धर्मद्रोही कालखंडाचा अस्त !

संपादकीय

तमिळनाडूचे ५ वेळा मुख्यमंत्री राहिलेले आणि द्रमुकचे सर्वेसर्वा एम्. करुणानिधी यांचे ७ ऑगस्टला सायंकाळी निधन झाले. १३ वेळा विधानसभा निवडणूक लढवून एकदाही पराभूत न होण्याचा विक्रम त्यांनी केला. यावरून त्यांना असलेला जनाधार आपल्या लक्षात येईल. असे असले, तरी ‘या जनाधाराचा वापर त्यांनी तमिळनाडूमध्ये हिंदुद्वेषाची वृक्षवल्ली उभारण्यासाठी केला’, असे खेदाने म्हणावे लागेल. हिंदु संस्कृतीनुसार ‘एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्याशी असलेले वैर संपते !’ असे जरी असले, तरी करुणानिधी यांनी जे हिंदुद्वेषाचे आणि फुटीरतावादाचे राजकारण केले, त्यातून झालेली अपरिमित राष्ट्रहानी आणि धर्महानी झाली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे विचार संपलेले नाहीत. त्यांच्या विखारी विचारांचा प्रसार द्रमुककडून चालूच रहाणार आहे. प्रसारमाध्यमांकडून ‘गरिबांचे कैवारी’, ‘द्रविडी योद्धा’ अशा उपमा देऊन त्यांचे उदात्तीकरण केले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांचे खरे स्वरूप हिंदूंसमोर आणणे अपरिहार्य आहे.

फुटीरतावादाचे बीज !

‘देव कुठेच नाही. ज्याने देव निर्माण केला तो मूर्ख आहे. ज्याने देवाला मोठे केले, तो बदमाश आहे आणि जो देवाची पूजा करतो तो असंस्कृत आहे’, अशी शिकवण देणारे तमिळनाडूतील इ.व्ही. पेरियार हे अण्णा दुराई यांचे राजकीय गुरु आणि अण्णा दुराई हे करुणानिधी यांचे राजकीय गुरु. यावरून करुणानिधी यांना लाभलेली हिंदुद्वेषाची परंपरा आपल्या लक्षात येईल. तमिळनाडूत वर्ष १९३० पासून चालत आलेल्या या धर्मद्रोही, ब्राह्मणद्वेषी आणि आर्यविरोधी चळवळींचे पुढच्या काळातील प्रतिनिधित्व करुणानिधी यांच्या रूपाने चालू राहिले.

वयाचा १४ व्या वर्षी शालेय अभ्यासक्रमात ‘सक्तीचे हिंदी नको’ म्हणून त्यांनी आंदोलन केले आणि पुढे राजकारणातही हिंदी भाषेला तीव्र विरोध केला. असे करून त्यांनी संपूर्ण तमिळनाडूमध्येच हिंदीविरोधी वातावरण निर्माण केले. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. ‘आमची तमिळी भाषा’, ‘आमची तमिळी संस्कृती’, ‘आमचे तमिळी उत्सव’ अशी एक वेगळेपणाची भावना तमिळींमध्ये निर्माण झाली. ‘करुणानिधी यांचे राजकारणातील कर्तृत्व हे ‘आम्ही द्रविड’ म्हणून बहुजन समाजाला हिंदूंपासून वेगळे करून त्यांच्यात ब्राह्मणद्वेष आणि आर्यविरोध पसरवणे, हेच होते’, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. त्यांनी समतेच्या चळवळीच्या नावाखाली देव, धर्म आणि ब्राह्मण यांचा द्वेष केला. विदेशी साम्यवादी स्टॅलिन याचे नाव स्वतःच्या मुलाला ठेवले . यावरून त्यांची मानसिकता लक्षात येईल. एवढेच नव्हे, तर शाळांतील प्रार्थना बंद करून त्याऐवजी एक सरकारी गीत म्हणण्याचा नियम लागू केला. ‘जे जे हिंदूंना गौरवशाली आहे, त्याला विरोध करणे’, हेच धोरण त्यांनी नेहमी अवलंबले.

सवर्ण विरुद्ध मागासवर्गीय !

करुणानिधी यांनी यांच्या कार्यकाळात ‘केवळ १५ एकर भूमीच एखाद्याच्या मालकीची असू शकते’, असा ‘कमाल जमीन धारणा कायदा’ केला. शेतकरी ज्या भूमीत रहात होते, त्या भूमी त्यांनी शेतकर्‍यांच्या नावावर केल्या. शेतकर्‍यांविषयी कणव असणे चुकीचे नाही; मात्र त्यामुळे ज्यांच्या मालकीच्या जमिनी होत्या, त्यांच्यावर अन्याय झाला, त्याचे काय ? त्यांनी शिक्षण आणि नोकर्‍या यांमध्ये मागासवर्गियांचे आरक्षण २५ टक्क्यांवरून ३१ टक्के केले. सर्वांत मागास जात (एम्बीसी)  हा स्वतंत्र प्रवर्ग बनवून त्यांच्यासाठी सरकारी नोकरी आणि शिक्षण यांत २० टक्के आरक्षणाची तरतूद केली. जातीप्रथा मोडण्याच्या नावाखाली विनामूल्य घरे देण्याची योजना राबवून सवर्णांना मागासवर्गियांच्या घरांशेजारी घरे घेणे भाग पाडण्याचा ‘द्राविडीप्राणायाम’ त्यांनी केला. या सर्व गोष्टींचा विचार करता तेथील तमिळी जनतेच्या मनात रुजलेला विद्वेष, मुरलेली हिंदुद्रोही वृत्ती पालटण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतील, याचा विचारही न केलेला बरा !

हिंदुद्वेष हेच मूळ

शेतीपंपासाठी निःशुल्क वीज, विद्यार्थ्यांसाठी माध्यान्ह भोजन, मेट्रो ट्रेन, एक रुपया प्रतिकिलो दराने तांदूळविक्री, विनाशुल्क सार्वजनिक आरोग्य विमा, हातरिक्शांवर बंदी यांसारख्या योजना काढून त्यांनी लोकप्रियता मिळवली. प्रजाहितदक्ष राजा हा कधीही प्रजेला मिंधे बनवत नाही, तर त्याला सक्षम आणि स्वावलंबी बनवतो. निःशुल्क वीज किंवा १ रुपयात तांदूळविक्री करणे हा एक प्रकारे जनतेला लाच देण्याचा प्रकार होता. पुढे अन्य राजकीय पक्षही निवडणुकीच्या काळात अशीच आश्‍वासने देतांना दिसू लागले. भ्रष्टाचारातही द्रमुक पक्ष मागे नाही. २ जी स्पेक्ट्रम घोटाळा, तसेच करुणानिधी यांच्या परिवाराकडे असलेली मालमत्ता हा नेहमीच चर्चेचा विषय होता.

करुणानिधी यांना सर्वाधिक कुप्रसिद्धी मिळाली, ती त्यांनी प्रभु श्रीरामचंद्रांवर केलेल्या वक्तव्यावरून. ‘राम काल्पनिक पात्र आहे’, असे सांगून रामसेतू तोडण्याचे समर्थन करून ‘पूल बांधायला राम इंजिनिअर होता का’ अशी दर्पोक्ती त्यांनी केली. ‘रामाची पूजा करण्याऐवजी रावणाची पूजा करा ! रावण हा द्रविड होता, तर राम हा आर्य’, असा जावईशोधही त्यांनी लावला होता. आर्य-अनार्य वाद सतत पेटता ठेवून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हिंदुद्वेष, जातीद्वेष, फुटीरतावाद, भ्रष्टाचार ही द्रमुक पक्षाची ओळख. ही ओळख निर्माण करण्यास करुणानिधी यांचा वाटा महत्त्वाचा आहे. असा राष्ट्रघातकी आणि हिंदु धर्माच्या मुळावर उठणारा पक्ष राजकारणात सक्रीय असणे, हे लोकशाहीसाठी लज्जास्पद नव्हे का ? पुरोगामी, निधर्मी, बुद्धीजीवी करुणानिधी यांच्या मृत्यूमुळे हळहळतील. हिंदूंसाठी मात्र त्यांच्या मृत्यूमुळे एका धर्मद्रोही कालखंडाचा अस्त झाला आहे, एवढेच.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now