थायलंडमध्ये देवमाशाच्या पोटात सापडले ८ किलो प्लास्टिक

  • प्लास्टिक हा विज्ञानाचा शोध आहे आणि त्याचे दुष्परिणाम दिसत आहेत. तरीही विज्ञानवादी म्हणतात की, ‘विज्ञानामुळे जगाची प्रगती झाली !’
  • पाण्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केल्यामुळे प्रदूषण होते; म्हणून बोंब ठोकणार्‍या अंनिससारख्या संस्था प्लास्टिकमुळे होणार्‍या हानीविषयी मात्र सोयीस्कर मौन बाळगतात !

बँकॉक – जगभरामध्ये प्लास्टिकच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. याचा फटका मनुष्यासह प्राण्यांनाही बसत आहे. याचाच प्रत्यय थायलंडमध्ये दिसून आला. थायलंडच्या समुद्रकिनार्‍यावर नुकताच एक देवमासा घायाळ स्थितीत आढळून आला होता. डॉक्टरांना या देवमाशाच्या पोटात तब्बल प्लास्टिकच्या ८० पिशव्या मिळाल्या. या पिशव्यांचे वजन ८ किलो आहे. पोटातील प्लास्टिकमुळे देवमाशाने खाणपिणे सोडले होते. डॉक्टरांच्या प्रयत्नानंतरही देवमाशाचा मृत्यू झाला.

१. सागरी अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार देवमाशाचे खाद्य समुद्रीफेनी, ऑक्टोपस आणि छोटे मासे हे आहे; परंतु समुद्रामध्ये तरंगणारे प्लास्टिक हे आपले खाद्य आहे, असे समजून सागरी जीव त्याला गिळतात.

२. एप्रिल मासात स्पेनच्या समुद्र किनार्‍यावरही एक देवमासा वाहून आला होता आणि त्याच्या पोटात २९ किलो प्लास्टिकच्या पिशव्या आढळून आल्या होत्या.

३. जगभरात तब्बल ८ लाख टन प्लास्टिक समुद्रामध्ये फेकले जाते. हे प्लास्टिक माशांच्या पोटात जाते. त्यामुळे सागरी जीव मृत्यूमूखी पडत आहेत.

४. भारतातही नेहमीच गाय, बैल यांच्या पोटामध्ये प्लास्टिक सापडल्याची माहिती समोर येत असते. गेल्या मासात पुण्यामध्ये एका जिवंत बैलाच्या पोटातून तब्बल ८५ किलो प्लास्टिक बाहेर काढले गेले होते. या प्लास्टिकमुळे बैल काहीच खात नव्हता आणि फिरूही शकत नव्हता.