पुरोगाम्यांचा वितंडवाद !

संपादकीय

वेद, पुराणे, स्मृति, रामायण, महाभारत, तसेच ऋषिमुनींनी लिहिलेले प्राचीन ग्रंथ हे वादातीत आणि मार्गदर्शक आहेत, अशी सनातन धर्मावलंबियांची श्रद्धा आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून मनुस्मृतीच्या संदर्भाने पुन्हा चर्चेत आलेल्या ‘मनुवाद’ या शब्दालाच धर्मनिष्ठ हिंदूंचा आक्षेप आहे. ‘रुढी, परंपरा आणि शास्त्र यांचा आदर करणारे, एखाद्या सूत्राचे ठामपणे समर्थन करणारे लोक म्हणजे ‘मनुवादी’ लोक’, अशी एक विचित्र मांडणी सध्या केली जात आहे. ही मांडणी तर्कापुरती मान्य करायची म्हटले, तरी त्याआधारे धर्मनिष्ठ कार्यकर्ते नाही, तर पुरोगामी जमातच कट्टरवादी ठरते. हिंदु धर्माचा अभ्यास नसतांना, धर्मातील तत्त्वे जाणून घेण्याची जिज्ञासा नसतांना ही पुरोगामी मंडळी धर्मग्रंथांतील श्‍लोक, उतारे यांचे मनमानी अर्थ लावतात आणि हिंदु धर्मावर चिखलफेक करतात. वस्तूस्थिती आणि तथ्ये काय आहेत, याच्याशी त्यांना देणेघेणे नसते; अथवा तत्त्वे मान्य करण्याचे धारिष्ट्य नसते. सर्व पुरोगाम्यांच्या ठायी हा सामायिक दुर्गुण दिसून येतो. पू. भिडेगुरुजी आणि मनुस्मृति या प्रकरणीही तो दिसून आला.

पुणे येथे भक्ती-शक्ती संगम सोहळ्याच्या वेळी श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी एक वक्तव्य केले होते. ‘संतांनी समाजाला अध्यात्माचा मार्ग सांगितला, तर मनुने त्याही पुढे जाऊन अध्यात्मासह राष्ट्रउभारणीची शिकवण दिली’, अशा आशयाचे ते विधान होते. या विधानानंतर पुरो(अधो)गामी म्हणवणारे पत्रकार, लोकप्रतिनिधी आणि तथाकथित महाराज मंडळी यांचा नेहमीप्रमाणे थयथयाट चालू झाला. ‘संविधान संकटात’ वगैरे नारे दिले गेले. ‘वारकरी संप्रदाय वैदिक परंपरेपासून वेगळा आहे’, असे दावे करून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला गेला. पुरोगाम्यांचा हा कांगावा खरे तर ज्या संतांनी सनातन हिंदु धर्माची पताका खांद्यावर घेऊन समाजाला भक्तीमार्गाला लावले, त्यांचा अवमान करणारा होता; मात्र हे पुरोगाम्यांच्या खिजगणतीतही नव्हते. आज संत तुकाराम महाराज असते, तर ‘नाठाळाचे माथी हाणू काठी’ असा पवित्रा त्यांनी पुरोगाम्यांच्या संदर्भात घेतला असता.

मनुस्मृती आणि संविधान

‘मनुस्मृति’चे समर्थन करणे संविधानविरोधी आहे, असे चित्र आज निर्माण केले गेले आहे. वास्तविक डॉ. आंबेडकर यांनी संविधान बनवतांना मनुस्मृति, याज्ञवल्क्य स्मृती यांचा आधार घेतला होता. डॉ. आंबेडकर यांनी स्वतः वर्ष १९५० मध्ये मुंबईमध्ये केलेल्या एका व्याख्यानामध्ये सध्या प्रचलित असणार्‍या संविधानातील ‘हिंदू कोड बिल’ मनुस्मृतीच्या आधारे सिद्ध केल्याचे सांगितले होते; मात्र हे सत्य सांगितले, तर मनुस्मृतीवर मनमानी टीका करण्याचे प्रयत्न सफल झाले नसते; म्हणून ‘गोबेल्स’ तंत्र वापरून समाजाची दिशाभूल केली गेली आणि अजूनही केली जात आहे.

भारताचे लिखित संविधान निर्माण होण्यापूर्वी प्राचीन काळी भारतात समाजव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, नगररचना, संरक्षणयंत्रणा आदी सर्व व्यवस्था सुरळीत होत्या. प्रथा-परंपरा, शास्त्र, राजा, राजगुरु यांच्याद्वारेच तर या सर्व व्यवस्था नियंत्रित केल्या जात असत. त्या काळी भारत आर्थिक, शैक्षणिक, व्यापारदृष्ट्या महासत्ता होता; मात्र दुर्दैवाने आज धर्मग्रंथ, वेद, उपवेद यांना संवैधानिक महत्त्व नाही, ही वस्तूस्थिती आहे. जर आजच्या काळात मनुस्मृतीला इतर सर्वसामान्य ग्रंथांएवढेच स्थान आहे, तर त्यासंदर्भात एवढा कोलाहल करण्याचे कारणच काय ? काफिरांना ठार करण्याचे आदेश देणारे कुराण, महिलांना सैतानाच्या मुली म्हणून हेटाळणारे बायबल आजच्या संविधानाच्या राज्यात चालते; मात्र आदर्श राज्यव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, समाजव्यवस्था यांविषयी मार्गदर्शन करणार्‍या हिंदूंच्या धर्मग्रंथांचा नुसता संदर्भ दिला, तरी तो संविधानाशी द्रोह होतो, हे कसे काय ?

व्यापक षड्यंत्र

मनुस्मृति कायम लक्ष्य होण्यामागे इंग्रजांच्या काळात धर्मशास्त्रातील श्‍लोकांचे केले गेलेले चुकीचे भाषांतर, काही स्वार्थी मंडळींनी मूळ ग्रंथांत घुसडलेले अवैदिक श्‍लोक आणि त्याविषयी केलेला अपप्रचार हेही कारणीभूत आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात हिंदु धर्माविषयी पूर्वग्रहदूषित दृष्टी असणारे शासनकर्ते सत्तेत आल्याने त्यामध्ये अधिकच भर पडली. त्याचा परिणाम म्हणून म्हणा, अज्ञानाला चिकटून रहाण्याच्या वृत्तीमुळे म्हणा अथवा विवेकबुद्धी गहाण ठेवल्यामुळे म्हणा, मनुस्मृतीचा ब्राह्मण्याशी संबंध जोडला गेला. वास्तविक महर्षि मनु क्षत्रिय होते. मनुस्मृतीमध्ये एखाद्या अपराधाला अन्य वर्णियांपेक्षाही ब्राह्मणाला कठोर प्रायश्‍चित्त सांगितले गेले आहे. जातीधारित नाही, तर वर्णाधारित शास्त्रीय रचनेचा ऊहापोह केला आहे. हे सगळे दुर्लक्षून मनुस्मृति, हिंदु धर्म यांवर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. मनुस्मृतीच्या आडून हिंदु धर्मावर टीका  करणे, ‘मनुस्मृतीचे दहन केल्याने विचार संपतील’, असे मानणे, चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर टीका करतांनाच जातीधारित आरक्षणासाठी आंदोलने करणे, शास्त्र समजून घेण्याची जिज्ञासा न दाखवता मठ्ठपणे आरोप करत रहाणे, याला पुरोगाम्यांचा वितंडवादच म्हणावा लागेल. त्याच्या आधारे हिंदु धर्मशास्त्र आणि ग्रंथ यांविषयी कथित पुरोगाम्यांनी कितीही वैचारिक प्रदूषण केले, तरी त्यामुळे सनातन हिंदु धर्मरूपी सूर्य झाकोळला जाणार नाही, हेही खरेच !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now