जम्मू-काश्मीर सरकारमधून भाजप बाहेर

मेहबूबा मुफ्ती यांचे त्यागपत्र

  • पीडीपीसह सत्ता स्थापन करून आतंकवाद नष्ट होणार नाही, हे लक्षात यायला भाजपला ३ वर्षे लागली का ?
  • केंद्रात भाजपची सत्ता असतांना एकतर्फी शस्त्रसंधी लागू करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्र्यांनी काश्मीरमधील दगडफेक करणार्‍यांना ‘लहान मुले’ संबोधून त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याचे घोषित केले. असे केल्यावर कधीतरी काश्मीरमध्ये शांतता निर्माण होईल का ?
  • केंद्रातील भाजप सरकारही देशातील विविध प्रश्‍नांवर अपयशी ठरत आहे, तर तेथूनही भाजप त्यागपत्र देणार का ?
  • भाजप स्वतःचे अपयश झाकण्यासाठीच सत्तेतून बाहेर पडत आहे, हे न समजायला जनता दूधखुळी नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे !

नवी देहली – जम्मू-काश्मीरमधील पीडीपी आणि भाजप यांच्या सरकारमधील भाजपने पाठिंबा काढून घेतल्याने सरकार कोसळले आहे. मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी राज्यपालांकडे त्यागपत्र दिले आहे. युती करण्यामागचे जे उद्देश होते, ते पूर्ण न झाल्याने आणि राज्यातील आतंकवाद वाढल्यामुळे सरकारमधून बाहेर पडत आहे, असे भाजप नेते राम माधव यांनी पाठिंबा काढतांना घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. तत्पूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप कार्यालयात एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये जम्मू-काश्मीरचे सगळे मंत्री, आमदार आणि प्रमुख नेते यांना बोलावण्यात आले होते. काश्मीरमधील परिस्थितीविषयी या बैठकीत विस्ताराने चर्चा झाली. याविषयी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशीही अमित शहा यांनी चर्चा केली. त्यानंतर पाठिंबा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

(म्हणे) ‘काश्मीरच्या शांततेसाठी पाकिस्तानशी चर्चा करण्याची पीडीपीची भूमिका !’ – मेहबूबा मुफ्ती

अशा नेत्यांशी भाजपने युती करून जम्मू-काश्मीरमध्ये ३ वर्षे सत्ता राबवली, यावरून ही युती किती अयोग्य होती, हेच लक्षात येते !

श्रीनगर – काश्मीरमध्ये शांतता हवी असेल, तर काश्मीरमधील लोकांसह पाकिस्तानशी चर्चा करण्याची आमची भूमिका आहे, असे जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी त्यागपत्र दिल्यानंतर सांगितले. पीडीपी आणि भाजप यांची युती तुटली, याचे मला काही आश्‍चर्य वाटले नाही. दोन्ही पक्ष एकाच हेतूने एकत्र आले होते, सत्तेचे राजकारण करणे, हा आमचा उद्देश नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मेहबूबा मुफ्ती पुढे म्हणाल्या की, राज्यात दडपशाहीचे राज्य चालू शकणार नाही. येथे गोडीगुलाबीनेच काम होऊ शकते. तरुणांवरचे गुन्हे मागे घेणे, विकासाची कामे करणे, शांतता राखणे, तसेच चर्चा करून कायदा-सुव्यवस्था प्रस्थापित करणे, हे आमचे धोरण होते.

काश्मीरमधील आतंकवादापासून भाजपने पळ काढला ! – काँग्रेस

पीडीपी आणि भाजप यांचे सरकार जेव्हा सत्तेवर आले, तेव्हापासूनच आतंकवाद बळावला. भाजपने ३ वर्षांनंतर चूक मान्य करत सत्तेतून काढता पाय घेतला आहे. पीडीपी आणि भाजप हे दोन्ही पक्ष जम्मू-काश्मीरच्या अशांततेसाठी उत्तरदायी आहेत. पत्रकार, सामान्य माणसे मारली गेली, सैनिक मारले गेले, या सगळ्यांचे दायित्व याच दोन्ही पक्षांचे आहे. या दोन्ही पक्षांचे सरकार त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाहीत, हे वाटतच होते. तसेच घडले आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते गुलाम नबी आझाद यांनी केली.

जम्मू-काश्मीरमध्ये सरकार बनवण्याची राजकीय पक्षांची हिंमत नाही ! – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

रमझानच्या मासात शस्त्रबंदी केल्यानंतर आतंकवादी कारवाया, ग्रेनेड आक्रमणे, दगडफेक यांमध्ये पुष्कळ वाढ झाली. यामध्ये ४१ जणांना प्राण गमवावे लागले. आतंकवादाच्या विरोधात ठोस कारवाई करणे, देशद्रोह्यांवरील गुन्हे मागे घेणे यांसारख्या कृतींमुळे भाजपला पाठिंबा काढावा लागला असू शकतो. असे असले, तरीही आतंकवाद्यांच्या भीतीमुळे नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस किंवा पीडीपी यांचे सरकार बनवण्याची हिंमत नाही. अशीच घटना इतर राज्यात घडली असती, तर सत्तास्थापनेसाठी हमरीतुमरी झाली असती; मात्र जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष पुढे आला नाही. आता त्या ठिकाणी राज्यपाल राजवट लागू होईल. तरीही आता प्राधान्याने आतंकवादविरोधी कारवायांचा वेग वाढवण्यासाठीच प्रयत्न करायला हवेत.

उशिराने का होईना, आत्मघातक युती तुटली, हे चांगले झाले ! – राहुल कौल, समन्वयक, युथ फॉर पनून कश्मीर

पीडीपी हा पक्ष फुटीरतावादाचा दुसरा तोंडवळा होता. भाजप आणि पीडीपी यांच्या कार्यकाळात देशद्रोही शक्ती सक्षम झाल्या. पूर किंवा नैसर्गिक आपत्तींच्या नावाखाली काश्मिरींना ८० सहस्र कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य केले गेले; मात्र आपल्याच देशातून विस्थापित झालेल्या साडेचार लाख काश्मिरी हिंदूंसाठी काही केले गेले नाही. भाजपने सत्तास्थापनेसाठी जेव्हा फुटीरतावाद्यांशी हातमिळवणी केली, म्हणजे एकप्रकारे फुटीरतावाद वाढवण्यासाठीच प्रोत्साहन दिले गेले. असाहाय्यता म्हणून भाजपने केलेली युती आत्मघातकी होती. भाजप आणि पीडीपी युती उशिराने का होईना तुटली, हे चांगले झाले.

(म्हणे) ‘वाढलेला हिंसाचार, आतंकवाद यांमुळे आम्ही सत्तेतून बाहेर !’ – भाजप

राम माधव पत्रकार परिषदेत म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये वाढलेला हिंसाचार, आतंकवाद यांमुळे आम्ही सत्तेतून बाहेर पडत आहोत. जम्मू-काश्मीरमध्ये शांतता नांदावी, हा आमचा मुख्य उद्देश होता, जो सफल होतांना दिसत नसल्याने आम्ही सत्तेतून बाहेर पडत आहोत. जम्मू-काश्मीरमध्ये पूर्ण सरकार नसल्याने भाजपच्या मंत्र्यांना काम करण्यात अडचणी येत होत्या. पीडीपीने सातत्याने आमच्या मंत्र्यांच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. मेहबूबा मुफ्ती या काश्मीरमधील परिस्थिती नीटपणे हाताळू शकल्या नाहीत. फुटीरतावादी लोकांची शक्ती आणि कारवाया वाढल्या. ज्यात विकासाची कामे थांबली. जम्मू आणि लडाखमध्ये विकास कामे पूर्णत: ठप्प झाली. राज्यात मूलभूत अधिकार असणारे भाषणस्वातंत्र्यही धोक्यात आले. त्यामुळे व्यापक देशहित लक्षात घेऊन आम्ही काश्मीरमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आम्ही सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ‘जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असल्याने तिथे राज्यपाल राजवट लागू करावी’, अशी मागणी आम्ही केली आहे. (पीडीपी आणि भाजप युती सरकारने कसा कारभार केला, हेच राम माधव यांनी सांगितले आहे ! या कारभाराला केवळ पीडीपीच उत्तरदायी नसून भाजपही तितकाच उत्तरदायी आहे.  – संपादक)

भाजपचा सत्ता सोडण्याचा निर्णय राजकीय ! – शिवसेना

लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत आणि भाजपला जम्मू-काश्मीरमध्ये घडलेल्या अप्रिय घटनांविषयी जाब विचारण्यात आला असता, हे लक्षात आल्याने भाजपने घेतलेला हा राजकीय निर्णय आहे. ही युतीच मुळात देशविरोधी आणि अनैसर्गिक होती. जम्मू-काश्मीरमधील युतीचे सरकार अधिक दिवस टिकणार नाही, असे शिवसेनेने यापूर्वीच म्हटले होते. भाजपने जम्मू-काश्मीरमध्ये एकतर्फी शस्त्रबंदी लागू केल्यानंतर आतंकवाद्यांनी ६६ आक्रमणे केली. ज्यात २२ सैनिक हुतात्मा झाले होते. यानंतर जर भाजपला हा चांगला विचार सुचला असेल, तर आम्ही त्याचे स्वागत करतो. १५ दिवसांत आतंकवाद्यांनी हैदोस घातला, आमच्या सैनिकांना हौतात्म्य पत्करावे लागले. या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा जाब तुम्ही कसा देणार ?, असा प्रश्‍न शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विचारला. ‘जम्मू-काश्मीरमध्ये जे रक्त सांडले, त्याचे उत्तर सरकारला द्यावेच लागणार आहे; मग ते पीडीपी असो, भाजप असो किंवा अजून कोणीही असो’, असेही ते म्हणाले.


Multi Language |Offline reading | PDF