नावाप्रमाणे आनंदी असणारे आणि प्रत्येक कृती परिपूर्ण करणारे श्री. आनंद जाखोटिया !

सौ. रेखा जाखोटिया

१. आनंदी

‘आनंद नावाप्रमाणेच आनंदी आहे. त्याचे नामकरण एका संतांनीच केलेले आहे. तो ८ – ९ मासांचा (महिन्यांचा) असेल, तेव्हा आमच्या घरी हरिद्वार येथून एक संत आले होते. त्यांच्याकडे बघून तो हसायचा आणि त्यांच्याजवळच २ – ३ घंटे बसून खेळत होता; म्हणून त्या संतांनी ‘इसका नाम ‘आनंद’ रखो । कितना हसमुख है ।’, असे माझ्या सासर्‍यांना सांगितले होते; म्हणून त्याचे नाव ‘आनंद’ ठेवले.

२. आवड-नावड अल्प असणे

एकदा आनंद लहान असतांना त्याचा वाढदिवस होता. तेव्हा त्याच्या काकूंनी (सौ. विद्या जाखोटिया यांनी) त्याला विचारले, ‘‘आनंद, तुला गोड काय करू ? तुला काय आवडते ?’’ तो म्हणाला, ‘‘काकू, काही करू नकोस. मला गूळ आवडतो.’’

मी प्रसारात सेवा करत होते. तेव्हा मला घरी यायला उशीर व्हायचा. त्या वेळी सकाळचे जे शिल्लक असेल, ते तो जेवायचा किंवा आल्यावर नुसता आमटी-भात केला, तरी त्याला चालायचे. कधी कधी तर तो स्वतः कूकर लावायचा. त्याने ‘मला हा पदार्थ पाहिजे’, असा कधीच हट्ट केला नाही. ‘त्याची साधना व्हावी; म्हणूनच देवाने त्याची आवड-नावड अल्प केली असावी’, असे मला वाटते.

३. सहनशील

अ. आनंद लहानपणापासूनच पुष्कळ सहनशील आहे. तो ८ ते १० वर्षांचा असतांना आजोळी (नाशिकला) होता. तेथे घरासमोर खेळतांना त्याला एका चारचाकी वाहनाने धडक दिली. त्यामुळे त्याच्या पायाचा पंजा पूर्ण तुटला आणि त्याच्या पायाला १ मास (महिना) प्लास्टर घातले होते, तरी त्याने न रडता त्या सर्व वेदना सहन केल्या होत्या.

आ. लहानपणी खेळतांना त्याला एक कुत्रा चावला आणि पोटावर इंजेक्शने घ्यावी लागली. ती त्याने न कंटाळता आणि न रडता घेतली.

इ. काही वर्षांपूर्वी सांगली येथे पोलिसांनी पू. संभाजी भिडेगुरुजी यांना निर्दयपणे मारले होते. तेव्हा आनंद तेथे बातमी घेण्यासाठी गेला होता आणि पोलिसांनी त्याच्यावरही लाठीमार केला, तरी त्याने प्रथम बातमी सिद्ध केली आणि मग तो घरी आला. तो घरी आला; परंतु त्याच्या तोंडवळ्यावर वेदनांचा लवलेशही दिसत नव्हता. काही वेळाने कपडे पालटतांना त्याच्या पाठीवर मला लाठीमाराच्या खुणा दिसल्या आणि माझ्या काळजात ‘चर्र’ झाले. तेव्हा मला त्याच्या ‘सहनशीलता’ या गुणाची जाणीव झाली.

४. तपशीलवार चिंतन करण्याची सवय असल्यामुळे प्रत्येक कृती परिपूर्ण होणे

घरातील किंवा बाहेरील कुठलेही काम असो, तो प्रथम तपशीलवार लेखी चिंतन करतो. त्यामुळे त्याला सेवेतील पूर्ण आनंद मिळतो. त्याच्यावर काम सोपवले की, पुन्हा पाठपुरावा करावा लागत नाही. त्याची सेवा अपेक्षेपेक्षाही अधिक परिणामकारक होते. तो माझ्याशी मध्यप्रदेशातील एका कार्यशाळेच्या नियोजनाच्या संदर्भात बोलत होता. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘त्याने अल्प व्ययामध्ये आणि अल्प साधकांच्या सहकार्याने ती कार्यशाळा अतिशय प्रभावीपणे पार पाडली होती.’

५. आईची सेवा चांगली केल्यामुळे परात्पर गुरुदेवांनी ‘मातृऋणातून मुक्त झालास’, असा आशीर्वाद देणे

तो कोणतीही कृती करण्यापूर्वी त्या सेवेतील फलनिष्पत्तीचा विचार करतो. मी वर्ष २०१० मध्ये रुग्णाईत झाल्यावर आनंदने माझी २ वर्षे मनोभावे सेवा केली. तेव्हा मी मिरज आश्रमात होते. मी आजारी पडल्याचे कळल्यावर तो गोव्याहून मिरजला आला. ‘बिछान्यावर खिळलेल्या रुग्णाचे किती आणि काय करावे लागते ?’, हे त्याला ठाऊक नव्हते, तरी सर्व गोष्टींचा अभ्यास करून तो माझी व्यवस्थित काळजी घेत होता. त्याने चिंतन करून दिनक्रम ठरवला. तसेच त्या वेळी त्याने आधुनिक वैद्या शरदिनी कोरे आणि आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांचे मार्गदर्शन घेतले. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले, ‘‘तू आईची सेवा पुष्कळ चांगली केलीस; म्हणून तू मातृऋणातून मुक्त झाला आहेस.’’

६. सेवेला बाहेरगावी असूनही आश्रमात आल्यावर तेथील सेवेची एकही संधी न सोडणे

तो मध्यप्रदेशात किंवा राजस्थान येथे सेवेला असतो; परंतु ४ दिवसांसाठी इकडे आला, तरी तो आश्रमातील सेवेची एकही संधी सोडत नाही. कुणाला काही साहाय्य हवे असल्यास तो लगेच साहाय्य करतो. तो भांडी घासण्याची सेवाही न कंटाळता करतो.

७. तो माझ्याजवळ बसतो, तेव्हा ‘माझ्या वेदनांची तीव्रता न्यून होत आहे’, असे मला जाणवते.

८. आनंदचे स्वभावदोष

धांदरटपणा आणि ‘आपण केलेले नियोजन किंवा आपले म्हणणे सर्वांनी मान्य करावे’, असे वाटणे

‘हे गुरुदेवा, मला तुमच्या कृपेने अशी आदर्श मुले लाभली आहेत. मी केवळ जन्म दिला; परंतु त्यांच्यावर साधनेचे संस्कार करून लहान वयात त्यांची प्रगती करवून घेतली, त्यासाठी मी आपल्या कोमल चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करते. तसेच ‘शेवटच्या क्षणापर्यंत आम्हा अज्ञानी बालकांचा हात सोडू नका’, हीच आपल्याला कळकळीची प्रार्थना करते.’

– सौ. रेखा नटवरलाल जाखोटिया (आई), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.११.२०१७)

श्री. आनंद जाखोटिया यांनी विविध प्रसंगांत आईला दिलेले साधनेविषयीचे दृष्टीकोन

श्री. आनंद जाखोटिया

‘रामनाथी (गोवा) येथील सहावे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन संपल्यावर आनंद १ दिवसासाठी देवद आश्रमात आला होता. त्या वेळी त्याने विविध प्रसंगांत मला दिलेले साधनेविषयीचे दृष्टीकोन पुढे दिले आहेत.

१. एका नातेवाइकाने दूरभाष करून विचारपूस करावी’, अशी आईची अपेक्षा असणे, श्री. आनंद यांनी ‘जीवनात कमीपणा घेतल्यामुळे पुष्कळशा अडचणी अल्प होतात’, असे सांगून आईला त्या नातेवाइकांना दूरभाष करायला सांगणे आणि त्यानंतर आईला त्या विचारांतून लगेच बाहेर पडता येणे

माझ्या मनात एका नातेवाइकांविषयी पुष्कळ दिवसांपासून अपेक्षा होती, ‘त्याने दूरभाष करून माझी विचारपूस करावी’, तसेच ‘त्यांना मी स्वतः का दूरभाष करायचा ?’, असा प्रतिमा जपण्याचा भाग माझ्याकडून होत होता. माझ्या मनातील हे विचार मी आनंदला सांगितले. तेव्हा त्याने सांगितले, ‘‘आई, आपल्याकडे श्रेष्ठत्व नको, तर आपण लहान होणे आवश्यक आहे. जीवनात कमीपणा घेतल्यामुळे आपल्या पुष्कळशा अडचणी आणि मतभेद अल्प होतात.’’ त्यानंतर ‘‘ते दूरभाष करत नाहीत, तर तू कर’, असे तो सहज बोलला आणि मी त्या विचारांतून लगेच बाहेर पडले. दुसर्‍या दिवशी ‘त्या नातेवाइकाला कधी दूरभाष करते’, असे मला झाले होते. मी दूरभाषवरून त्यांची क्षमा मागितली. तेव्हा मला पुष्कळ हलके वाटले आणि माझ्या मनात गुरुदेवांविषयी कृतज्ञतेचा भाव दाटून आला.

२. शारीरिक वेदना सुसह्य होण्यासाठी आईला कृतज्ञताभाव वाढवण्यास सांगणे

मी त्याला सांगितले, ‘‘मला पुष्कळ वेदना सहन कराव्या लागतात.’’ तेव्हा तो मला म्हणाला, ‘‘आई, ‘मी तीव्र वेदना भोगते’, असे न म्हणता तू ‘माझे घोर प्रारब्ध सुसह्य करण्यासाठी मला साहाय्य मिळत आहे’, असा विचार केलास, तरच तुझा कृतज्ञताभाव वाढेल. अन्यथा ‘मी वेदना भोगते. मला तीव्र त्रास होत आहे’, या विचारांनी तुझा अहं वाढेल.’’

३. श्री. आनंद यांनी सांगितलेली अन्य सूत्रे

अ. सन्मान परिस्थितीचा होतो, व्यक्तीचा नाही.

आ. आपण ‘प्रतिमा जपणे’ या स्वभावदोषामुळे मनमोकळेपणाने बोलू शकत नाही.

ही सूत्रे आनंद मला सांगत होता. त्या वेळी मला त्याच्या बोलण्यात चैतन्य जाणवत होते. त्यामुळे माझे डोळे खाड्कन उघडले आणि मी अंतर्मुख होऊन चिंतन करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.’

– सौ. रेखा नटवरलाल जाखोटिया (आई), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.११.२०१७)

श्री. आनंद जाखोटिया

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now