हिंदुत्वरक्षणासाठी पू. भिडेगुरुजी हे सध्याच्या युगातील बाजीप्रभू देशपांडे ! – उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

हिंदुत्वाचे रक्षण करणार्‍यांच्या पाठीशी नेहमी शिवसेनाच उभी रहात असल्यानेच हिंदूंना शिवसेनेचा आदर वाटतो !

मुंबई – पू. भिडेगुरुजी यांच्याविषयी आम्हाला कमालीचा आदर आहे. हिंदुत्वासाठी त्यांची अखंड धडपड चालू असते. हिंदुत्व, छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी कुणाची जीभ घसरलीच, तर त्यांचा समाचार घेण्यासाठी पू. भिडेगुरुजी उसळून उभे रहातात. त्या अर्थाने ते शिवसेनाप्रमुखांचे धारकरी आहेत. हिंदुत्वरक्षणासाठी पू. भिडेगुरुजी म्हणजे सध्याच्या युगातील बाजीप्रभू देशपांडेच आहेत, असे गौरवोद्गार शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी १२ जून या दिवशीच्या दैनिक सामनामधील अग्रलेखामधून व्यक्त केले आहेत. यामध्ये त्यांनी ‘आम्ही सदैव त्यांच्या समवेत आहोत’, असे आश्‍वासनही दिले आहे. नाशिक येथे २ दिवसांपूर्वी झालेल्या सभेत पू. भिडेगुरुजी यांच्या वक्तव्याविषयी प्रसिद्धमाध्यमांनी चुकीचे वृत्त देऊन त्यांची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न केला. या पार्श्‍वभूमीवर ‘सामना’तील अग्रलेखातून पू. भिडेगुरुजी यांची प्रखर राष्ट्रभक्ती मांडण्यात आली आहे.

अग्रलेखात श्री. ठाकरे यांनी म्हटले आहे की,

१. पू. भिडेगुरुजी यांची जिद्द, हिंमत वाखाणण्यासारखी आहे. त्यांचा कणा ताठ आणि बाणा अफाट आहे. त्यांच्या वाणीला तलवारीची धार आहे. त्याच तलवारीच्या धारेवरून त्यांचा प्रवास चालू असतो. ते प्रखर हिंदुत्वनिष्ठ आहेत. सारे आयुष्य त्यांनी हिंदुत्व आणि शिवराय यांच्या कारणी लावले. सातारा, सांगली, कोल्हापूर भागांतील तरुणांना प्रेरणा देऊन त्यांचे संघटन केले.

२. रायगडावर शिवप्रतिष्ठानच्या वतीने सुवर्ण सिंहासन उभारले जाईल. त्या सिंहासनाच्या रक्षणासाठी हाती तलवार घेण्याचे आवाहनही त्यांनी तरुणांना केले. यासाठी २ सहस्र धारकर्‍यांची सेना सिद्ध आणि ती सशस्त्र राहील, अशी एकंदरीत योजना दिसते.

३. शत्रूंच्या हातात मात्र तलवारी नसून बंदुका आणि बॉम्ब आहेत, हेही लक्षात घ्यायला हवे. कसाब आणि त्याची पाकिस्तानी टोळी मुंबईवर चाल करून आली, ती हातात तलवार घेऊन नव्हे, तर एके-४७ आणि बॉम्ब यांचा मारा करत हे नराधम मुंबईत घुसले होते. या सगळ्याचा विचार करूनच पू. भिडेगुरुजी यांना त्यांची तलवारबंद फौज उभी करावी लागेल.

४. अशी जय्यत सिद्धता त्यांना करावीशी वाटत आहे, म्हणजेच कोणत्या तरी संकटाची जाणीव त्यांना अस्वस्थ करत आहे. जरी भिडेगुरुजी यांना धर्मांध आतंकवाद्यांच्या विरुद्ध लढायचे असले, तरीही तलवारीचा उपाय चालणार नाही. काश्मिरातील फुटीरतावाद्यांकडे आमच्या सैन्यासारखाच शस्त्रसाठा आहे. त्यांच्याकडे बंदुका, रॉकेट लाँचर्स, बॉम्ब आहेत. त्यांचा उपयोग ते आपल्याविरुद्ध करत आहेत. या सगळ्यांंशी तलवारीचे युद्ध होऊ शकेल काय ? काश्मीरमधील अतिरेक्यांशी लढण्यासाठी हिंदु तरुणांना हाती ‘एके-४७’ घ्याव्या लागतील, असे शिवसेनाप्रमुखांनी ठणकावले होते.