नाणार प्रकल्पावरून शिवसेना आक्रमक !

सभागृहात राजदंड पळवण्याचा प्रयत्न !

विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित !

अधिवेशनावर होणारा खर्च आणि जनतेचे प्रलंबित प्रश्‍न पहाता सभागृह स्थगित करावे लागणे, ही नामुष्की !

नागपूर, ११ जुलै (वार्ता.) – कोकणातील नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या विरोधात विधानसभेत शिवसेना आक्रमक झाली. नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पावर सरकारने म्हणणे मांडावे, या मागणीसाठी शिवसेनेने ११ जुलैला विधानसभेत गदारोळ केला, तसेच शिवसेना आणि काँग्रेस यांच्या सदस्यांनी विधानसभा अध्यक्षांसमोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. गदारोळ वाढल्याने विधानसभा अध्यक्ष श्री. हरिभाऊ बागडे यांनी दिवसभरासाठी विधानसभेचे कामकाज स्थगित केले. अधिवेशन चालू झाल्यावर शिवसेनेने प्रथमच नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पावरून गदारोळ घातल्याचे, तर काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनीही शिवसेनेला साथ दिल्याचे दिसून आले.

१. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा स्थगन प्रस्ताव मांडताच शिवसेनेच्या सर्व सदस्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जाऊन गदारोळ घातला.

२. विरोधकांच्या नियम २९३ अन्वये प्रस्तावावर सहकारमंत्री श्री. सुभाष देशमुख यांच्याकडून उत्तर आल्यानंतर नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा स्थगन प्रस्ताव मांडण्याची अनुमती विखे-पाटील यांनी अध्यक्षांकडे मागितली.‘या प्रकल्पाच्या विरोधात मोर्चा आलेला असल्याने या मोर्च्याला सामोरे जायचे आहे. त्यामुळे या प्रस्तावावर लवकर चर्चा घ्यावी’, अशी मागणी काँग्रेसचे सदस्य विजय वडेट्टीवार यांनी केली.

३. नेमक्या याच कालावधीत शिवसेनेचे सर्व सदस्य नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमा झाले. त्यांनी ‘आमच्या प्रस्तावावर आधी चर्चा करण्याची मागणी केली.’ काँग्रेसच्या सदस्यांनीही ‘शिवसेनेआधी आमचा स्थगन प्रस्ताव नोंद करण्यात आला असल्याने प्रथम या प्रस्तावावर चर्चा करावी’, अशी मागणी केल्याने गदारोळ वाढला.

४. शिवसेनेचे सदस्य श्री. सुनील प्रभु म्हणाले की, नाणार प्रश्‍नावरून नागपूर येथे आंदोलकांचा मोर्चा निघणार होता; मात्र पोलिसांनी अनुमती न दिल्याने आंदोलक यशवंत पटांगणात थांबले आहेत. त्यामुळे या प्रश्‍नावर चर्चा करून शासनाचे उत्तर मिळाले पाहिजे, अशी त्यांनी मागणी केली.

५. विधानसभा अध्यक्ष श्री. बागडे यांनी ‘सभागृहात स्थगन प्रस्ताव चर्चेला आल्यावर या प्रस्तावावर चर्चा करावी’, असे सांगितले; मात्र ही मागणी शिवसेनेच्या सदस्यांना मान्य नव्हती. त्यांनी घोषणाबाजी चालू ठेवल्याने सभागृहातील गोंधळ वाढला. या गोंधळातच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विनियोजन विधेयक सभागृहात मांडून ते संमत करून घेतले.

६. अध्यक्षांच्या सूचनेनुसार शिवसेनेचे सर्व सदस्य आपापल्या जागेवर जाताच काँग्रेसचे सदस्य आमच्या प्रस्तावावर चर्चा घेण्याची मागणी करू लागले.

७. त्यामुळे शिवसेनेचे सर्व आमदार पुन्हा घोषणाबाजी करत मोकळ्या जागेत आले. या प्रश्‍नावरून शिवसेनेचे सदस्य सभागृहात आक्रमक झाले. त्यानंतर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी २ वेळा १५ मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज स्थगित केले.

८. कामकाजाला प्रारंभ झाल्यावर शिवसेनेचे सदस्य पुन्हा आक्रमक होऊन गोंधळ घालू लागले. या वेळी शिवसेनेचे सदस्य राजन साळवी, प्रताप सरनाईक, काँग्रेसचे सदस्य नीतेश राणे यांनी विधानसभा अध्यक्षांसमोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. काही सदस्यांनी हा राजदंड ठेवण्याचा प्रयत्न केला.

९. या वेळी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या २ चोपदारांनी सदस्यांच्या हातातून राजंदड काढून घेण्याचा प्रयत्न करत असतांना ते खाली पडले. अखेर या गोंधळात अध्यक्ष बागडे यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.

शिवसेनेची ताकद दाखवण्यासाठी केले आंदोलन ! – आमदार राजन साळवी, शिवसेना

नाणार येथून नागपूरला आलेल्या ग्रामस्थांच्या आंदोलनाची माहिती सभागृहाला देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो; मात्र आम्हाला सभागृहात बोलू दिले नाही. त्यामुळे शिवसेनेची आक्रमकता दाखवण्यासाठीच आम्ही थेट राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. आता याविषयी सरकारसमवेत कोणतीही चर्चा नको, तर केवळ नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प रहित केला, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now