भाजप-पीडीपी युतीची फलनिष्पत्ती !

संपादकीय

दोन तलवारी एका म्यानात राहू शकत नाहीत, हे जितके सत्य आहे, तितके दोन निरनिराळ्या विचारधारा सत्तेत एकत्र नांदू शकत नाहीत, हेही सत्य आहे. तसे झाल्यास काय होते, हे जम्मू-काश्मीरमध्ये उद्भवलेल्या राजकीय पीरस्थितीकडे पाहिल्यास लक्षात येईल. भाजपने जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी (पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी) या धर्मांध पक्षाला दिलेला पाठिंबा काढून घेतला. यामुळे सरकार कोसळून तेथे सध्या राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. गेली ३ वर्षे टिकलेल्या या युतीत दोन्ही पक्षांची राजकीयदृष्ट्या काय लाभ-हानी झाली, याचे विश्‍लेषण अन्य प्रसारमाध्यमे करतीलच; पण राष्ट्र आणि धर्म यांची किती अन् कशी अपरिमित हानी झाली, हे प्रामुख्याने पहाणे महत्त्वाचे ठरेल.

काश्मीरमधील जाचक कलम ३७० रहित करणे, काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करणे आदी सूत्रांच्या आधारावर भाजपने जम्मू-काश्मीरची निवडणूक लढवली. हिंदूंनीही त्याच्यावर विश्‍वास ठेवला आणि त्याला २५ जागा देत राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचा मोठा पक्ष बनवले. भाजपच्या इतिहासात असे प्रथमच घडले. असे असले, तरी कोणत्याही पक्षाला बहुमताचा ४४ हा आकडा गाठता आला नाही. मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपीला २८ जागांवर समाधान मानावे लागले होते. अशा त्रिशंकू परिस्थितीत भाजपने हिंदूंचा विरोध डावलून मुफ्ती यांच्या पीडीपीशी युती करण्याचे राष्ट्रघातकी पाऊल उचलले. हिंदूंच्या भ्रमनिरासाचा तो आरंभ होता. हिंदूंना नको असतांनाही भाजपने अट्टाहासाने युती केली. आता पीडीपीचा पाठिंबा काढतांना हाच भाजप पीडीपीच्या अपयशाचा पाढा वाचून दाखवत आहे. हेच त्याच्या अगोदर लक्षात आले नाही का ?

पीडीपीने धर्मस्वार्थ साधला !

जितक्या अविचाराने भाजपने ही युती केली, तसा अविचारीपणा पीडीपीने अजिबात दाखवला नाही. भाजपची हिंदुत्वनिष्ठ पार्श्‍वभूमी जाणून पीडीपीने युती करण्यापूर्वी भाजपसमोर कलम ३७० रहित न करण्याची राष्ट्रघातकी अट घातली होती. तरीही भाजपने राष्ट्रहिताचे कारण देत युती केली. पीडीपीने मात्र या सत्तेचा त्याच्या धर्मासाठी पुरेपूर वापर करून घेतला. युती तुटल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी केलेले विधान याची साक्ष देते. त्या म्हणाल्या, आमची भाजपसोबत युती होती; मात्र आम्ही भाजपला कलम ३७० ला हातही लावू न देण्याचा, तसेच दगडफेक करणार्‍या गुन्हेगारांवरील गुन्हे मागे घेण्याचा अमचा अजेंडा पूर्ण केला ! भाजपला यापेक्षा मोठी चपराकच आणखी कोणती असू शकेल ? भाजपने ३ वर्षे राज्यात सत्तेत राहून कोणता अजेंडा पूर्ण केला, हे तो सांगू तरी शकेल का ? पीडीपीशी युती करून भाजपने स्वतःच्या पायावर धोंडा तर मारून घेतलाच; पण जनतेचा विशेषतः हिंदूंचा विश्‍वासघातही केला. ही चूक भाजप स्वीकारणार का ?

जम्मूपर्यंत आतंकवाद पोहोचला !

भाजप-पीडीपीच्या सत्ताकाळात काश्मीरप्रश्‍नाने खर्‍या अर्थाने उग्र रूप धारण केले. आतापर्यंत धर्मांधांकडून सैन्यावर लपून-छपून केली जाणारी दगडफेक आता जणू त्यांचे धर्मयुद्धातील हत्यार बनले आहे. संपूर्ण गावच्या गाव आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ सैन्यावर चालून जाते. असे होऊ देणारा भारत हा जगातील एकमेव देश असावा. इतकी टोकाची परिस्थिती यापूर्वी क्वचित निर्माण होत होती. गेल्या काही वर्षांत त्यात झालेली लक्षणीय वाढ भाजपला रोखता आली नाही, हे त्याचे दारूण अपयश आहे. परिणामी काश्मीरचा प्रश्‍न न सुटता तो अधिकच जटील बनला. हिंदूंच्या आणि एकूणच राष्ट्राच्या दृष्टीने आणखी एक चिंतेचे सूत्र म्हणजे आतापर्यंत काश्मीरपर्यंत सीमित असलेला जिहादी आतंकवाद जम्मू या हिंदूबहुल भागापर्यंत पोहोचला. याच जम्मूतून भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या; तरीही तो तेथून रोहिंग्या मुसलमानांना हुसकावून लावू शकला नाही. आज रोहिंग्या मुसलमान किती डोईजड झाले आहेत, हे वेगळे सांगायला नको. या सर्वांस केंद्र सरकारही तितकेच उत्तरदायी आहे.

केंद्रात आणि राज्यात सत्तेत येण्यापूर्वी हाच भाजप विरोधी पक्षाच्या बाकांवरून काश्मीरप्रश्‍न सोडवण्याचा सूर आळवत होता; पण दैवाने दिलेली संधी त्याच्या कर्माने तो घालवून बसला. पीडीपीने सत्तेचा वापर धर्मांधतेसाठी केला, तर भाजप केवळ विकासाचाच कोरडा सूर आळवत राहिला. भाजप सरकारने जम्मू-काश्मीरच्या विकासावर पाण्यासारखा पैसा खर्च करूनही ते जनमत स्वतःच्या बाजूने वळवू शकले नाही. आता तर भाजपची राज्यातील सत्ताही गेली. म्हणजे त्याची स्थिती ना घर का ना घाट का, अशी झाली आहे. सत्ताकाळात विकासही झाला नाही आणि राष्ट्र अन् धर्म यांचे हितही साधले गेले नाही. हीच भाजप-पीडीपीच्या युतीची फलनिष्पत्ती होय ! भाजपची आणखी एक घोडचूक म्हणजे त्याने काश्मीरमध्ये केलेली एकतर्फी शस्त्रबंदी ! यापूर्वी भाजप काँग्रेसवर ज्या चुकीवरून टीका करत होता, तीच चूक त्याने सत्तेत आल्यावर स्वतःही केली. भाजपच्या या गांधीगिरीमुळे सैन्याची किती हानी झाली, हे सर्वांनाच ठाऊक आहे. सैन्याच्या झालेल्या मानसिक खच्चीकरणास सर्वस्वी भाजपच उत्तरदायी आहे. एवढे सर्व असूनही युती तोडतांना स्वतःच्या या चुका प्रांजळपणे मान्य करण्याऐवजी भाजपने आम्ही देशहितासाठी युती तोडत आहोत, असे निलाजरेपणे सांगितले. उसन्या राष्ट्रभक्तीचा आव आणण्याचा हा प्रकार आहे.

केंद्रात अजूनही भाजपची सत्ता आहे. भाजपला काश्मीरसाठी जर खरोखरच काही करायचे असेल, तर त्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून आतंकवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले पाहिजेत, फुटीरतावाद्यांना कारागृहात डांबले पाहिजे, काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी पावले उचलली पाहिजेत आणि पाकला धडा शिकवला पाहिजे. असे झाले, तरच हिंदूंचा भाजपवरचा उरलासुरला विश्‍वास टिकून राहील. अन्यथा निवडणुकीत पक्षाला त्याचे परिणाम भोगावे लागतील, हे निश्‍चित !


Multi Language |Offline reading | PDF