२७.७.२०१८ या दिवशी होणार्याा खग्रास चंद्रग्रहणाविषयीची माहिती

१. भारतात दिसणारे खग्रास चंद्रग्रहण

‘शुक्रवार, आषाढ पौर्णिमा (२७.७.२०१८) या दिवशी खग्रास चंद्रग्रहण आहे.

१ अ. खग्रास चंद्रग्रहण : सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली, तर पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्राचे तेज न्यून होते. त्या वेळी चंद्र तांबूस-भुरकट रंगाचा दिसतो. पृथ्वीच्या सावलीत पूर्ण चंद्र आला, तर खग्रास चंद्रग्रहण होते.

२. २७.७.२०१८ या दिवशी भारतात सर्वत्र दिसणार्‍या खग्रास चंद्रग्रहणाच्या वेळा, त्या कालावधीत पाळावयाचे नियम आणि राशीपरत्वे फल

आषाढ पौर्णिमेला (२७.७.२०१८) चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण भारतात सर्वत्र ‘खग्रास’ दिसणार आहे. ग्रहण २७.७.२०१८ ला रात्री ११.५४ पासून उत्तररात्री ३.४९ पर्यंत आहे. ग्रहणकालात केलेल्या साधनेचे फळ सहस्रो पटींनी अधिक प्रमाणात मिळते. यासाठी ग्रहणकाळात साधनेला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे.

२ अ. चंद्रग्रहण दिसणारे प्रदेश : भारतासह संपूर्ण आशिया खंड, युरोप, आफ्रिका खंड, दक्षिण अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पॅसिफिक महासागर, हिंदी महासागर आणि अटलांटिक महासागर

२ आ. संपूर्ण भारतामधील चंद्रग्रहणाच्या वेळा

२ आ १. स्पर्श (आरंभ) : २३.५४ (रात्री ११.५४)

२ आ २. संमीलन (ग्रहणस्पर्श (ग्रहणाला आरंभ) झाल्यानंतर हळूहळू बिंबाचा ग्रास होत-होत ते पूर्ण ग्रस्त झाले, म्हणजे त्याला ‘संमीलन’ असे म्हणतात.) : रात्री १.००

२ आ ३. मध्य : रात्री १.५२

२ आ ४. उन्मीलन (खग्रास ग्रहणानंतर बिंबदर्शनास प्रारंभ झाला, म्हणजे त्याला ‘उन्मीलन’ म्हणतात.) : रात्री २.४४

२ आ ५. मोक्ष (शेवट) : उत्तररात्री ३.४९

२ आ ६. पर्व (टीप १) (ग्रहण आरंभापासून शेवटपर्यंतचा एकूण कालावधी) : ३.५५ घंटे

टीप १ – पर्व म्हणजे पर्वणी किंवा पुण्यकाल होय. ग्रहण स्पर्शापासून ग्रहण मोक्षापर्यंतचा काल पुण्यकाल आहे. ‘या कालात ईश्‍वरी अनुसंधानात राहिल्यास आध्यात्मिक लाभ होतो’, असे शास्त्रात सांगितले आहे.

२ इ. ग्रहणाचे वेध लागणे

२ इ १. अर्थ : ग्रहणापूर्वी चंद्र पृथ्वीच्या छायेत येऊ लागल्यामुळे त्याचा प्रकाश हळूहळू न्यून होण्यास आरंभ होतो. यालाच ‘ग्रहणाचे वेध लागले’, असे म्हणतात.

२ इ २. कालावधी : हे चंद्रग्रहण रात्रीच्या दुसर्‍या प्रहरात (टीप २) असल्याने ३ प्रहर आधी, म्हणजे २७.७.२०१८ च्या दुपारी १२.४५ पासून ग्रहण मोक्षापर्यंत (उत्तररात्री ३.४९ पर्यंत) वेध पाळावेत.

टीप २ – ३ घंट्यांचा एक प्रहर असतो. दिवसाचे ४ प्रहर आणि रात्रीचे ४ प्रहर मिळून एका दिवसात एकूण ८ प्रहर असतात.

२ इ ३. नियम : वेधकाळात स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जपजाप्य, श्राद्ध ही कर्मे करता येतील. वेधकाळात भोजन निषेध आहे; म्हणून अन्नपदार्थ खाऊ नयेत; मात्र वेधकाळात आवश्यक असल्यास पाणी पिणे, मल-मूत्रोत्सर्ग, झोप ही कर्मे करता येतात. ग्रहणकाळात मात्र ही कर्मे करणे निषिद्ध आहे. बालके, आजारी, अशक्त व्यक्ती आणि गर्भवती स्त्रिया यांनी सायंकाळी ५.३० पासून ग्रहणाचे वेध पाळावेत.

२ ई. वेधाचे नियम पाळण्याचे आरोग्यदृष्ट्या महत्त्व

२ ई १. शारीरिक / भौतिक : वेधकाळात जिवाणू वाढत असल्याने अन्न लवकर खराब होते. या काळात रोग प्रतिकारशक्ती न्यून असते. त्यामुळे ज्याप्रमाणे रात्रीचे अन्न दुसर्‍या दिवशी शिळे होते, त्याप्रमाणे ग्रहणापूर्वीचे अन्न ग्रहणानंतर शिळे मानण्यात येते. ते अन्न टाकून द्यावे. केवळ दूध आणि पाणी यांना हा नियम लागू नाही. ग्रहणापूर्वीचे दूध आणि पाणी ग्रहण संपल्यावरही वापरू शकतो.

२ ई २. मानसिक : वेधकाळात मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. काही व्यक्तींना निराशा येणे, ताण वाढणे इत्यादी मानसिक आजारही होत असल्याचे मानसोपचार तज्ञ सांगतात.

२ ई ३. उपाय : वेधारंभापासून ग्रहण संपेपर्यंत नामजप, स्तोत्रपठण, ध्यानधारणा इत्यादी धार्मिक कार्यांत मन गुंतवल्यास लाभ होतो.

२ उ. ग्रहणातील कृत्ये : ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे. पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम आणि दान करावे. पूर्वी काही कारणाने खंडित झालेल्या मंत्राच्या पुरश्‍चरणाचा आरंभ या कालावधीत केल्यास त्याचे अनंत पटींनी फळ मिळते. ग्रहणकालामध्ये (पर्वकालामध्ये) झोप, मल-मूत्रविसर्जन, अभ्यंग (संपूर्ण शरिराला कोमट तेल लावून ते शरिरात जिरेपर्यंत मर्दन करणे), भोजन, खाणे-पिणे आणि कामविषयसेवन ही कर्मे करू नयेत. अशौच असता ग्रहणकालात ग्रहणासंबंधी स्नान आणि दान करण्यापुरती शुद्धी असते. ग्रहणमोक्षानंतर स्नान करावे.

२ ऊ. ग्रहणाचे राशीपरत्वे फल

२ ऊ १. शुभ फल : मेष, सिंह, वृश्‍चिक आणि मीन

२ ऊ २. अशुभ फल : मिथुन, तूळ, मकर आणि कुंभ

२ ऊ ३. मिश्र फल : वृषभ, कर्क, कन्या आणि धनु

ज्या राशींना अशुभ फल आहे, त्या व्यक्तींनी आणि गर्भवती महिलांनी चंद्रग्रहण पाहू नये.’

(संदर्भ : दाते पंचांग)

– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद), महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, ज्योतिष विभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.६.२०१८)

गुरुपौर्णिमा करणे

गुरुपौर्णिमा सायंकाळी ५.३० पर्यंत करू शकतो. ग्रहणकाळात गुरुपौर्णिमेचे व्याख्यान देण्यास कोणतीही अडचण नाही. गुरुपौर्णिमेचे व्याख्यान आपण कोणत्याही वेळेत केले तरी चालेल; कारण ती समष्टी सेवा आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now