मानवतेची विक्री !

संपादकीय

रांची (झारखंड) येथे ‘निर्मल हृदय’ या अनाथालयातील नवजात बालकांची विक्री केल्याच्या प्रकरणी २ ‘नन्स’ना रांची पोलिसांनी केलेली अटक, ही ख्रिस्त्यांच्या समाजसेवेचा बुरखा फाडणारी आहे. ‘निर्मल हृदय’ हे अनाथालय मदर तेरेसा यांच्या ‘मिशनरीज् ऑफ चॅरिटी’ या संस्थेकडून संचालित करण्यात येते. ज्या तेरेसा यांनी समाजसेवेचा बुरखा पांघरून स्वतःची उभी हयात हिंदूंच्या धर्मांतरासाठी व्यतित केली, तीच लबाडीची परंपरा त्यांचे धर्मवंशज अशा संस्थांच्या माध्यमातून आजही नेटाने पुढे रेटत आहेत.

‘निर्मल हृदय’ अनाथालयातील ‘नन्स’ची ही ‘महान समाजसेवा’ लक्षात आल्याने एका दांपत्याने याविषयी पोलिसांत तक्रार केली. यावर पोलिसांनी ‘निर्मल हृदय’ आणि ‘शिशू भवन’ या अनाथालयांवर धाडी घातल्या आणि समाजद्रोहाचे भले मोठे घबाड उघड झाले. हे प्रकरण केवळ एक-दोन बालकांपुरते मर्यादित नव्हते, तर या निष्ठूर समाजसेविकांनी अनेक जिवांची विक्री केली होती; म्हणून या घटनेचे गांभीर्य अधिक आहे. ‘वर्ष २०१५ ते २०१८ या कालावधीत या अनाथालयांमध्ये ४५० गर्भवती महिलांची प्रसुती झाली; मात्र त्यांपैकी केवळ १७० बालकांची नोंद करण्यात आली, तर उरलेल्या २८० बालकांच्या नोंदीच केल्या गेल्या नाहीत’, असे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक अन्वेषणात उघड झाले. या बालकांची उत्तरप्रदेश, बंगाल, केरळ आदी राज्यांमध्ये विक्री करण्यात आल्याचा पोलिसांना रास्त संशय आहे. हे प्रकरण येथपर्यंतच सीमित आहे असे नाही, तर बालकल्याण समितीच्या चौकशीत अनाथालयाने दिलेल्या माहितीनुसार ‘या बालकांना जन्म देणार्‍या अधिकतर माता अविवाहित आहेत !’ एकूणच हा सर्व प्रकार अत्यंत गंभीर असून याची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी.

पुरो(अधो)गामी टोळी गप्प का ?

एरव्ही हिंदूंच्या संस्था किंवा संत यांच्यावरील कथित आरोपावरून रान उठवणारी पुरो(अधो)गामी टोळी, ‘निधर्मी’ प्रसारमाध्यमे, तथाकथित मानवतावादी आदी आता कुठल्या बिळात लपली आहेत ? काही वर्षांपूर्वी एका हिंदु संतांच्या आश्रमात बालकांच्या हत्या झाल्याच्या आरोपावरून याच पुरोगामी टोळीने आकांडतांडव केला होता. आता याच टोळीची रांचीतील अर्भकविक्री प्रकारणी दातखिळ का बसली, हे समजायला मार्ग नाही. जर कुठली हत्या ही क्रूरता असेल, तर पैशांसाठी जिवंत अर्भके विकणे, ही कुठली समाजसेवा आहे ? ख्रिस्त्यांची कुकृत्ये प्रत्येक क्षेत्रात पहायला मिळतात. केरळमधील कोट्टायम येथील एका ‘नन’ने ५ पाद्य्रांवर बलात्कार केल्याचा आरोप केला. या प्रकरणी पोलिसांनी ४ पाद्य्रांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. आता या घटनेची चौकशी चालू आहे. याशिवाय ‘दुमका (झारखंड) येथील आदिवासीबहुल फुलपहाडी गावात ५ जुलै या दिवशी २५ ख्रिस्ती मिशनर्‍यांनी हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न केला. अर्थात् हिंदूंच्या जागरूकतेमुळे तो अयशस्वी ठरला. एकूणच ‘धर्मांधता, वासनांधता, दांभिकता आणि हिंदुद्वेष, म्हणजेच ख्रिस्त्यांची समाजसेवा आहे’, असे समजायचे का ?

रांची येथील ‘ख्रिस्ती विक्रीदूतां’चा हा व्यवसाय विनाअडथळा चालू रहावा, यासाठी अनेक ‘अदृश्य शक्ती’ कार्यरत असाव्यात. याचे कारण म्हणजे वर्ष २०१५ मध्ये बालकल्याण समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश सिंह आणि सदस्य अफझल हे वरील अनाथालयांच्या चौकशीसाठी गेले असता त्यानंतर त्यांना अचानकपणे बडतर्फीच्या कारवाईला सामोरे जावे लागले ! यातच सर्व काही आले. जर रांची येथील दांपत्याने तक्रार केलीच नसती, तर हा व्यवसाय आणखी तेजीत चालला असता आणि दुसरीकडे न जाणो ‘अनाथांचा सांभाळ केला’ म्हणून अशा संस्थांना सरकारकडून समाजसेवेचा सर्वोत्कृष्ट पुरस्कारही बहाल करण्यात आला असता ! यावरून आपले सरकार आणि सरकारी यंत्रणा किती निद्रिस्त आहेत, हे प्रकर्षाने लक्षात येते. देशांतर्गत एवढी मोठी मानवीतस्करी होऊनही ज्या सरकारला त्याचा थांगपत्ता लागत नाही, त्यांना आतंकवाद्यांच्या घुसखोरीविषयी कधी तरी माहिती मिळू शकेल का ? आणि त्यापासून ते आपले कधी तरी रक्षण करू शकतील का ?, हा खरा प्रश्‍न आहे.

बोलवते धनी शोधा !

रांची अर्भकविक्री प्रकरण आताकुठे चौकशीच्या प्राथमिक टप्प्यात आहे. पोलिसांनी कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता या घटनेची पाळेमुळे खणून काढली पाहिजेत. यासाठी ‘बालकांची विक्री करण्याचे हे उद्योग कधीपासून चालू आहेत ? त्या बदल्यात ख्रिस्त्यांना किती पैसे मिळाले ? या संघटित गुन्हेगारीत आणखी कोणाकोणाचा समावेश आहे ? या ‘नन्स’चे बोलवते धनी कोण आहेत ?’ या सर्वांची माहिती मिळवून ती उघड केली पाहिजे. ख्रिस्त्यांच्या या लबाडीकडे आता समाज डोळे विस्फारून पहात असेल; मात्र हिंदुत्वनिष्ठांसाठी ही लबाडी नवी नाही; कारण या लबाडीची पाळेमुळेच धर्मांधतेच्या चिखलात खोलवर रूजली आहेत, हे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी वेळोवेळी सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे. दुर्दैवाने आजपर्यंतच्या एकाही सरकारने याची साधी दखलही घेतली नाही. म्हणूनच तर अशा धर्मांधांचे फावते आणि ते व्यवस्थेला वाकुल्या दाखवतात. अर्थात् कुठलीही चोरी फार काळ लपून रहात नाही, हेही तितकेच खरे.

ज्या ख्रिस्त्यांनी समाजाला कायम मानवता, सेवा आदींचे डोस पाजले, तेच ख्रिस्ती मानवतेची कशी विक्री करतात, हे रांची येथील अर्भकविक्री प्रकरणात उभ्या जगाने पाहिले. यावरून जनतेचा अशा ख्रिस्त्यांवरचा विश्‍वास उडेल, हे वेगळे सांगायला नको. तथापि जनतेचा मानवतेवरचा विश्‍वास उडू नये; म्हणून तरी सरकारने अशा ख्रिस्त्यांवर कठोर कारवाई करावी, ही अपेक्षा !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now