वर्ष २०१८ मध्ये येणार्‍या गुरुपुष्यामृत योगांविषयी केलेले ज्योतिषशास्त्रीय विश्‍लेषण

सौ. प्राजक्ता जोशी

१. गुरुपुष्यामृत योग कधी असतो ?

‘गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यास ‘गुरुपुष्यामृत योग’ होतो. ज्योतिषशास्त्रानुसार वार सूर्योदयापासून दुसर्‍या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत ग्राह्य धरतात.)

२. गुरुपुष्यामृत योगाचे महत्त्व

गुरुपुष्यामृत योगावर सुवर्ण खरेदी करणे आणि शुभकार्ये करणे, असा प्रघात आहे. पूर्वीच्या काळात गुरुपुष्यामृत योगावर ऋषिमुनी आणि वडीलधार्‍या व्यक्ती उपासनेला प्राधान्य देत. पुष्य नक्षत्राचा स्वामी ‘शनि’ ग्रह असून देवता ‘बृहस्पति’ (गुरु) ग्रह आहे. पुष्य नक्षत्र हे ऊर्ध्वमुख नक्षत्र आहे. पुष्य नक्षत्र शुभ नक्षत्र असल्याने हे नक्षत्र गुरुवारी आल्यास अधिक महत्त्वाचे मानले जाते. गुरुपुष्यामृत योगावर चालू केलेल्या कार्याचे फळ दीर्घकाळ प्राप्त होत असल्याने या योगावर साधनेचे प्रयत्न केल्यास अधिक लाभ होतो.

३. वर्ष २०१८ मधील गुरुपुष्यामृत योग

या वर्षी तीन गुरुपुष्यामृत योग आहेत. गुरुपुष्यामृत योगांचा कालावधी पुढे दिला आहे.

३ अ. आषाढ कृष्ण पक्ष त्रयोदशी (९.८.२०१८) : या दिवशी रात्री २९.४४, म्हणजे पहाटे ५.४४ मिनिटांनंतर सूर्योदयापर्यंत गुरुपुष्यामृत योग आहे; कारण पुष्य नक्षत्राचा आरंभ पहाटे ५.४४ पासून चालू होतो. पहाटेच्या काळात असणार्‍या या गुरुपुष्यामृत योगाचा खरेदीसाठी उपयोग होऊ शकत नसला, तरी साधक साधनेसाठी लाभ करून घेऊ शकतात.

३ आ. श्रावण कृष्ण पक्ष एकादशी (६.९.२०१८) : या दिवशी दुपारी ३.१४ पासून सूर्योदयापर्यंत गुरुपुष्यामृत योग आहे.

३ इ. भाद्रपद कृष्ण पक्ष दशमी (४.१०.२०१८) : या दिवशी सूर्योदयापासून रात्री ८.४९ पर्यंत गुरुपुष्यामृत योग आहे.

४. वर्ष २०१८ मधील गुरुपुष्यामृत योगांचे वैशिष्ट्य

या वर्षी होणारे तिन्ही गुरुपुष्यामृत योग प्रत्येक मासातील अमावास्येपूर्वी आणि चातुर्मासात आहेत. अमावास्या आणि पौर्णिमा या दिवसांच्या दोन दिवस आधी, त्या दिवशी आणि नंतर दोन दिवस आध्यात्मिक त्रास होण्याची शक्यता अधिक असते. यासाठी साधकांनी चातुर्मासात येणार्‍या या गुरुपुष्यामृत योगांवर सुवर्ण खरेदी करण्यापेक्षा अधिकाधिक साधना करणे आवश्यक आहे.’

– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद), महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, ज्योतिष विभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.७.२०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now