पुणे येथील सनातनचे साधक श्री. सुरेंद्र वाटवे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्री. सुरेंद्र वाटवे (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना ६६ टक्के पातळीचे श्री. विश्‍वास नाईक

पुणे, १२ जून (वार्ता.) – नम्र, अंतर्मुख आणि सेवेची तीव्र तळमळ असणारे कोथरूड (पुणे) येथील सनातनचे साधक श्री. सुरेंद्र वाटवे (वय ६७ वर्षे) हे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले. १० जून या दिवशी कोथरूड येथे झालेल्या एका सत्संगात ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा पाठक यांनी ही आनंददायी घोषणा केली. ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विश्‍वास नाईक यांनी श्रीकृष्णाचे चित्र भेट देऊन श्री. सुरेंद्र वाटवे यांचा सत्कार केला.

सनातनमध्ये आल्यानंतर आयुष्यात चांगला पालट झाला ! – सुरेंद्र वाटवे

या वेळी श्री. वाटवेकाका यांची भावजागृती झाली. ते म्हणाले, ‘‘काही दिवसांपूर्वीच पू. प्रदीप खेमका यांच्या संतपदापर्यंतचा प्रवास वाचला, तेव्हा ‘आपण साधनेत पुष्कळ अल्प आहोत’, असे जाणवले. अनेक संतांनी साधनेविषयी सांगितले आहे; पण सनातनमध्ये जितकी स्पष्टपणे साधना सांगितली जाते, ती अन्य कुठेही सांगितली जात नाही. सनातनमध्ये आल्यानंतर आयुष्यात चांगला पालट झाला. प.पू. गुरुदेवांनी हा क्षण माझ्या आयुष्यात दिला, याविषयी मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे. अजून मला पुष्कळ साधना करायची आहे आणि गुरुचरणी जागा मिळवण्यास पात्र व्हायचे आहे. काही वर्षांपासून मला डोळ्यांचा त्रास होत असून बरेच उपचार आणि शस्त्रकर्मे होऊनही त्रास व्हायचा; परंतु गेल्या दोन वर्षांत एकदाही आधुनिक वैद्यांकडे जावे लागले नाही, हे साधनेमुळेच घडू शकते.’’