अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील वाद संपुष्टात

डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांच्यात ५० मिनिटे चर्चा

सिंगापूर – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांच्यामध्ये १२ जून या दिवशी येथील कॅम्पेला हॉटेलमध्ये ऐतिहासिक भेट झाली. यानंतर त्या दोघांमध्ये अनुमाने ५० मिनिटे चर्चा झाली. त्यात दोघांमध्ये काय चर्चा झाली, हे अद्याप उघड झालेले नाही. गेली ६ दशके या दोन्ही देशांमध्ये वाद चालू होता. किम जोंग गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेला सातत्याने अण्वस्त्र युद्ध करण्याची धमकी देत होते; मात्र गेल्या ६ मासांपासून त्यांनी अमेरिकेशी चर्चा करण्याची सिद्धता दर्शवली होती. त्यांनी गेल्याच मासात त्यांचा पारंपारिक शत्रू दक्षिण कोरियाचा दौरा केला होता. यानंतर त्यांनी त्यांचा अण्वस्त्र चाचणीचे स्थळही नष्ट केले होते.

 कोणतीही मोठी समस्या आम्ही चुटकीसरशी सोडवू ! – ट्रम्प

या ऐतिहासिक भेटीनंतर ट्रम्प यांनी किम यांचे कौतुक केले. ट्रम्प म्हणाले, ‘‘किम यांच्यासमवेतची चर्चा खूपच चांगली झाली. कोणतीही मोठी समस्या आम्ही दोघे चुटकीसरशी सोडवू शकतो. दोघेही एकत्र आल्यास यश हमखास मिळू शकते आणि तो दिवस लवकरच येईल. आगामी काळात दोन्ही देशांतील संबंध चांगले रहातील. किम यांच्या भेटीमुळे मी खूपच आनंदीत आहेे.’’

किम जोंग म्हणाले, ‘‘सिंगापूरमध्ये होणार्‍या या बैठकीच्या वाटेत अनेक अडथळे होते. ते अडथळे पार करून येथे पोहोचलो.’’

भेट होण्यापूर्वी या हॉटेलच्या लायब्ररीमध्ये दोन्ही नेत्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले, ‘‘या भेटीनंतर आमच्यात चांगले संबंध प्रस्थापित होतील याची मला खात्री आहे. या भेटीचा मूळ उद्देश उत्तर कोरियातील अण्वस्त्र चाचण्यांवर बंदी घालण्यात यावी, हा आहे. किम जोंग उन यांनीही यासाठी आपण सिद्ध असल्याचे म्हटले होते; मात्र अण्वस्त्र चाचण्या बंद केल्या, तर त्या बदल्यात उत्तर कोरियाला काय हवे आहे, याचे उत्तर आजच्या भेटीनंतर मिळणार आहे.’’