बांगलादेशामधील अज्ञातांकडून हिंदु मंदिरातील देवतांच्या मूर्तींची तोडफोड

पोलिसांकडून तक्रार नोंदवून अन्वेषण करण्यास नकार

जगात कुठेही ज्यू असले, तरी त्यांच्या रक्षणासाठी इस्रायल प्रयत्न करतो; मात्र भारत सरकार बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी काहीही करत नाही. असे असले, तरी ते ‘आपण काहीतरी करत आहोत’, असा आव आणण्याचा प्रयत्न करते !

ढाका – बांगलादेशामधील मुंशीगंज जिल्ह्यात असलेल्या ४ बिश्‍वनाथ या गावातील धर्मदेव आणि राधा मंदिरात काही दिवसांपूर्वी रात्री २ ते पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी प्रवेश करून मंदिरातील धर्मदेव यांच्या मूर्तीचे मस्तक धडापासून वेगळे केले आणि इतर सामानाची नासधूस केली. या वेळी मंदिरातील पुजारी मंदिराबाहेर झोपले होते. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली; मात्र पुजार्‍यांना अज्ञातांना ओळखण्यात अपयश आल्याचे सांगत तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. ‘धर्मांधच हिंदूंच्या मूर्तींची तोडफोड करू शकतात’, असे मंदिराचे सचिव श्री. दिलीप मोंडल बाबू यांनी सेराजादिखान पोलीस ठाण्याच्या पोलिसांना सांगूनही त्यांनी ते स्वीकारले नाही.

१. ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांनी ‘पुजार्‍यांना मंदिरात तोडफोड करणार्‍या समाजकंटकांना अंधारात ओळखणे शक्य झाले नाही’, असे सांगून पोलिसांना तक्रार नोंदवून घेऊन आरोपींना अटक करण्याची मागणी केली. तसेच तक्रार प्रविष्ट करतांना आरोपींची नावे देणे बंधनकारक नसल्याचे सांगितले; मात्र पोलिसांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही.

२. अधिवक्ता घोष यांनी नंतर मुंशीगंज येथील पोलीस अधीक्षकांशीही संपर्क साधला. त्यांनीही आरोपींची ओळख पटल्याविना कारवाई करण्यास असमर्थता दर्शवली.

३. ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ संघटनेने ‘देवतांच्या नवीन मूर्ती आणून त्यांची प्रतिष्ठापना करावी आणि मंदिराची झालेली हानी भरून द्यावी’, अशा मागण्या केल्या आहेत.


Multi Language |Offline reading | PDF