद्वारे भविष्य सांगणारे, तसेच मृत आत्म्यांशी संवाद साधणारे, अशा सर्वांकडे जात असे. प्रतिदिन मी त्यांना भेटत असे. काही प्रसंगी तर दिवसातून अनेकदा मी त्यांच्याकडे जात असे आणि प्रत्येक भेटीच्या वेळी त्यांना पुष्कळ पैसेही देत असे. ‘ही सर्व माणसे दुष्ट प्रवृत्तीची असतात अन् एखाद्या व्यक्तीला मायेच्या जगात गुरफटवून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न असतो’, हे आता मला समजले आहे.

४. भूतकाळात डोकावल्यावर स्वतःच्या अधोगतीविषयी झालेले चिंतन !

४ अ. जीवन पूर्णपणे भरकटले असतांना ‘देवाने त्यातून का बाहेर काढले असेल ?’, हा प्रश्‍न सतावणे : हे मनोगत सांगतांना ‘पूर्वी माझे जीवन पूर्णपणे भरकटले होते’, याची मला जाणीव झाली. एवढी पापे करूनही देवाने माझ्यावर कृपा केली, याचेच मला राहून राहून आश्‍चर्य वाटते. बुद्धीने विचार केल्यास मी या कृपेला पात्र नाही; परंतु ईश्‍वर प्रीतीचा सागर असल्याने आपण कितीही पापे केली, तरी तो आपल्यावर कृपाच करतो. ‘देवाने मला यातून का बाहेर काढले असेल ?’, या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न करत आहे.

४ आ. ‘पापाच्या गर्तेकडे घेऊन जाणार्‍या स्वतःच्या चुकांमुळे त्रास सहन करावा लागला’, याची जाणीव होणे : माझ्यात असलेले ‘लोभीपणा’ आणि ‘असूया’ हे स्वभावदोष, त्यातच मी व्यसनाधीन लोकांशी मैत्री केली. मी मादक द्रव्ये घेऊ लागले. धूम्रपान आणि मद्यपान करू लागले. ही यादी पुष्कळ मोठी आहे. पापाच्या गर्तेत घेऊन जाणारे अयोग्य निर्णय आणि त्यांमुळे माझ्याकडून झालेल्या चुका, घडलेली पापे आदी गोष्टींचे दायित्व सर्वस्वी माझे आहे. यामुळेच मला हा त्रास सहन करावा लागला.

४ इ. ‘देव स्वतःला का वाचवत आहे ?’, असा प्रश्‍न पडणे : ‘एवढे सर्व घडूनही देव मला का वाचवत आहे ?’, असा प्रश्‍न मला पडत होता. गायिका होण्यापूर्वी माझ्यात प्रेमभाव, दानशूरपणा, समजूतदारपणा आणि इतरांचा विचार करणे, यांसारखे चांगले गुणही होते; परंतु गायिका झाल्यानंतर मात्र क्वचित्च त्यांची अभिव्यक्ती होत होती. कदाचित् माझ्यातील या गुणांमुळेच एवढी पापे करूनही देव मला सुधारण्याची अजून एक संधी देत असावा !

५. पुनर्विवाह आणि साधनेला आरंभ !

५ अ. नऊ वर्षांपूर्वी पुनर्विवाह होऊन आयुष्य सावरणे : नऊ वर्षांपूर्वी माझा दुसरा विवाह झाला. माझे दुसरे पती आणि माझा मुलगा, हे मला मिळालेला देवाचा आशीर्वाद आहे. आयुष्यातील कठीण काळात माझा मुलगा माझ्यासाठी आशेचा किरण होता. तो नसता, तर माझे आयुष्य रसातळाला गेले असते. मला माझ्या कटू भूतकाळातून बाहेर काढण्यासाठीच देवाने या दोघांना पाठवले असावे. या दोहोंच्या रूपाने माझ्या आयुष्यात देवाने पुन्हा प्रेम निर्माण केले आणि मला जगण्याची आणखी एक संधी दिली.

५ आ. प्रतिदिन चर्चमध्ये जाणे आणि ख्रिस्ती पंथाप्रमाणे साधना करणे; पण मनात अनेक प्रश्‍न उद्भवूनही धर्मगुरूंकडून त्यांची समाधानकारक उत्तरे न मिळणे : मी जन्माने ख्रिस्ती आहे. त्यामुळे मी प्रतिदिन चर्चमध्ये जाते. गत आयुष्यात स्वच्छंदी जीवन जगत असतांनाही माझा हा नेम कधी चुकला नाही. ते पापमय जीवन जगतांनाही मी देवाला खूप आळवत असे. देव प्रत्येक भक्ताची प्रार्थना ऐकतो; तशीच त्याने माझीही प्रार्थना ऐकली असावी ! पुढील चार वर्षे मी प्रामाणिकपणे जीझस् आणि मेरी यांच्यावर श्रद्धा ठेवून ख्रिस्ती पंथाप्रमाणे साधना केली. त्या वेळी ‘जगात अन्याय का आहे ? पापी लोक आनंदात आणि सज्जन लोक त्रास का सहन करत आहेत ? देवाला सातत्याने प्रार्थना करूनही मी निराश आणि कंटाळलेली का असते ?’ इत्यादी प्रश्‍न माझ्या मनात उद्भवत असत. या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे धर्मगुरु मला कधीही देऊ शकले नाहीत. वास्तविक शंकानिरसन हा साधनेच्या प्रवासाचा पाया आहे; परंतु मी मात्र असमाधानीच राहिले.

 ६. ‘साधनेमुळे पुनर्जन्म झाला’, असे वाटणे आणि ‘यापुढील जीवन स्वेच्छेने नाही; तर ईश्‍वरेच्छेने जगायचे’, असा निर्धार करणे

साधनेला आरंभ केल्यानंतर ‘कधीकाळी मी एक गायिका होते आणि पापमय जीवन जगत होते’, या गोष्टीचाही मला विसर पडतो. माझा जणू पुनर्जन्मच झाला आहे. माझे ३५ टक्के क्रियमाण मी ईश्‍वरचरणी अर्पण करून माझ्यासाठी योग्य-अयोग्य निवडण्याचा भार देवावरच सोपवला आहे. पूर्वी स्वेच्छेने वागल्यामुळे मी पापाच्या गर्तेत ढकलले गेले होते. हा धडा शिकल्याने मी स्वेच्छेने नाही; तर ईश्‍वरेच्छेने वागायचे ठरवले आहे. ईश्‍वराने माझ्यासाठी घेतलेला निर्णय मला मोक्षप्राप्तीकडे घेऊन जाणारा असेल, याची मला निश्‍चिती वाटते.’

सन्मार्गावर आणून पुनरुज्जिवित केलेला एक भरकटलेला जीव,

– सौ. मायासम नाहस (२.१२.२०१७)

‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’शी संपर्क

१. एस्.एस्.आर्.एफ्.मुळे दैवी ज्ञान मिळू लागणे : मला होणार्‍या ‘थायरॉइड’च्या त्रासामुळे माझे केस पुष्कळ गळत होते. एके दिवशी मी या त्रासावरील आध्यात्मिक उपाय माहितीजालावर शोधत होते. त्या वेळी ईश्‍वराने ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि एस्.एस्.आर्.एफ्.’ यांच्या माध्यमातून प्रेम अन् मार्गदर्शन करून माझ्यावर कृपा केली. माझ्या मनातील सर्व प्रश्‍नांची उत्तरे मला मिळाली. माझी बुद्धी आणि मन यांना जे स्वप्नातही जाणून घेता आले नसते, ते दैवी ज्ञान मला या संकेतस्थळाच्या माध्यमातून मिळू लागले.

२. सतत येणार्‍या निराशेवर मनोविकार आणि मानसोपचार तज्ञ यांनी उपचार करूनही निराशा दूर न होणे अन् एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळामुळे निराशा आणि थकवा यांमागील कारणे लक्षात येणे : मला होणार्‍या त्रासांवर मात करण्यासाठी मी ५ मनोविकार तज्ञ आणि ३ मानसोपचार तज्ञ यांच्याकडून उपचार करून घेतले होते. या कालावधीत ५ वेळा माझी निराशा दूर करणारी औषधे (अँटी डिप्रेसंट) पालटली गेली; परंतु माझी निराशा दूर झाली नाही. ‘माझ्या आयुष्यात कोणतीही समस्या नसतांना ‘मी निराश का ?’, हेच मला समजत नसे. एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाच्या माध्यमातून देवाने मला सातत्याने येणारी निराशा आणि थकवा यांमागील कारणे लक्षात आणून दिली.

३. ‘स्वतःच्या आजाराचे मूळ कारण ‘प्रारब्ध आणि वाईट शक्तींचा त्रास आहे’, हे लक्षात येणे : एस्.एस्.आर्.एफ्.च्या संपर्कात आल्यावर माझ्या आजाराचे मूळ कारण ‘प्रारब्ध आणि वाईट शक्तींचा त्रास आहे’, हे माझ्या लक्षात आले. ‘व्यक्तीच्या आयुष्यात केवळ ३५ टक्के गोष्टी त्याच्या क्रियमाणानुसार घडतात. अपवादात्मक योग्य निर्णय सोडता मी माझे क्रियमाण अयोग्य निर्णय घेण्यासाठीच वापरले. ‘जीवनातील कठीण प्रसंग हे माझे प्रारब्ध होते’, हे माझ्या लक्षात आले. ‘आपण कितीही पापे केली, तरी ईश्‍वर दयेचा महासागर असल्याने तो आपल्याला क्षमा करतो. ‘स्वतःचे ३५ टक्के क्रियमाण वापरून ईश्‍वराकडे जाण्यासाठी साधना केल्यास सर्वशक्तीमान ईश्‍वर आपले जीवन आनंदाने भारून टाकतो’, ही महत्त्वाची जाणीव होऊन मला त्याच्या क्षमाशीलतेचे दर्शन झाले !

४. संकेतस्थळावरील लिखाण वाचून शंकानिरसन करून घेणे, तसेच ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करणे : त्यानंतर मी एक मास दिवसातील कित्येक घंटे एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळावरील लिखाण वाचत होते. माझ्या मनातील अनेक शंका मी त्यांना विचारत असे. या सर्व शंकांची उत्तरे मिळाल्यानंतर नोव्हेंबर २०१६ मध्ये मी ख्रिस्ती पंथाच्या नामजपाच्या जोडीला ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करू लागले. नामजपाच्या वेळी मला काही वेळा शांत, तर काही वेळा अस्वस्थ वाटत असे. नामजपामुळे निर्माण झालेले चैतन्य आणि मला त्रास देणार्‍या वाईट शक्ती यांच्यातील संघर्षामुळे असे होत असल्याचे मला मागाहून समजले.

५. ऑनलाइन सत्संगामुळे सद्गुरु सिरियाक वाले यांचे मार्गदर्शन लाभणे : नंतर मी एस्.एस्.आर्.एफ्.च्या ऑनलाइन सत्संगाला उपस्थित राहू लागले. त्यामुळे मला पू. सिरियाक वाले (आताचे सद्गुरु सिरियाक वाले) यांचे मार्गदर्शन ऐकण्याची संधी मिळाली. त्यांनी मला साधनेत पुढे जाण्यास पुष्कळ साहाय्य केले. माझे समाधान होईपर्यंत ते न थकता माझ्या अनेक प्रश्‍नांची उत्तरे देत.

६. साधनेद्वारे मिळालेल्या बळामुळे निराशा दूर करणारी औषधे बंद होणे आणि वाईट शक्तींचा त्रास न्यून होण्यासाठी आध्यात्मिक उपाय करू लागणे : केवळ साधनेद्वारे मिळालेल्या बळामुळे मला निराशा दूर करणारी औषधे बंद करणे शक्य झाले आणि मला आतून निर्मळ वाटू लागले. आरंभी ‘मी वाईट शक्तींच्या त्रासाने पीडित आहे’, याची मला जाणीव नव्हती; परंतु संतांनी मला या त्रासाची जाणीव करून दिली आणि ते न्यून होण्यासाठी नामजपादी आध्यात्मिक उपायही सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार ईश्‍वर आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून मी उपाय करू लागले.

रामनाथी आश्रमभेट – एक भावस्पर्शी अनुभव !

१. आश्रमातील वास्तव्य म्हणजे भावावस्था आणि अनुभूती यांचा अविस्मरणीय संगम ! : नोव्हेंबर २०१७ मध्ये मी प्रथमच रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आले. आश्रमातील वास्तव्य म्हणजे अनुभूती आणि भावावस्था यांचा अविस्मरणीय संगम होता. ‘मी माझ्या खर्‍या घरी आले असून ‘प्रत्यक्ष देवानेच मला उचलून घेतले आहे’, ही उत्कट जाणीव माझा भाव जागृत करत असे. या माझ्या वास्तव्यात परात्पर गुरु डॉक्टरांविषयी वाटणारी कृतज्ञता, स्नेह, काळजी, संरक्षण आदी निरनिराळ्या भावना वारंवार उंचबळून येत. माझ्या भावभावना अनावर होऊन मी पुष्कळदा रडत असे. त्यामुळे आश्रमातील साधक माझ्याकडे साशंकतेने पहात असत. जीवनात पहिल्यांदाच मला अंतरात जाणीव झाली की, मी एकटी नसून माझ्या समवेत कोणीतरी आहे. माझे मन देवाच्या अस्तित्वाने भरून गेले. मला या दैवी अनुभूती अधिकाधिक प्रमाणात ग्रहण करून माझ्या अंतर्मनात साठवायच्या होत्या; कारण घरी परतल्यावर तेथील रज-तमामुळे मला हे अनुभवणे अशक्य होते.

तेथे मला सौम्य आध्यात्मिक त्रास असल्याचे सांगण्यात आले. एका वर्षापूर्वी मी साधनेला आरंभ केला. तेव्हा मला पुष्कळ आध्यात्मिक त्रास होता; परंतु नामजपादी आध्यात्मिक उपायांमुळे तो पुष्कळ उणावला आहे. ‘माझी साधना जशी वाढेल, तसा हा त्रास पूर्णपणे नष्ट होईल’, असे मला वाटते.

२. ‘एका संतांची भेट’, हा जीवनाला कलाटणी देणारा अनुभव ! : ‘एका संतांची भेट होणे’, हा माझ्या जीवनाला कलाटणी देणारा अनुभव होता. त्यांना पाहिल्यावर ‘त्यांचे मुखकमल माझ्या मनःपटलावर कोरले जावे, त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे अखंड स्मरण करावे, तसेच त्यांची शक्ती, चैतन्य, प्रीती आणि त्यांनी दिलेला आनंद निरंतर अनुभवत साधनेत पुढे जावे’, असे मला वाटू लागले.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यािात्मक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now