आर्य हे मूळचे भारतातीलच होते आणि वैदिक क्रांतीही भारतातच झाली !

पुरातत्व खात्याचा हडप्पा संस्कृतीच्या संदर्भातील संशोधनाचा निष्कर्ष

डॉ. वसंत शिंदे

पुणे – ‘आर्य हे भारतातील नसून ते बाहेरचे होते आणि त्यांनी भारतावर आक्रमण केले’, हा सिद्धांत चुकीचा आहे. हरियाणातील राखीगडी येथे आढळलेल्या मानवी अवशेषांच्या संशोधनातून आर्य हे मूळचे भारतातीलच होते आणि वैदिक क्रांतीही भारतातच झाली, असा निष्कर्ष हडप्पा संस्कृतीच्या पुरातत्व खात्याच्या संशोधनातून काढण्यात आला आहे. येथील डेक्कन महाविद्यालयाचे कुलगुरु डॉ. वसंत शिंदे आणि लखनौच्या बिरबल साहनी संस्थेच्या डीएन्ए प्रयोगशाळेचे प्रमुख नीरज राय यांनी हे संशोधन केले असून ते लवकरच यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध करणार आहेत.

संशोधनाच्या संदर्भात कुलगुरु डॉ. वसंत शिंदे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे की,

१. राखीगडी येथे सापडलेल्या मानवी अवशेषांचे डीएन्ए स्थानिक नागरिकांचेच आहेत. त्यात विदेशी नागरिकांचा काही प्रमाणात अंश आढळला असला, तरी हे लोक मुख्यत: स्थानिकच असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

२. हे डीएन्ए ज्या काळातील लोकांचे आहेत, त्यानंतरचा काळ वैदिक आहे, त्यामुळे वैदिक पर्व हे संपूर्णपणे भारतीय असून विदेशी सहभाग अत्यल्प आहे.

३. वैदिक किंवा ऋग्वेदाचा काळ, अंत्यविधीच्या पद्धती, भांडी, बांधकामासाठी वापरलेल्या विटा, मानवी सांगाड्यावरून समजत असणारी त्यांची चांगली आरोग्यशैली हे वैदिक काळ आणि त्याचे प्रणेते आर्य हे पूर्णतः भारतीय असल्याचेच सांगतात.

४. अंत्यविधीच्या काही तत्कालीन पद्धती सहस्रो वर्षांनंतर आजही काही समुदायांमध्ये आढळतात.

५. हडप्पा संस्कृतीच्या मानवी अवशेषांमध्ये मध्य आशियातील लोकांचा अंश आढळत नाही. अत्यंत किरकोळ स्वरूपात इराणी अवशेष आढळतात; पण तेही एकमेकांशी असलेला संपर्क दाखवतात, संघर्ष नाही.

६. राखीगड हे हडप्पा संस्कृतीच्या संशोधनाची प्रचंड मोठी पुरातत्व खात्याची जागा असून ती हरियाणामधील हिसार येथे ३०० एकरमध्ये पसरलेली आहे. जवळपास ६ सहस्र वर्षांपूर्वीची ती अत्यंत प्रगल्भ संस्कृती होती, असे संशोधनाच्या माध्यमातून समजते.

७. परिणामी वैदिक संस्कृती आणि तिचे प्रणेते आर्य हे मूळचे स्थानिक भारतीयच होते अन् ते अत्यंत प्रगत होते, या विचारधारेस संशोधनामुळे मान्यता मिळण्याची शक्यता आहे.