भंगलेले अमेरिकी स्वप्न !

संपादकीय

‘अमेरिकी स्वप्न’ (अमेरिकन ड्रिम) ही संकल्पना २० व्या शतकात लेखक जेम्स अ‍ॅडम्स यांनी रूढ केली. ‘अशा एका गणराज्याची निर्मिती जिथे लोकतंत्र, अधिकार, स्वतंत्रता, संधी आणि समानता या सूत्रांचा अवलंब केल्याने नागरिकांचे आयुष्य समृद्ध होईल’, असा या संकल्पनेचा थोडक्यात आशय. पुढे अमेरिकी साहित्यात ही संकल्पना रूजली. या स्वप्नाने विविध देशांतील लोकांना भुरळ घातली आणि या स्वप्नपूर्तीच्या ध्यासाने ते अमेरिकेत स्थलांतरित झाले. भारतासारख्या विकसनशील देशाच्या तरुणांना ‘उज्ज्वल भवितव्यासाठी अमेरिकेशिवाय पर्याय नाही’, असे आजही वाटते. असेच स्वप्न उराशी बाळगून तेलंगणमधील वारंगळ येथील २५ वर्षीय संगणक अभियंता शरथ कोप्पू हा उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत गेला. शिक्षण घेत तो एका उपाहारगृहामध्ये काम करत होता. ६ जुलै या दिवशी या उपाहारगृहात दरोडेखोर शिरला. त्या वेळी शरथ कोप्पू याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोराने त्याच्यावर गोळीबार केला. त्यात तो मरण पावला. अमेरिकेत भारतियाची हत्या होण्याची ही काही पहिलीच घटना नाही. अशा प्रकारे दरोडेखोरांच्या, वर्णद्वेषी लोकांच्या गोळीबारात ठार अथवा घायाळ झालेल्या अमेरिकेतील भारतियांची संख्या मोठी आहे. श्रीनिवास कोचीबातला, हरिकृष्ण मिस्त्री, करुणाकर करंगळ, हरनिश पटेल अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. अमेरिकेतील भारतियांवर झालेल्या आक्रमणातील बहुतांश आक्रमणे ही वर्णद्वेषातून झाली आहेत. ज्या सुखसमृद्धीचे स्वप्न उराशी बाळगून भारतीय अमेरिकेची वाट चालत आहेत, तेच स्वप्न त्यांच्या जिवावर उठले आहे. अमेरिकेतील भारतियांची हत्या झाल्यावर नेहमीप्रमाणे भारतीय परराष्ट्र मंत्रालय ट्विटरचा आधार घेत संबंधितांना श्रद्धांजली वाहते अथवा ‘त्या व्यक्तीचे शव लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी प्रयत्न करू’, असे आश्‍वासन देऊन गप्प बसते. मुळात असे आत्मघातकी ‘अमेरिकी स्वप्न’ भारतीय तरुणांनी पाहूच नये, यासाठी मात्र शासनकर्ते प्रयत्न करतांना दिसत नाहीत. हीच खरी शोकांतिका आहे.

मृत्यूस उत्तरदायी भारतीय व्यवस्था !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेवर येण्याआधी ‘मूळ अमेरिकेतील नागरिकांना अधिकाधिक नोकर्‍या मिळण्यासाठी विदेशातील नागरिकांसाठी असेलेले व्हिसा नियम अधिक कठोर करणार’, असे आश्‍वासन दिले होते. त्याप्रमाणे त्याची कार्यवाहीही चालू झाली आहे. ‘भारतीय लोक अमेरिकेत येऊन आमच्या पोटावर पाय ठेवतात’, अशी भावना तेथील अमेरिकी समाजामध्ये जोर पकडू लागली आहे. त्यामुळे तेथे शिकण्यासाठी किंवा नोकरीच्या निमित्ताने गेलेल्या भारतियांविषयी तेथील लोकांमध्ये द्वेषभावना आहे. अमेरिकी राष्ट्रवादाच्या दृष्टीने विचार केल्यास अमेरिकेत जाऊन बस्तान मांडणार्‍यांच्या नावाने बोटे मोडणे चुकीचे असू शकत नाही. येथे प्रश्‍न भारतीय राष्ट्रवादाचा आहे.

शरथ कोप्पू याला उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत का जावेसे वाटले ? त्याला भारतात ते का उपलब्ध करून दिले गेले नाही ? याचे उत्तर सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी द्यायचे आहे ? ‘ब्रेन ड्रेन’ (बुद्धीवान आणि कुशल अशा लोकांनी चांगल्या संधीपायी देश सोडून जाणे) या सूत्रावर भारतात बरेच बोलले अथवा लिहिले जाते. एका सर्वेक्षणानुसार अमेरिकेतील १२ टक्के वैज्ञानिक, ३८ टक्के आधुनिक वैद्य आणि नासातील ३६ टक्के शास्त्रज्ञ हे भारतीय आहेत. ‘भारतातच दर्जेदार उच्चशिक्षण घ्यायचे’, असा विचार जरी केला, तरी ती देणारी विद्यापिठे भारतात नाहीत. भारतातील एकाही विद्यापिठाचे नाव जगातील पहिल्या शंभर विद्यापिठात नाही, ही लाजीरवाणी गोष्ट नव्हे का ? शरथ कोप्पू यास उच्चशिक्षणाचा, चांगल्या नोकरीचा पर्याय भारतात उपलब्ध झाला असता, तर तो अमेरिकेला गेला नसता आणि त्याचे प्राणही वाचले असते. त्यामुळे ‘त्याच्या मृत्यूस एकप्रकारे भारतीय व्यवस्था, शिक्षणक्षेत्र हेही उत्तरदायी आहेत’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही !

राष्ट्रीय अस्मिता रुजवा !

सुखासीन जीवन कोणाला नको असते ? त्याची आस बाळगणे चुकीचे नाही; मात्र जेव्हा ‘राष्ट्रीय अस्मिता कि सुखासीन जीवन ?’ यांतील पर्याय निवडायचा झाल्यास किती भारतीय तरुण राष्ट्रीय अस्मितेला प्राधान्य देतात, हे पहावे लागेल. ही राष्ट्रीय अस्मिता निर्माण करण्यासाठी शिक्षण, तसे राष्ट्रीयत्वाने भारलेले वातावरण निर्माण करणे आवश्यक असते. दुर्दैवाने भारतात ते म्हणावे तितक्या प्रमाणात निर्माण होतांना दिसत नाही. त्यामुळेच भारतीय तरुणांना ‘अमेरिकी स्वप्न’ पडतात आणि ही स्वप्नपूर्ती करतांना ते स्वतःचा आत्मसन्मान, स्वाभिमान गहाण ठेवतात. ‘एक वेळ अल्प पगाराची नोकरी करीन; मात्र भारत सोडून कुठेही जाणार नाही’, असा निर्णय भारतीय तरुणांनी पक्का केल्यास ‘ब्रेन ड्रेन’ची समस्या बर्‍याच अंशी अल्प होईल.

अमेरिकेतील भारतियांची दुःस्थिती पहाता त्यांचे ‘अमेरिकी स्वप्न’ भंगले आहे. शरथ कोप्पू यांच्या हत्येच्या पार्श्‍वभूमीवर विदेशात शिकण्याची, तेथे नोकरी करण्याची किंवा स्थायिक होण्याची मनीषा बाळगणार्‍या भारतीय तरुणांच्या मनातील राष्ट्रीय अस्मिता जागृत करून त्यांना भारताच्या उत्कर्षाचे स्वप्न दाखवण्याची हीच वेळ आहे ! भारताच्या उत्कर्षाचे दायित्व हे भारतियांचे आहे. राष्ट्रीय उत्कर्षाचा मार्ग मात्र बिकट आहे. असे असले, तरी गेली अनेक शतके शेकडो युवकांनी सुखासीन जीवनाचा त्याग करून निवळ राष्ट्रोद्धारासाठी या मार्गावरून प्रवास केला आहे. या इतिहासाला आज उजाळा देण्याची आवश्यकता आहे. भ्रष्टाचार, धर्मांधता, अनाचार यांपासून मुक्त करण्यासाठी भारतमाता आपल्याला साद घालत आहे. आईच्या हाकेला लेकरांनी प्रतिसाद देणे, हे आपले कर्तव्य नव्हे का ?

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now