मेघालयातील हिंसाचार !

संपादकीय

काही दिवसांपूर्वी मेघालयची राजधानी असलेले शिलाँग शहर जळत होते. निमित्त होते दोन समुदायांमधील हाणामारीचे ! शिलाँग येथे एक वस्ती शीख समुदायाची आहे. तेथे हे शीख अनेक दशके रहात आहेत. त्यांच्या काही पिढ्याही तेथेच जन्मल्या आहेत. तेथील बहुतांश शीख हे मागासवर्गीय आहेत. स्थानिक खासी नावाचा आदिवासी समुदाय मेघालयमध्ये बहुसंख्य आहे. त्यांच्या दृष्टीने हे शीख तेथील घुसखोर आहेत. ‘त्यांच्यामुळे आमच्या पोटापाण्यावर पाय येतो’, असे या खासी आदिवासींचे म्हणणे आहे. त्यांमुळे त्यांच्यात तणाव होताच. त्यातच एक क्षुल्लक घटना घडली आणि त्यावरून शीख तरुण आणि आदिवासी यांच्यात वादावादी झाली. तिचे पर्यवसान हिंसाचारात झाले आणि शिलाँग परिसरात ते पसरले. अनेक दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली, अनेकांवर आक्रमणे झाली, पोलिसांवर दगडफेक झाली. यामध्ये ‘गुरुद्वारांवर आक्रमणे झाली, मायभगिनींचा अपमान झाला’ अशा काही अफवाही पसरवल्या गेल्याचे माध्यमांचे म्हणणे आहे. परिणामी शिलाँग येथे काही दिवस संचारबंदी लागू करण्यात आली होती. सैन्याचे संचलन झाले आणि काही रहिवाशांना सैन्याच्या तळावर आश्रयाला जावे लागले. तसेच शीखांवरील आक्रमणांमुळे पंजाबमधील काही आमदारांना शिलाँग येथे शिष्टमंडळ घेऊन जावे लागले.

मेघालयात खासी आदिवासी आणि अन्य समाज (बिगर आदिवासी) यांच्यात धुसफुस चालू असते आणि तीही विशेषत: हिंदूंच्या दिवाळी आणि कालीपूजा या उत्सवांच्या वेळी. ‘बिगर आदिवासींच्या उत्सवांच्या मंडपांवर खासी समुदायाकडून आक्रमणे होतात, पेट्रोल बॉम्ब फेकले जातात’, असे हिंदूंचे म्हणणे आहे. तसेच त्यांच्या उद्योगधंद्यांनाही लक्ष्य केले जाते. वर्ष १९८६ मध्ये खासी आदिवासी विद्यार्थी संघटनेने परप्रांतियांच्या विरोधात निदर्शने केली. त्यामुळे ७५ सहस्र नेपाळींना त्याचा फटका बसला, जे पूर्वापार येथेच रहात होते. केवळ नेपाळीच नाही, तर बंगाली, बिहारी, मारवाडी यांनासुद्धा लक्ष्य केले जाते.

हिंसाचाराची कारणे

आसाममधून वर्ष १९७२ मध्ये काही प्रदेश विलग करून बनवण्यात आलेल्या मेघालय राज्यामध्ये प्रचंड राजनैतिक अस्थिरता आहे. कोणतेही सरकार जेमतेम दीड वर्षे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकते. त्याचा परिणाम राज्याच्या व्यवस्थेवर होतो. पंथांच्या दृष्टीने पाहिले, तर मेघालय येथे ७५ प्रतिशत लोकसंख्या ही ख्रिस्ती आहे. त्यातही खासी समुदायातील ८० प्रतिशत लोकसंख्या ख्रिस्ती आहे. हेसुद्धा तेथील अल्पसंख्य हिंदु समुदायांवर आक्रमणे होण्याचे कारण असल्याचे म्हटले जाते. मेघालयसह ईशान्येकडील सात राज्ये ही ‘सेवन सिस्टर’ म्हणून ओळखली जातात. या राज्यांच्या सीमा चीन, बांगलादेश इत्यादी देशांना लागून आहेत. त्यांचे विशेषत: चीनचे या प्रदेशांवर सतत लक्ष असते. या सर्व अस्थिरतेमागे चीनच्या कारवायाही असू शकतात. प्रसारमाध्यमे मात्र या प्रकरणी आणखी एक वेगळा सूर आळवतांना दिसतात. मेघालय येथे पूर्वी काँग्रेसचे सरकार होते. तेथे गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला अधिक जागा मिळूनही स्थानिक पक्ष ‘नॅशनल पीपल्स पार्टी’ने भाजपशी युती करून त्यांचे सरकार स्थापन केले; मात्र नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचाच विजय झाल्यामुळे या दंगलीला त्याची किनार लाभली.

या हिंसाचाराला कोणतेही कारण असले, तरी त्यामधून देशात सध्या सार्वत्रिक दिसणारी अस्थिरताच पुन्हा अधोरेखित होते. जम्मू-काश्मीर हे राज्य सततच्या दगडफेकीच्या घटना आणि आतंकवादी कारवाया यांमुळे अस्थिर आहे. बंगालमध्ये धर्मांधांकडून हिंदूंविरोधी हिंसाचार सातत्याने उफाळून येत आहे. कर्नाटक आणि तमीळनाडू या राज्यांमध्ये कावेरी पाणीवाटपावरून विवाद चालू आहे, तर कर्नाटक अन् गोवा राज्यांमध्ये म्हादई नदीच्या पाणीवाटपामुळे तणाव आहे. ओडिशा आणि छत्तीसगड या राज्यांमध्येही असाच तणाव आहे. आसाम हे राज्य रोहिंग्या मुसलमानांच्या समस्येमुळे आक्रमक झाले आहे, तर महाराष्ट्रात शेतकरी आंदोलनाचा भडका उडाला आहे. अशा प्रकारे प्रत्येक राज्यात काही ना काही समस्या चालू आहेत. ‘ही स्थिती म्हणजे अराजकाला प्रारंभ आहे’, असे म्हणावे लागेल.

भारतासारख्या विकसनशील देशात परप्रांतीय वाद, साधनसंपत्तीचे वाटप असो किंवा घुसखोरीचा प्रश्‍न असो, त्यामध्ये नागरिकांमध्ये राष्ट्रीय अस्मिता, राष्ट्रप्रेम यांचा अभाव हे मूलभूत कारण दिसते. आपल्याच देशातील नागरिकांना देशातीलच काही राज्यांमध्ये कामानिमित्त जावे लागल्यास त्याकडे परका म्हणून पहाण्यात येते. ज्या राज्यांमधून त्याला स्थलांतरित व्हावे लागले, तेथील राज्याचेही नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे दायित्व अधिक आहे; मात्र त्याला ज्या राज्यात स्थलांतरित व्हावे लागते, तेथील स्थानिक नागरिकांच्या नागरी सुविधांना अडचण येणार नाही, हीच काळजी संबंधित राज्याने घेणे आवश्यक आहे. अशा वेळी प्रादेशिक अस्मितेच्या ऐवजी एक भारतीय म्हणून स्थलांतरितांकडे पाहिल्यास बरेच प्रश्‍न सुटू शकतात. त्यासाठी आपापसांत समन्वय हवा; मात्र जेथे शेजारी देशांतून होणार्‍या घुसखोरीचा प्रश्‍न असेल, तेथे सर्व राज्यांनी एक भूमिका घेऊन त्यांना कोणत्याही परिस्थितीत राज्यांमध्ये आश्रय न देण्याची भूमिका घेतली पाहिजे, तरच राष्ट्रीय अस्मिता जपली जाऊ शकेल.

राज्य अथवा प्रांतीय अस्मिता, भाषिक अस्मिता असण्यात चूक असे काहीच नाही; मात्र त्याला मर्यादा हव्यात. आपल्या या अस्मितेमुळे देशातील कोणत्याही नागरिकाला त्रास होणार नाही वा कुठली अडचण येणार नाही, याविषयी नागरिकांनी दक्ष असायला हवे. इतर प्रांतातून संबंधित राज्यात जाणार्‍या नागरिकांनीही तेथील प्रांतीय संस्कृती अणि भाषा आत्मसात करणे आवश्यक आहे. असे करण्यासमवेत नागरिकांनी राष्ट्रीय अस्मितेला प्राधान्य दिल्यास भारतासारख्या बहुभाषिक आणि बहु संस्कृती असलेल्या देशात एकता टिकून राहील. तसेच येथील अल्पसंख्यांक समुदायांनीही बहुसंख्यांकांच्या अर्थात हिंदु धर्माचा आदर ठेवणेही क्रमप्राप्त आहे !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now