देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकू आणि सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांची सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

 

 

 

 

 

१. शिकायला मिळालेली सूत्रे

सौ. अंजली झरकर

१ अ. सद्गुरूंचा प्रेमभाव

१ अ १. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकू यांनी केवळ दृष्टीक्षेपातूनच जवळीक साधणे : ‘मी एकदा सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू यांच्या खोलीत सेवेनिमित्त गेले होते. तेव्हा त्यांनी माझी प्रेमाने विचारपूस केली. त्यांनी माझ्याकडे प्रेमाने पाहिले. तेव्हा मी मानसरित्या आपोआपच त्यांच्या चरणांजवळ बसले आणि माझे डोके त्यांच्या मांडीवर ठेवलेे. त्या वेळी एका दृष्टीक्षेपातच त्यांनी मला पुष्कळ जवळ केल्याचे मला जाणवले.

१ अ २. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी स्वतःला पुष्कळ त्रास होत असूनही सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंची सेवा करण्यास प्राधान्य देण्यास सांगून देवाने दिलेल्या संधीचा लाभ करून घेण्यास सांगणे : सद्गुरु (कु.) अनुताईंना (सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांना) पुष्कळ त्रास होत होता, तरीही त्यांनी आम्हाला (मला आणि कु. श्‍वेता पट्टणशेट्टी हिला) सांगितले, ‘‘तुम्ही माझ्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही सद्गुरु गाडगीळकाकूंची सेवा करा. देवाने तुम्हा दोघींना सेवेची चांगली संधी दिली आहे. तिचा लाभ करून घ्या.’’ तेव्हा आम्हाला वाटले, ‘सद्गुरु अनुताईंनी हे सांगून आमच्या कल्याणासाठी संकल्पच केला आहे.’ ही सेवा पूर्ण होईपर्यंत त्यांचा संकल्प कार्यरत असल्याचे आम्हाला जाणवले.

२. भगवंताच्या कृपेमुळे सद्गुरूंची सेवा सहजतेने होणे

२ अ. दोन्ही सद्गुरूंच्या वेगवेगळ्या वेळा सांभाळणे शक्य होणे : सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू आणि सद्गुरु अनुताई यांच्या जेवणाच्या वेळा निरनिराळ्या होत्या. त्या वेळी सद्गुरुकाकू केवळ ताक पिऊन रहात होत्या. तरीही मला भगवंताच्या कृपेमुळे मला त्यांच्या वेळा सांभाळणे शक्य झालेे.

२ आ. सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंची सेवा करतांना स्वयंपाक सेवेतील साधकांशी समन्वय साधणे शिकता येणे आणि देवाने सहजतेने अन् आनंदाने सेवा करून घेणे : मी आश्रमात अन्य सेवा करते. मला माझ्या सेवेअंतर्गत कधी समन्वय साधण्याची आवश्यकताही भासली नव्हती. सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंची सेवा मिळाल्यावर आश्रमातील साधिका कु. स्नेहा झरकर हिने मला सांगितले, ‘‘तुमचा आणि स्वयंपाक सेवेतील साधकांचा समन्वय असायला हवा. त्यामुळे तुमच्या सेवेत अडचणी येणार नाहीत.’’ हे ऐकल्यावर ‘मला हे जमेल कि नाही’, असा मनात कोणताही विचार आला नाही. सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंना दिवसांतून २ – ३ वेळा ताक लागत होते. तेव्हा प्रत्येक वेळी दही लावले का, हे पहाणे, शेष दही स्वयंपाकघरात देणे’, इत्यादी कृती करतांना माझ्याकडून स्वयंपाकघराशी सहजतेने समन्वय साधला जात होता. सेवा पूर्ण झाल्यावर देवाने किती सहजतेने आणि आनंदाने सेवा करून घेतली, यासाठी मला कृतज्ञता वाटली.

२ इ. सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंनी सेवा प्रेमाने समजावून सांगितल्याने सर्व काही वेळेवर करता येणे : कु. स्नेहाने मला माझ्या सेवेची व्याप्ती समजावून सांगितली. मी सर्व लिहून घेतले; परंतु तरीही मला आत्मविश्‍वास वाटत नव्हता. प्रत्यक्षात प्रत्येक वेळी सद्गुरु (सौ.) काकू इतक्या प्रेमाने सेवा सांगत होत्या की, ते सर्व माझ्या मनापर्यंत पोहोचत होते. त्या एका वेळी एकच सेवा सांगत होत्या आणि ती सेवा झाल्यावर पुढे काय करायचे, हे सांगत होत्या. त्यामुळे मला सर्व गोष्टी वेळेत करता आल्या.

२ ई. मनाचा संघर्ष न होता आपोआप सेवा होणे : तीन दिवस माझ्या मनात केवळ ‘सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू आणि सद्गुरु (कु.) अनुताई यांचाच विचार होता. ‘कसलेही ध्येय न ठेवताही सेवा केवळ निरपेक्षपणे आपोआप होत आहे’, हे मी अनुभवत होते. माझ्याकडून सर्व कृती सहजतेने होत होत्या. मला वेगळे प्रयत्न करावे लागले नाहीत किंवा माझ्या मनाचा कुठेही संघर्षही झाला नाही.

३. अनुभूती

३ अ. सर्वकाही देवाच्या चैतन्याने होत असल्याची जाणीव होणे : एकदा सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू म्हणाल्या, ‘‘आपण काहीच करत नाही. आपल्यातील चैतन्यच कार्य करत असते.’’ हे ऐकल्यावर लक्षात आले की, माझ्याकडून ज्या काही कृती केल्या, त्या सर्व भगवंताच्या चैतन्यामुळेच झाल्या. त्या वेळी ‘माझे शरीर, मन आणि बुद्धी सर्व काही वेगवेगळे आहेत, मी त्या सर्वांकडे साक्षीभावाने पहात आहे आणि सर्व काही आपोआप होत आहे’, याची मी प्रथमच अनुभूती घेतली.

३ आ. दिवसभरात पुष्कळ वेळा जिन्यावर चढ-उतर करावे लागूनही सेवा पूर्ण होईपर्यंत त्रास न होणे आणि पाय दुखत असल्याची जाणीवही न होणे : देवद आश्रमात माझी खोली तिसर्‍या माळ्यावर आहे. जिना चढतांना माझ्या पायात गोळे येतात आणि पाय दुखतात; म्हणून मी सकाळी खाली आल्यावर शक्यतो रात्रीच खोलीत जाते. मला न्यूनतम १ – २ वेळा खोलीत जावे लागते. सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंची खोली दुसर्‍या माळ्यावर होती. मला दिवसभरात पुष्कळ वेळा जिना चढ-उतर करावे लागत होते; पण सेवा करत असतांना मला एकदाही त्रास झाला नाही. ‘माझे पाय दुखतात’, याची मला एकदाही जाणीव झाली नाही. उलट माझा उत्साह आणि आनंद यांत पुष्कळ मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती.

३ इ. भगवंताच्या कृपेने तहान-भूक विसरून सेवा करता येणे : गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ९.३० वाजता कार्यक्रमाला आरंभ होणार होता. मी आणि श्‍वेताताई सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू अन् सद्गुरु अनुताई यांच्या सेवेत व्यस्त होतो. दोघींनी सेवा करूनही सकाळी ९.३० वाजेपर्यंत आमच्या सेवा संपल्या नाहीत. त्याच वेळी पू. (सौ.) अश्‍विनीताईंची (पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांची) सेवा करण्याची संधीही देवाने आम्हाला दिली. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या वेळी माझ्या पोटात दुखायला लागलेे. तेव्हा मी अल्पाहार न केल्याचे माझ्या लक्षात आले. नेहमी मला सकाळी ८.३० वाजताच भूक लागते; पण त्या दिवशी मला सेवेत असल्यामुळे भुकेची जाणीवच झाली नाही. तेव्हा ‘भगवंतच माझ्याकडून झोकून देऊन सेवा करवून घेत आहे’, या विचाराने मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

३ ई. सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंना अलंकार घालत असतांना ‘साक्षात महालक्ष्मीदेवीला अलंकारांनी सजवत आहे’, असे जाणवणे : सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंच्या मर्दनाची सेवा करतांना त्यांचे अलंकार काढून ठेवावे लागतात. सकाळी मी त्यांच्या चरणांजवळ बसून त्यांच्या पायांच्या बोटांत जोडवी घातली. त्यानंतर मी त्यांचे पाय माझ्या मांडीवर ठेवून त्यांना पैंजण घातले. सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंना अलंकार घालतांना मला माझे अस्तित्व मुळीच जाणवत नव्हते. त्या वेळी ‘मी साक्षात महालक्ष्मीदेवीला अलंकारांनी सजवत आहे’, असे मला जाणवत होते आणि मला वेगळीच अवस्था अनुभवायला मिळाली. ती शब्दांत मांडता येत नाही. त्या वेळी ‘देवळातील पुजारी ज्याप्रकारे मूर्तीला वस्त्रालंकारांनी सजवत असतात, त्याप्रमाणे साक्षात देवीला अलंकार घालण्याची संधी भगवंताने या जिवाला दिली आहे’, असे मला वाटले आणि माझ्याकडून पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.

३ उ. सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंना मर्दनासाठी तेल लावतांना त्यांच्या चरणस्पर्शाने स्वतःच्या अवयवांत पालट जाणवून ते कृतज्ञता व्यक्त करत असल्याचे जाणवणे आणि सहसाधिकेच्या तोंडवळ्यावर वेगळेच तेज जाणवणे : एकदा मी आणि श्‍वेताताई सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंना मर्दन करण्याची (मालिशची) सेवा करतांना त्यांच्या चरणांना तेल लावत होतो. त्या वेळी ‘माझ्या सर्व अवयवांत काहीतरी पालट होत आहे’, असे मला वाटले. सद्गुरु (सौ.) काकूंच्या चरणांना स्पर्श होता क्षणीच माझे सर्व अवयव कृतज्ञता व्यक्त करत असल्याचे मला जाणवलेे. त्या वेळी माझी स्थिती वेगळीच होती. मी श्‍वेताताईकडे पाहिले. त्या वेळी ‘तीसुद्धा वेगळ्याच विश्‍वात आहे’ असे दिसून तिच्या तोंडवळ्यावरही वेगळेच तेज जाणवत होते.

४. गुरुपौर्णिमेच्या कालावधीत सद्गुरूंच्या सेवेची संधी मिळाल्याने गुरुपौर्णिमा अविस्मरणीय वाटणे

गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी सर्व सेवा झाल्यावर मी आणि श्‍वेताताई सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंना मर्दन (मालीश) करण्यासाठी गेलो. त्या वेळी सर्व सेवा होईपर्यंत आम्हाला रात्रीचा १.३० वाजला. त्या वेळी सद्गुरु अनुताई आम्हाला म्हणाल्या, ‘‘तुम्ही आता बोलत बसू नका. लवकर झोपा. सकाळी लवकर उठायचे आहे.’’ आम्ही ‘‘हो’’ म्हणालो; परंतु आमचे पाय आमच्या खोलीकडे वळतच नव्हते. आम्ही तिथेच मार्गिकेत बसून बोलत होतो. ‘कुठल्यातरी जन्माच्या पुण्याईमुळेच आज आपल्याला भगवंताने ही सेवा उपलब्ध करून दिली आहे. आपल्यासाठी सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू आणि सद्गुरु अनुताई यांची सेवा म्हणजेच गुरुपौर्णिमा आहे. प्रत्येक क्षणी भगवंताची सेवा करायला मिळणे महत्त्वाचे. ही गुरुपौर्णिमा आपल्यासाठी अविस्मरणीय असेल’, असे आम्हाला वाटत होते.

५. कृतज्ञता

५ अ. साक्षात महालक्ष्मीची सेवा करायला मिळाली; म्हणून कृतज्ञता वाटणे : श्‍वेताताई म्हणाली, ‘‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी बाहेर समाजात भोंदू संतांचे दर्शन घेण्यासाठी कितीतरी लोक धडपड करत असतात. आज आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी साक्षात सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू आणि सद्गुरु अनुताई यांची स्थुलातून सेवा करण्यास मिळाली. हे आपले किती मोठे भाग्य आहे ! ’’ नंतर आम्हाला वाटले, ‘सर्व वारकरी आणि भाविक किती परिश्रम घेऊन पंढरपूरला विठ्ठलाच्या मंदिरात येतात आणि एकदा तरी त्याच्या चरणांना स्पर्श करायला मिळावा (त्याच्या चरणांवर डोके ठेवायला मिळावे), यासाठी ते किती धडपड करतात ! आज आमचे किती मोठे भाग्य आहे ! आम्हाला साक्षात महालक्ष्मीच्या चरणांची सेवा करायला मिळाली. त्यांच्या चरणांना स्पर्श करायला मिळाला.’

५ आ. ‘साधनेत प्रगती होण्यासाठी चैतन्य मिळावे; म्हणून ही सेवा मिळाली’, असे वाटणे : आमच्या मनात विचार आला, ‘सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू साक्षात महालक्ष्मी आहेत; परंतु हे जगाला कळण्यापूर्वीच भगवंताने आपल्याला सेवेची संधी देऊन त्यांच्या सगुण रूपाची सेवा करवून घेतली आहे’, आपल्याला ही सेवा देण्यामागील गुरूंचा कार्यकारणभाव आपण कधीच ओळखू शकणार नाही; पण एवढेच लक्षात येते की, साधनेत पुढे जाण्यासाठी आवश्यक ते चैतन्य आपल्याला मिळावे; म्हणून आपल्याला ही सेवा मिळाली.’ या विचाराने दोघींनाही पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.

५ इ. साधना होत नसतांना भगवंताने ही सेवा दिल्यामुळे पुष्कळ कृतज्ञता वाटणे : आपल्याकडून स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होण्यासाठी, तसेच भावजागृतीसाठी प्रयत्न होत नाहीत. गुरूंना अपेक्षित साधना होत नाही, तरीही भगवंताने या सेवेसाठी आपली निवड केली, याविषयी दोघींना पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. रात्री आम्ही संतांच्या सहवासातील आनंद एकमेकींना सांगून तो पुन्हा अनुभवत होतो.

६. सेवेत झालेल्या चुका

६ अ. केवळ दिलेली सेवाच करणे : माझ्याकडे केवळ सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू यांना जेवण आणि अल्पाहार देण्याचे नियोजन होते. त्या सेवेव्यतिरिक्त मी अन्य कुठल्याच गोष्टींकडे लक्ष देत नव्हते. मला श्‍वेताताईने सांगितले, ‘‘आपण सर्वच ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे. तीच आपली सेवा आहे.’’ त्यानंतर माझे तसे प्रयत्न होऊ लागले. मी येथे पुष्कळ अल्प पडले.

६ आ. माझ्याकडून सद्गुरु (कु.) अनुताईंची सेवा व्यवस्थित आणि वेळेत झाली नाही. शेवटच्या दिवशी त्यांचे कपडे बॅगेमध्ये ठेवायला मला उशीर झाला.

‘हे भगवंता, तू आमच्यासाठी किती करत आहेस, याची जाणीवही या जिवाला होत नाही. हे भगवंता, प्रत्येक सेवा कृतज्ञताभावाने होण्यासाठी तूच माझ्याकडून प्रयत्न करून घे’, अशी तुझ्या कोमल चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. अंजली झरकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.७.२०१७)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now