कलियुगामधील सर्वांत प्रभावी उपायपद्धत : बिदूदाबन

सध्याच्या कलियुगातील रज-तमात्मक वातावरणात जन्मलेला प्रत्येक जीव काही ना काहीतरी विकार घेऊनच जन्माला आलेला असतो. ‘विकार दूर करण्याच्या ‘अ‍ॅलोपॅथी’, ‘होमिओपॅथी’ यांसारख्या आधुनिक आणि आयुर्वेद या उपायपद्धती प्रचलित असतांना ‘बिंदूदाबन’ या उपायपद्धतीविषयी विशेषांक काढण्याची आवश्यकता काय’, असा प्रश्‍न कोणाला पडू शकतो. ‘जुने ते सोने’ या म्हणीनुसार प्रज्ञावंत ऋषीमुनींनी शोधलेली ‘बिंदूदाबन’ ही अतिप्राचीन उपायपद्धत महत्त्वाची आहे; कारण तिला अध्यात्मशास्त्रीय आधार आहे.

शरिरातील चेतनाशक्तीच्या प्रवाहांचे नियंत्रण करणारे शरिरावरील विशिष्ट बिंदू दाबल्यामुळे चेतनाशक्तीच्या प्रवाहातील अडथळे दूर होऊन विकारांवर मात करता येणे, हे ‘बिंदूदाबन’ उपायपद्धतीचे सूत्र आहे. या पद्धतीमुळे त्या त्या अवयवात चेतना निर्माण होऊन त्या त्या अवयवाचीच क्षमता वाढत असल्याने ही पद्धत अधिक मूलगामी आणि परिणामकारक ठरते. बिनखर्चिक आणि स्वतःच स्वतःवर उपाय करता येणार्‍या बिंदूदाबन उपायपद्धतीचा अंगीकार करून दैनंदिन जीवनात तोंड द्याव्या लागणार्‍या अनेक रोगांपासून स्वतःला दूर ठेवणे सहज शक्य होते. तसेच जीवनात घडणार्‍या काही प्रसंगांत वैद्यकीय उपायांची तात्काळ निकड भासते किंवा काही प्रसंगांत आधुनिक वैद्य आणि औषधे दोन्ही उपलब्ध नसतात, अशा वेळी ही पद्धत लहान-मोठ्या सर्वांसाठीच संजीवनी ठरते.

वैद्य मेघराज पराडकर

बिंदूदाबन उपायपद्धतीवर उपलब्ध असलेल्या बहुतांश ग्रंथांत मनुष्याच्या शारीरिक आणि मानसिक त्रासांचाच विचार केलेला आढळतो. सध्याच्या कलियुगात प्रत्येकाला न्यून-अधिक प्रमाणात आध्यात्मिक त्रास आहेच; किंबहुना बर्‍याचदा आध्यात्मिक कारणांमुळे शारीरिक आणि मानसिक त्रास निर्माण झालेले असतात. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर करण्यासाठी अनुक्रमे मध्यम दाब देऊन, हलकासा दाब देऊन आणि स्पर्श न करता प्रार्थना, नामजप, ध्यान आदी मार्गांनी आध्यात्मिक सामर्थ्यावर बिंदूदाबन उपाय कसे करावेत, याचे शास्त्रीय मार्गदर्शन, हे सनातन-निर्मित ग्रंथांचे अद्वितीय वैशिष्ट्य आहे. बिंदूदाबनविषयक ग्रंथमालिकेतील माहिती ‘बिंदूदाबन उपचार’ विशेषांकात दिली आहे.

आजच्या विशेषांकात बिंदूदाबन उपाय म्हणजे काय, उपायांचे महत्त्व, उपायांमुळे होणारे लाभ, शरिरावरील बिंदूंची ठिकाणे, बिंदूंवर दाब देण्याची योग्य पद्धत, उपाय केव्हा आणि किती वेळ करावेत, उपाय केव्हा करू नयेत, यांचे विवेचनही केले आहे.

बिंदूदाबनामुळे सूक्ष्मातूनही काही प्रक्रिया घडत असते. त्याचाही उलगडा विशेषांकातील लेखांतून होईल. अनवाणी चालणे, कानात आणि नाकात अलंकार घालणे, गोंदणे यांसारख्या हिंदूंच्या जीवनपद्धतीचा एक भाग बनलेल्या आचारांमुळे आपोआप बिंदूदाबन घडते. यातूनही  हिंदु धर्माची महानता लक्षात येईल.

बिंदूदाबन उपायपद्धतीचा दैनंदिन जीवनात उपयोग करून स्वतःचे आणि इतरांचेही जीवन व्याधीमुक्त आणि आनंदी बनवण्याची प्रेरणा अधिकाधिक जणांना मिळो, ही श्रीगुरुचरणी प्रार्थना !       

वेळ आणि पैसा वाचवणारी बिंदूदाबन पद्धत वापरून निरोगी जीवन जगा !

प्रत्येकालाच ‘आपण सदा निरोगी आणि आनंदी रहावे’, असे वाटत असते; परंतु सध्या निरोगी जीवन जगणे कठीण झाले आहे. प्रकृतीची थोडीशी कुरबूर वाटली की, आपण लगेच आधुनिक वैद्यांकडे धाव घेतो. यापेक्षा ‘बिंदूदाबन उपचारपद्धत’ अवलंबल्यास आपला वेळ आणि पैसा वाचण्यासह विकारावर मूलगामी उपचार होण्यासही साहाय्य होते. बहुतेकांना ‘बिंदूदाबन उपचारपद्धत ही चीनमधून आलेली आहे’, असे वाटत असते; परंतु प्रत्यक्षात तिचा उगम भारतातून झालेला आहे.

जीवनातील शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक यांसारख्या ८० टक्के समस्यांच्या मुळाशी आध्यात्मिक कारणे असतात. भूत, पिशाच यांसारख्या वाईट शक्तींचा त्रास हे प्रधान आध्यात्मिक कारण होय. वाईट शक्तींनी आपली स्थाने मनुष्याच्या शरिरात निर्माण केलेली असल्यामुळे बिंदूदाबन उपचार करतांना त्या स्थानांवरच प्रहार होतो. याला प्रत्युत्तर म्हणून वाईट शक्तीही उपचार करणार्‍यावर सूक्ष्मातून आक्रमण करण्याची शक्यता असते. भावपूर्ण प्रार्थना करून एकाग्रतेने नामजप करत बिंदूदाबन उपचार करणे, हा त्यावरील मार्ग आहे. ‘आजचा विशेषांक वाचून प्रत्येकाला नेहमीच्या विकारांवर बिंदूदाबन उपचार करून निरोगी जीवन जगता येवो’, ही आरोग्यदेवता भगवान धन्वन्तरीच्या चरणी प्रार्थना !

इतिहास

भारतात ५ सहस्र वर्षांपूर्वीपासून बिंदूदाबन उपायपद्धत प्रचलित असल्याचा सुश्रुत संहितेत उल्लेख आहे. सोळाव्या शतकात बिंदूछेदन उपायपद्धतीची जननी असलेल्या या उपायपद्धतीची माहिती अमेरिकेतील ‘रेड इंडियन’ या लोकांना होती. दुर्दैवाने उपायांच्या या प्राचीन पद्धतीचे योग्य रितीने जतन केले गेले नाही.

कालांतराने बिंदूछेदनाच्या रूपात ही पद्धत श्रीलंकेत पोहोचली. तेथील बौद्ध साधू आणि प्रवासी यांनी तिला चीन आणि जपान या देशांत पोहोचवले. चीनमध्ये या उपायपद्धतीचे महत्त्व जाणून तिच्यावर संशोधन करण्यात आले. त्यामुळे तेथे या उपायपद्धतीचा विकास आणि प्रसार झाला. २० व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत जनमानसाला विसर पडलेल्या बिंदूदाबन आणि बिंदूछेदन या शास्त्रांचे पुनरुज्जीवन चीनचे द्रष्टे राजकीय नेते अन् कट्टर साम्यवादी माओ-त्से-तुंग यांनी १९४९ मध्ये केले. त्यानंतर १९७१ वर्षापर्यंत या शास्त्राचा चीनमध्ये प्रसार होऊन ते प्रचलित झाले.

चीनमधून ही उपायपद्धत अमेरिकेत पोहोचली आणि तिचा प्रसार जगात झपाट्याने झाला. बिंदूदाबन आणि बिंदूछेदन या शास्त्रांना ‘विश्‍व आरोग्य संस्थेने’ मान्यता दिली.

‘बिंदूदाबन उपाय’ म्हणजे काय ?

शरिरातील विशिष्ट बिंदूंद्वारे आंतरिक अवयव कार्यान्वित करण्यासाठी बिंदूदाबन (अ‍ॅक्युप्रेशर), बिंदूछेदन (अ‍ॅक्युपंक्चर), झोन थेरपी, रिफ्लेक्सॉलॉजी या उपचारपद्धती अस्तित्वात आहेत; मात्र बिंदूदाबन ही जुनी आणि सोपी उपचारपद्धत आहे. शरिरावरील विशिष्ट बिंदूंवर दाब देऊन आंतरिक अवयव कार्यान्वित करणे आणि त्याद्वारे व्यक्तीचे स्वास्थ्य सुधारणे, तसेच देहातील त्या त्या भागाशी संलग्न शक्तीबिंदूंवर दाब देणे, म्हणजे ‘बिंदूदाबन उपाय’. बिंदू शिवरूपी लयशक्तीचे प्रतीक असल्याने देहातील त्या त्या अवयवाशी संबंधित एकत्रित ऊर्जारूपी चेतनेचे घनीकरण झालेल्या बिंदूरूपी ठिकाणाला आवश्यक त्या प्रमाणात दाबन देऊन व्याधीवर मात करणे, म्हणजेच बिंदूदाबन.

बिंदूदाबनाचे उपाय म्हणजे हातांचा वापर करून सगुण-निर्गुण स्तरावरील पंचतत्त्वांचा आधार घेणे. प्रत्यक्ष स्तरावर देहरूपी सगुण आणि अप्रत्यक्ष स्तरावर दाबनाचा आध्यात्मिक पाय यांचा वापर केला असल्याने हे उपाय सगुण-निर्गुण स्तरावरील जाणवतात.

मानवी जीवनातील शुद्धता आणि बिंदूदाबन उपाय

प्राचीन ऋषीमुनींनी साधनेद्वारे मानवी देहाला समजून घेऊन हा देह साधनेकरता उत्तम स्थितीत राखण्यासाठी, देहशुद्धीसाठी सांगितलेली ‘बिंदूदाबन’ ही एक उपायपद्धत आहे.

सात्त्विक मन आणि बुद्धी यांच्यामुळे, तसेच बिंदूदाबन पद्धतीने मानवी जीवनातील शुद्धता राखण्यास साहाय्य होणे

मन-बुद्धी यांचा उपयोग करून देहाला आपण शुद्ध ठेवू शकतो. ही कला म्हणजेच मानवाची आदर्श जीवनपद्धत आणि दिनचर्याच होय. त्यात पालट झाल्यास शुद्धता घटण्यास प्रारंभ होतो. बिंदूदाबनातून शुद्धता राखण्यात साहाय्य होते.

चेतना (प्राण) शक्ती घटणे किंवा थकवा येणे

उजव्या हाताचे कोपर आणि मनगट यांच्या मधोमध १ इंच व्यासाच्या वर्तुळात असलेल्या बिंदूवर २ मिनिटे थांबून दाब द्यावा.

हाताच्या करंगळीच्या दुसर्‍या पेरावर आणि पायाच्या करंगळीच्या मुळाशी २-३ मिनिटे दाब द्यावा.

कंगवा हातात आडवा घेऊन त्याचे दात बोटांच्या बाजूला येतील आणि कंगव्याच्या दातांचा दाब बोटांवर येईल, अशा पद्धतीने मूठ बंद करावी. कंगव्याचे दात बोटांच्या विरुद्ध दिशेला येतील आणि कंगव्याच्या दातांचा दाब तळहातावर पडेल, अशा पद्धतीने कंगवा हातात धरून मूठ बंद करावी.

मर्मस्थळे म्हणजेच बिंदूदाबनाची ठिकाणे !

मानवाच्या शरिरातील काही अवयव आणि शरिराचा काही भाग पुष्कळ नाजूक अन् महत्त्वाचा असतो. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आघात झाला असता व्यक्तीला गंभीर दुखापत होऊ शकते; व्यक्ती बेशुद्ध होऊ शकते, ती कायमची अधू किंवा मृत होऊ शकते. शरिरातील अशी स्थाने ‘मर्मस्थळे’ या नावाने ओळखली जातात. ती ‘मर्मस्थळे’ म्हणजेच बिंदूदाबनाची ठिकाणे होत. सहस्रो वर्षांपूर्वीपासूनच ऋषीमुनींना या मर्मस्थळांचे ज्ञान अवगत होते. त्यांनी प्रत्येक मर्मस्थळाला विशिष्ट नावही दिले आहे. आयुर्वेदातही मानवाच्या शरिरावरील महत्त्वाचे बिंदू आणि नाजूक स्थाने यांचे सविस्तर विवेचन दिलेले आढळते.

मर्मस्थळांच्या माहितीचा उपयोग स्वरक्षणविषयक युद्धप्रकारात केला जाणे

कोणते बिंदू (मर्मस्थळे) दाबल्यावर माणसाला बेशुद्ध करता येते किंवा माणूस मरू शकतो, याची माहिती चीनमधील लोकांना ज्ञात आहे. कोरिया आणि जपान येथील लोक ज्यूडो, कराटे यांसारख्या स्वसंरक्षणविषयक युद्धप्रकारात या माहितीचा उपयोगही करतात.

चेतनाबिंदूवर दाब दिल्याने होणारी प्रक्रिया

चेतनाबिंदू हा केवळ शारीरिक त्रास दूर करण्यासाठी कारणीभूत असतो असे नाही, तर हा बिंदू अधिकाधिक चैतन्य ग्रहण करून ते पूर्ण शरिरात पसरवतो. या बिंदूवर दाब दिल्याने शक्तीची सत्त्वगुणी कंपने निर्माण होतात. या कंपनांचे चैतन्यात रूपांतर होते. हे चैतन्य पूर्ण देहात भ्रमण करू लागते. त्यामुळे वाईट शक्तींनी देहात निर्माण केलेली स्थाने विघटित होतात आणि कालांतराने देहात सर्वत्र चैतन्य पसरते. प्रकृती आली की विकृती ही येतेच. विकृती जिवातील पृथ्वी आणि आप यांच्या कार्यकारी संयोगात्मक कार्यात बाधा आणते. ही बाधा बिंदूदाबनाच्या साहाय्याने देहातील चेतना प्रवाही रूपात सुरळीत करून दूर केली जाते.

आपत्काळात गुणकारी ठरणारी उपचारपद्धत !

कलियुगात रज-तमात्मक प्रभावाचा लय हा ठरलेला असल्याने सर्वच जनांना आपत्काळ आहे. हा आपत्काळ जितका भयावह, तितकाच दुःखदायीही आहे. अनेक द्रष्ट्या संतांनी सांगितल्याप्रमाणे विश्‍वावर ज्या वेळी भीषण संकटे येण्यास आरंभ होईल, त्या वेळी येणार्‍या प्रत्येक शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आपत्तीशी स्वयंपूर्ण रितीने लढणेच आवश्यक आहे; कारण या काळात महाभयंकर विनाशाला आरंभ होणार असल्याने कोणत्याच गोष्टीचे सुबत्तादर्शक प्राबल्य सर्वसामान्य जिवांना मिळणार नाही. अशा वेळी आपत्काळात बिंदूदाबन ही पद्धत अत्यंत गुणकारी आणि अतिशय आवश्यक बनणार आहे. बिंदूदाबनाचा वापर ही येणार्‍या काळाची आवश्यकता आहे. ती जाणून प्रत्येकानेच स्वयंपूर्ण बनवणार्‍या या उपायपद्धतीचा अभ्यास आणि वापर केला पाहिजे.

बिंदूदाबन शास्त्रानुसार दाबबिंदूंचे शरिरातील स्थान निश्‍चित असले, तरी ते माणसाची प्रकृती, वाईट शक्तींचा त्रास यांमुळे पालटत असल्याचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे

‘बिंदूदाबन (अ‍ॅक्युप्रेशर)’ उपचारपद्धतीमध्ये विविध विकार दूर होण्यासाठी शरिरावरील कोणते बिंदू दाबायचे, हे दिलेले असते. बिंदूदाबन शास्त्रानुसार या बिंदूंचे शरिरातील स्थान निश्‍चित असते. एप्रिल २०१५ मध्ये ‘हाता-पायांच्या तळव्यांवरील बिंदूदाबन (रिफ्लेक्सॉलॉजी)’ या ग्रंथाच्या निर्मितीची सेवा चालू असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले की, माणसाची प्रकृती, वाईट शक्तींचा त्रास आदी अनेक कारणांमुळे शरिरातील दाबबिंदूंचे स्थान पालटते. दाबबिंदूंचे नेमके स्थान समजले, तरच बिंदूदाबन उपचार अधिकाधिक यशस्वी होऊ शकतील.’

– वैद्य मेघराज पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.३.२०१७)

संदर्भ : सनातन प्रकाशित ग्रंथ ‘शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी ‘बिंदूदाबन’


Multi Language |Offline reading | PDF