के.टी. नवीन कुमार यांच्या ‘पॉलिग्राफ टेस्ट’चा अहवाल पोलिसांनी का लपवला ? – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

गौरी लंकेश हत्या प्रकरणी हिंदु जनजागृती समितीला गोवण्याचे राजकीय षड्यंत्र !

डावीकडून श्री. प्रमोद मुतालिक, श्री. मोहन गौडा, पत्रकारांना संबोधित करतांना अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अधिवक्ता अमृतेश एन्.पी.

बेंगळूरू (कर्नाटक) – येथील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचे अन्वेषण करणार्‍या विशेष अन्वेषण पथकाने (‘एस्आयटी’ने) मड्डूर (कर्नाटक) येथील हिंदु युवा सेनेचे श्री. के.टी. नवीन कुमार यांच्यासह अन्य ४ जणांना अटक केली आहे. यासंबंधी निवडक माहिती प्रसृत करून हिंदु जनजागृती समितीची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत असून त्यामागे राजकीय षड्यंत्र आहे. एकीकडे हिंदुत्वनिष्ठांची नावे या प्रकरणात घेतली जात असतांना अटक केलेले संशयित श्री. नवीन कुमार यांच्या गुजरात येथील ‘फॉरेन्सिक लॅब’मध्ये केलेल्या चाचणीचा आणि त्या चाचणी अहवालाचा उल्लेख पोलीस करतांना दिसत नाहीत. या चाचणीमध्ये श्री. नवीन कुमार यांच्याकडून पोलिसांनी बळजोरीने लिहून घेतलेल्या जबाबातील सर्व आरोप खोटे असल्याचे स्पष्ट होते. श्री. नवीन कुमार यांच्या काही कार्यकर्त्यांनीही पोलिसांनी मारहाण करून बळजोरीने खोटा जबाब लिहून घेतल्याचे पत्रकारांना सांगितले होते. त्यामुळे या जबाबात समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा यांच्या संदर्भात केलेले सर्व दावे खोटे असल्याचे सिद्ध होते, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले.

बेंगळूरू येथील प्रेस क्लबमध्ये हिंदु जनजागृती समितीने १२ जून या दिवशी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर बोलत होते. या वेळी श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक, तसेच ‘व्हॉइस ऑफ जस्टिसेस’ या संघटनेचे अध्यक्ष आणि बेंगळूरू उच्च न्यायालयाचे अधिवक्ता अमृतेश एन्.पी. आणि समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ता श्री. मोहन गौडा उपस्थित होते.

मोहन गौडा यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचे खंडण

‘हिंदु जनजागृती समितीचे श्री. मोहन गौडा यांनी गौरी लंकेश हत्या प्रकरणातील एक आरोपी असणारा प्रवीण याची नवीन कुमार यांच्याशी ओळख करून दिली होती’, हा अत्यंत चुकीचा आणि खोटा आरोप आहे. या खोट्या आरोपांना खोडून काढत श्री. मोहन गौडा यांनी पत्रकार परिषदेत ‘नवीनकुमार यांनी आरोप केल्याप्रमाणे सदर प्रकरणात आपला सहभाग आहे का’, यासंदर्भात स्वत:ची ‘नार्को’ चाचणी करून घेण्याची सिद्धता दर्शवली; मात्र त्याच वेळी

१. प्रखर हिंदुत्वनिष्ठ लेखक श्री. रोहित चक्रतीर्थ यांच्या हत्येची सुपारी देण्याचा आरोप असलेला दिनेश अम्मीन मट्टू यांची ‘नार्को चाचणी’ घेण्यात यावी.

२. या समवेतच महाराष्ट्रातील कोरेगाव भीमा दंगलीत सहभाग असल्याचा आणि पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट रचण्याचा आरोप असलेला जिग्नेश मेवाणी यांचीही ‘नार्को चाचणी’ घेण्यात यावी, असे सांगितले.

गौरी लंकेश हत्या प्रकरणाचे अन्वेषण हे योग्य पद्धतीने आणि प्रामाणिकपणे व्हायला हवे. महाराष्ट्रातील दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्यांच्या अन्वेषणांत ज्याप्रकारे त्यांच्या संघटनांमधील घोटाळ्यांचा तपास करण्यातच आला नाही, तसे गौरी लंकेश हत्या प्रकरणात व्हायला नको. कोणत्याही राजनैतिक दबावाखाली न येता एका स्वच्छ अन्वेषण व्हावे, असे आवाहन श्री. गौडा यांनी या वेळी केले.

भगव्या आतंकवादाचा बागुलबुवा करण्याचा प्रयत्न ! – प्रमोद मुतालिक

भगव्या आतंकवादाचा बागुलबुवा करण्यासाठीच सनातन संस्थेच्या निर्दोष साधकांना ठाणे बॉम्बस्फोटात बळी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याप्रमाणेच साध्वी प्रज्ञासिंह यांनाही मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात गोवण्यात आले. काँग्रेसचे हे षड्यंत्र नंतर जनतेसमोर आलेच ! अशाप्रकारेच कुभांड रचून मंगळुरु पब आक्रमणामध्ये मलाही गोवण्यात आले होते. शेवटी माननीय न्यायालयाने मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना निर्दोष घोषित केले. दोन दिवसांपूर्वी विजयपूर जिल्ह्यातील  सिंधगी येथील दोन हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले; परंतु आजपर्यंत त्याची पोलीस ठाण्यात अधिकृत नोंद करण्यात आलेली नाही, तसेच याविषयी त्यांच्या कुटुंबियांना कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांचे अपहरण केले कि त्यांची हत्या केली, हे कळत नाही. ही तपासाची कुठली पद्धत ? अशाप्रकारे आज कोणीही काहीही करू शकते का ?

गौरी लंकेश हत्या प्रकरणाचे नक्षलवादाच्या दृष्टीनेही अन्वेषण होणे आवश्यक ! – अधिवक्ता अमृतेश एन्.पी.

गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाने डाव्यांचा दबाव आणि मतपेटी यांमुळे तूर्तास एक आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. यंत्रणांनी असे करून गौरी लंकेश यांची दुसर्‍यांदा हत्या केली. या प्रकरणात योग्यरित्या अन्वेषण झालेले नाही. आज अटक केलेले सर्वच निर्दोष आरोपी उद्या निरपराधी म्हणून बाहेर येतील. आम्ही आधीपासून सांगत आहोत की, या प्रकरणाचे अन्वेषण नक्षलवादाच्या दृष्टीनेही व्हायला हवे. या प्रकरणी अन्य कोणत्याही हिंदु संघटनांवर असे आरोप झाले असते, तर एखादा पक्ष त्यांच्या बाजूने पुढे आला असता; पण सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती हे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याने त्यांच्यावर ‘सॉफ्ट टार्गेट’ म्हणून आरोप करण्यात येत आहेत. याचसमवेत सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात कर्नाटक पोलीस अपयशी ठरले आहेत. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपींच्या संविधानिक अधिकारांची पायमल्ली केली जात आहे. २६/११ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात अटक झालेल्या पाकिस्तानच्या आतंकवाद्यास कायदेशीर साहाय्य देण्यात आले, मग गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपींना ते नाकारले जाणे, हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे का ?, असा प्रश्‍नही अधिवक्ता अमृतेश यांनी या वेळी उपस्थित केला.

गुजरात येथील ‘डायरेक्टोरेट ऑफ फॉरेन्सिक सायन्स’ या संस्थेने नवीन कुमार यांच्या केलेल्या ‘पॉलिग्राफ टेस्ट’च्या अहवालातील धक्कादायक गोष्टी

१. श्री. नवीन कुमार यांची गौरी लंकेश यांच्याशी प्रत्यक्ष ओळख नव्हती. गौरी या पत्रकार आहेत, एवढेच नवीन यांना ठाऊक होते. श्री. नवीन कुमार यांना गौरी लंकेश यांच्या घराचा पत्ताही माहिती नाही.

२. जिज्ञासेपोटी त्यांनी गौरी यांचे लिखाण वाचले होते. गौरी यांच्या हत्येनंतर त्यांच्या प्रकरणात श्री. नवीन यांनी रुची घेतली.

३. श्री. नवीन यांचा पोलिसांवर विश्‍वास नाही, तसेच ते मानसिक दबावाखाली आहेत. त्यांनी गौरी लंकेश यांच्याविषयी कधीच कोणाशी संभाषण केलेले नाही.

४. श्री. नवीन यांना के.एस्. भगवान या मैसूरूच्या लेखकाविषयी ठाऊक आहे. त्यांनी भगवान यांची पुस्तके वाचलेली नाहीत, तसेच त्यांना मारण्याचा श्री. नवीन कुमार यांचा विचार नव्हता.

५. श्री. नवीन कुमार यांना भेटलेले आरोपी प्रवीण हे संभाजी ब्रिगेड या संघटनेचे आहेत.

सदर अहवालात वरील सर्व गोष्टी स्पष्ट म्हटलेल्या आहेत. तरी पोलीस हा अहवाल जाणीवपूर्वक दाबून हिंदु जनजागृती समितीची मानहानी करत आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now