युद्धापूर्वीची शांतता !

संपादकीय

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांच्यातील बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित भेट अखेर १२ जूनला नियोजनानुसार सिंगापूरमध्ये पार पडली. दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारान्वये उत्तर कोरियाकडून अण्वस्त्रबंदी आणि सध्या असलेली अण्वस्त्रे नष्ट करण्याच्या परताव्यात अमेरिकेकडून उत्तर कोरियाला विशेष सुरक्षेची हमी मिळणार आहे. कराराचे अशा आशयाचे स्वरूप आहे, असे बोलले जात आहे. विश्‍वभरातील प्रसिद्धीमाध्यमांनी ही भेट आणि करार यांचे ‘ऐतिहासिक’ असे विशेषण लावून वर्णन केले असले, तरी हे ‘ऐतिहासिक’पण किती काळ टिकेल, याविषयी शंकाच आहे. ट्रम्प ज्या देशाचे नेतृत्व करतात, त्या देशाने स्वार्थापोटी जगभरातील युद्धजन्य स्थितीमध्ये तेल ओतण्याचे काम केले आहे, तर सणकी डोक्याचे किम जोंग हे मुंग्या मारल्याप्रमाणे माणसे मारत आहेत. त्यामुळे ‘दोन्ही देशांकडून या ‘कागदी’ कराराची काय किंमत ठेवली जाईल’, हे कदाचित् ट्रम्प आणि किम दोघेही सांगू शकणार नाहीत. ‘ही भेट म्हणजे जगात शांती प्रस्थापित होण्यासाठी केलेले प्रयत्न आणि दोन्ही देशांनी घेतलेला पुढाकार यांची फलनिष्पत्ती आहे’, असा एका बाजूला डंका पिटला जात आहे; मात्र ही ‘शांती-समाधान’ मधली शांती नाही, तर युद्धापूर्वीची शांतता आहे, हे लक्षात घ्यायला हवे.

दुसर्‍या महायुद्धानंतर कोरियाचे दोन भाग होऊन उत्तर कोरियामध्ये चीन आणि रशिया धार्जिणे (साम्यवादी) सरकार आले, तर दक्षिण कोरियामध्ये अमेरिकी समर्थक शासक सत्तेत आला. उत्तर कोरियाने जेव्हा दक्षिण कोरियावर आक्रमण करून त्याचा बहुतांश भाग कह्यात घेतला, तेव्हा संयुक्त राष्ट्र संघामध्ये एक करार करून घेऊन अमेरिका अन्य देशांचे सैनिक घेऊन दक्षिण कोरियाच्या साहाय्याला आली आणि तिने उत्तर कोरियावर आक्रमण केले. तेव्हापासून उत्तर कोरियाचे दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्याशी शत्रुत्व आहे. दोन्ही देशांनी उघडपणे एकमेकांना संपवण्याच्या धमक्याही दिल्या आहेत. एकमेकांचे कट्टर शत्रू करार करून एकमेकांचे मित्र बनू शकत नाहीत. उत्तर कोरिया हा लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील ५२ वा मोठा देश असला, तरी सैन्यसंख्येमध्ये जगातील चौथा देश आहे. मध्यंतरी उत्तर कोरियाने अणूस्थळे नष्ट केल्याचा दावा केला असला, तरी उत्तर कोरियाकडे अनेक अण्वस्त्रे असल्याचा दावा केला जात आहे.

युद्धखोरांचे एकत्रीकरण वरवरचे !

उत्तर कोरिया आणि अमेरिका आज एकत्र आले असले, तरी या (कथित) मैत्रीबंधाच्या मुळाशी ‘भीती’ आहे. उत्तर कोरियावर चीनचे वर्चस्व आहे. किम जोंग उन हे सिंगापूर येथे भेटीसाठी आले, तेही चिनी विमानानेच ! चीनचे उत्तर कोरियात वर्चस्व वाढत असल्याने किम अस्वस्थ आहेत आणि आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे मोडकळीस आलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत, तर दुसरीकडे ‘अविचाराने कृती करणारे किम अमेरिकेवर कधीही अण्वस्त्रे डागू शकतील’, अशी अमेरिकेला भीती आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ही भेट होत आहे.

केवळ अण्वस्त्रे बनवण्याचा एककलमी कार्यक्रम राबवल्यामुळे उत्तर कोरिया आज भीकेला लागला आहे. स्वतःचे राष्ट्राध्यक्षपद टिकवून ठेवायचे असेल, तर राष्ट्राचे अस्तित्व टिकणे आवश्यक आहे. हे किम जोंग यांनी ताडल्यामुळे त्यांच्या डोक्यात चर्चेचे विचार येत आहेत, तर अमेरिकेलाही चीनला शह देत स्वतःचे वर्चस्व राखायचे असल्याने अमेरिकेने शांतीचा राग आळवायला प्रारंभ केला आहे. दोन युद्धखोर देशांचे प्रमुख आज शांतीची भाषा करत असतील आणि गळ्यात गळे घालून फिरायला लागले असतील, तरी त्यांची मूळ वृत्ती कधी उफाळून येईल, ते सांगता येणार नाही.

तिसरे महायुद्ध अटळ

या भेटीच्या पार्श्‍वभूमीवर ‘तिसर्‍या महायुद्धाचे संकट टळले’ असे काढले जाणारे निष्कर्ष अपरिपक्व आहेत. येत्या एक-दोन वर्षांत तिसरे महायुद्ध होणार हे अटळ असून त्याचा प्रारंभ केव्हा आणि कुठे होईल, हे केवळ अनिश्‍चित आहे. करारांवर स्वाक्षर्‍या करून शांती प्रस्थापित झाल्याचे एकही उदाहरण नाही. युद्धानंतरच शांती प्रस्थापित होते. ‘उत्तर कोरिया-दक्षिण कोरिया-अमेरिका-चीन-रशिया’ विवादात भारताने आतापर्यंत तटस्थ भूमिका घेतली आहे. ‘तटस्थ’ रहाण्याची भूमिका प्रत्येक वेळी मुत्सद्देगिरीची नसते. ‘तटस्थ’ भूमिकेचा अतिरेक हा नेभळटपणा ठरतो, हे भारताने लक्षात घ्यायला हवे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या चार वर्षांच्या काळात सर्व देशांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा वधारली आहे. भारताच्या सहिष्णु वृत्तीमुळे जगभरातील देशही भारताकडे मित्रत्वाच्या नात्याने पहात आहेत. या परिस्थितीचा लाभ घेऊन भारतानेही आंतरराष्ट्रीय राजकारणात एक सकारात्मक भूमिका घेणे अपेक्षित आहे.

शत्रू अंगावर येऊ नये; म्हणून सिद्धता करणार्‍या अमेरिकेकडून शत्रू लचके तोडत असतांनाही शस्त्रसंधी करणार्‍या भारताने बोध घेणे अपेक्षित आहे. ‘आपल्याला युद्ध नको असले, तरी युद्धाला आपण हवे असतो’, अशा एका प्रचलीत म्हणीच्या अनुषंगाने युद्धसज्जता ठेवली, तरच देशाचे अस्तित्त्व सुरक्षित राहील. भारतीय समाज हा एक योद्धा समाज आहे. दोन्ही विश्‍वयुद्धांमध्ये भारतीय सैनिकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भविष्यात होणार्‍या महायुद्धातही भारताची भूमिका महत्त्वाची असणार आहे; मात्र त्यासाठी भारताला त्याच्या धोरणांमध्ये आमूलाग्र पालट करावा लागेल. यासाठी प्रथम शस्त्रसंधीसारखी धोरणे राबवणे बंद करावे लागेल. भारतियांना शस्त्रविहिन करून अहिंसेचे डोस पाजणारे कायदे पालटावे लागतील. भारतीय सैन्याच्या सक्षमीकरणाकडे आणि आधुनिकीकरणाकडे लक्ष द्यावे लागेल. असे झाले, तर पूर्वीचा ‘विराट भारत’ पुन्हा उदयाला येईल.