नाणार प्रकल्प जनतेवर लादणार नाही ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाणार प्रकल्पाविषयी तिसर्‍या दिवशीही गदारोळामुळे विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित !

सभागृहाचे कामकाज वारंवार स्थगित होणे, ही लोकशाहीची निरर्थकता नव्हे का ?

नागपूर, १३ जुलै (वार्ता.) – कोकणातील नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पावरून १३ जुलैला विधानसभेत पुन्हा एकदा रणकंदन माजले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाणार प्रकल्पाच्या प्रश्‍नी निवेदन देत असतांना ‘नाणार प्रकल्प कोकणवासियांवर लादणार नाही, सर्वांशी चर्चा करून हा प्रश्‍न सोडवण्यात येईल’, असे सांगितले; मात्र ही मागणी शिवसेनेसह विरोधकांना मान्य झाली नाही. त्यांचा नाणार प्रकल्पाला तीव्र विरोध असल्याचे दिसून आले. नाणार प्रकल्प रहित होण्यासाठी शिवसेनेसह विरोधकांनी विधानसभा अध्यक्षांच्या मोकळ्या जागेत जाऊन निदर्शने करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे एकूण ३ वेळा २५ मिनिटे आणि नंतर दिवसभरासाठी विधानसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,

१. नाणार प्रकल्पासाठी आंध्र आणि गुजरात या राज्यांनी मागणी केली होती; मात्र महाराष्ट्राने हा प्रकल्प होण्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती.

२. भारताच्या इतिहासात प्रथमच ३ लक्ष कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक केलेला हा सर्वांत मोठा प्रकल्प आहे. समृद्धी महामार्ग प्रकल्पालाही विरोध करण्यात आला होता. आता चर्चेतून त्या प्रकल्पासाठी ९३ टक्के भूमी संपादित झाली आहे. या प्रकल्पासाठीही चर्चेतून मार्ग काढू; मात्र हा प्रकल्प जनतेवर लादला जाणार नाही.

३. विरोधकांच्या प्रत्येक सूत्राचे वैज्ञानिक पद्धतीने उत्तर देऊ. याविषयी सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करण्याची आमची सिद्धता आहे.

४. गुजरात राज्यातील जामनगरमध्ये असलेल्या रिफायनरीमुळे (तेलशुद्धीकरण प्रकल्पामुळे) पर्यावरणाची हानी झालेली नाही, उलट त्या भागातून आंब्याची निर्यात वाढली आहे. कोणताही धोका निर्माण झालेला नाही. गुजरातच्या आर्थिक व्यवस्थेत चांगला फरक दिसला आहे.

शिवसेनेचे मुख्य प्रतोद श्री. सुनील प्रभु म्हणाले, ‘‘रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकाच भागात जैतापूरला अणुऊर्जा आणि नाणार भागात तेलशुद्धीकरण प्रकल्पामुळे पर्यावरणाची मोठी होनी होणार आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात जांबा खडक आहे. त्याखाली मोठ्या प्रमाणात गंधक असल्याने या प्रकल्पामुळे तिथे स्फोट होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. नाणार प्रकल्पामुळे कोकणच्या पर्यावरणाचा र्‍हास, तसेच फळबागा, औषधी वनस्पतींची हानी होईल. त्यामुळे असा विनाशकारी प्रकल्प कोकणात नको. हा प्रकल्प कायमस्वरूपी रहित करावा, अशी मागणी केली.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘‘नाणार प्रकल्पामुळे कच्चा माल, प्रदूषण असे अनेक प्रश्‍न निर्माण होतील. या प्रकल्पाविषयी विचारविनिमय आणि चर्चा करणे आवश्यक आहे. हा करार महाराष्ट्रावर लादला आहे. देहली येथे करार होत असतांना कुणाला विचारण्यात आले ? मुख्यमंत्र्यांनाही अंधारात ठेवून करार केले आहेत.’’ चव्हाण यांच्या या विधानावर सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतल्याने सभागृहात काही काळ गोंधळ निर्माण झाला.

नाणार प्रकल्प म्हणजे शेतकर्‍यांची फसवणूक आहे. त्यामुळे हा प्रकल्प रहित होण्यासाठी नाणारवासीय ‘लाँगमार्च’ काढून येथे आले आहेत. सरकारने या प्रकल्पाची अधिसूचना रहित केल्याची घोषणा करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी ‘हा प्रकल्प रहित करणार कि नाही, अशी सुस्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी घ्यावी’, असे सांगितले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now