परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आरंभापासून प.पू. भक्तराज महाराज यांचे भंडारे आणि सनातन भारतीय संस्कृती संस्थेच्या वतीने साजर्या करण्यात येणार्या गुरुपौर्णिमा यांच्या माध्यमातून अध्यात्म शिकवून साधकांकडून साधना करवून घेतली. त्यानंतरच्या गुरुपौर्णिमाही साधकांची साधना, तसेच राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठीच साजर्या झालेल्या आहेत.
मी सर्वसाधारण व्यक्ती असून कर्मकांड करणे, उपवास करणे, मंदिरात जाणे, सत्यनारायणासारख्या पूजा करणे, अशा विधी करण्यापर्यंत माझी मजल होती. असे असतांना परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे भंडारे, सत्संग सोहळे, प.पू. भक्तराज महाराज यांंचा अमृत महोत्सव आणि गुरुपौर्णिमा यांसारख्या आध्यात्मिक स्तरावरील सोहळ्यांत मला सहभागी होता आले. वर्ष १९९१ पासूनच्या गुरुपौर्णिमेपासून परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे मला ते अनुभवायला मिळाले. त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी ते शब्दांत व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे.
११ जुलैला आपण ठाणे आणि माटुंगा गुरुपौर्णिमांची काही सूत्रे पाहिली आज त्यापुढील भाग पाहूया.

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे प.पू. भक्तराज महाराज यांच्या गुरुपौर्णिमांच्या माध्यमातून शिकायला मिळालेली सूत्रे
१ आ १. प्रयोगांच्या माध्यमातून शिकवणे : दुसरा प्रयोग ‘गुरुपौणिमा उत्सव, आश्रम आणि अध्यात्माची पुस्तके प्रकाशित करणे’, यांपैकी कशाला प्राधान्य द्यावे ?’, याविषयी घेण्यात आला. या प्रयोगातून परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘वरील गोष्टींचे व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या दृष्टीने महत्त्व कसे आहे ?’, हे अभ्यासवर्गात सांगितले.
अशा रितीने सूक्ष्मातील प्रयोग घेऊन आध्यात्मिक विवेचन केल्यावर मुंबई येथे गुरुपौणिमा साजरी करण्याचे ठरवण्यात आले. या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी सर्व साधकांना विश्वासात घेऊन त्यांना प्रेरणा दिली.
१ आ २. गुरुपौणिमेच्या व्ययाचा तपशील फलकावर लिहून दाखवणे : परात्पर गुरु डॉक्टरांनी गुरुपौर्णिमेच्या व्ययाचा अंदाज फलकावर लिहून दाखवला. तो पुढे दिला आहे.
१ आ ३. गुरुपौर्णिमेनंतर झालेल्या अभ्यासवर्गात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवलेली सूत्रे
१ आ ३ अ. गुरुपौर्णिमेसारख्या ईश्वरी कार्याला आवश्यक तेवढे धन ईश्वरच मिळवून देत असल्याची अनुभूती येणे : गुरुपौर्णिमेनंतरच्या अभ्यासवर्गात परात्पर गुरु डॉक्टर फलकावर जमा-खर्च आणि चुका लिहून त्यातून अध्यात्म शिकवत असत. ‘अनुभूती काय आल्या आणि आपण कुठे न्यून पडलो ?’, याविषयी चर्चा करून ते आम्हाला साधना आणि सेवा शिकवत असत. त्यांच्याच कृपेने ‘गुरुपौर्णिमेसारख्या ईश्वरी कार्याला आवश्यक तेवढे धन ईश्वरच मिळवून देतो’, याची आम्हाला नेहमी अनुभूती यायची.
१ आ ३ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अभ्यासवर्गातील साधकांना गुरुपौर्णिमेच्या झालेल्या लाभाविषयी सांगणे : साधकांना गुरुपौर्णिमेचा आध्यात्मिक स्तरावर लाभ झाला. साधकांना चैतन्यशक्ती मिळाल्याने सर्व जण प्रेरित होऊन अधिक जोमाने साधना करू लागले. अभ्यासवर्गात परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितले, ‘‘अभ्यासवर्गातील ३० पैकी १० जणांना १०० टक्के, २ जणांना २० टक्के आणि १८ साधकांना ० टक्के लाभ झाला.’’
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साधकांना भजन, महाप्रसाद, सत्संग, संतांचे मार्गदर्शन इत्यादी गोष्टींचा लाभ मिळत असे. विस्तारभयामुळे येथे सर्व गोष्टी सांगता येत नाहीत.
१ आ ३ इ. ‘केवळ सत्संकल्पाने पुण्य मिळते’, हे सोदाहरण स्पष्ट करणे : अभ्यासवर्गातील साधिका सौ. डायस यांनी गुरुपौर्णिमेसाठी (४ सहस्र ५०० रुपये) अर्पण केले; मात्र परात्पर गुरु डॉक्टरांनी ते त्यांना परत केले; कारण साधिकेला त्या पैशाची अधिक आवश्यकता होती. केवळ सत्संकल्पाने पुण्य मिळते. त्यामुळे सौ. डायस यांना अर्पणाचा लाभ झाला. परात्पर गुरु डॉक्टर हे सर्व विश्लेषण करून अभ्यासवर्गात सविस्तर सांगायचे.
(क्रमश: उद्याच्या अंकात)
– श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.७.२०१७)