आतंकवादी कारवाया करणार्‍या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घाला ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

‘टाइम्स नाऊ’ वृत्तवाहिनीच्या वार्ताहराने हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांची मुलाखत घेतली. त्या वेळी झालेला वार्तालाप येथे देत आहे…

हिंदूंच्या धर्मभावनांचा आदर करून भाजप सरकारने राममंदिराची निर्मिती करावी !

प्रश्‍न : राममंदिराच्या निर्माणाविषयी हिंदु जनजागृती समितीची काय भूमिका आहे ?

उत्तर : अयोध्या येथे रामजन्मभूमीवर राममंदिराचे निर्माण हे काही केवळ राजकीय सूत्र नाही. देशभरातील हिंदूंच्या आस्थेचा तो विषय आहे. रथयात्रा काढून, घोषणापत्रात आश्‍वासन देऊन भाजपने हिंदूंच्या धार्मिक भावना जागृत केल्या. आता बहुमताने सत्तेत येऊन चार वर्षे झाली, तरी अद्याप राममंदिराचे निर्माण झालेले नाही. याचा अर्थ भाजप सरकार हिंदूंच्या भावनांचा आदर ठेवत नाही, असे होते. असे असले, तरी अद्याप एक वर्षाचा कार्यकाळ आहे. त्या काळात हिंदूंच्या धर्मभावनांचा आदर करून राममंदिराचे निर्माण करून भाजपने आश्‍वासनपूर्ती करावी. तसे झाले नाही, तर त्याचे काय परिणाम होतील, ते समोर येईल. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये जनतेने त्यांच्या मनातील भावना दाखवून दिल्या आहेत. भाजपने या सगळ्यांचा विचार करून आश्‍वासनपूर्ती करावी, ही अपेक्षा !

‘पी.एफ्.आय.’च्या कारवाया देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने घातक !

प्रश्‍न : ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’विषयी हिंदु जनजागृती समितीची काय भूमिका आहे ?

उत्तर : ‘पी.एफ्.आय.’ ने गोव्यातही प्रवेश केला आहे. ‘६ डिसेंबर’ हा काळा दिवस पाळण्यात यावा; म्हणून या संघटनेने गोव्यात जागोजागी भित्तीपत्रके लावली होती. उघडपणे अशी पत्रके लावली जात असतांना त्याविषयी माहिती घेतली जात नाही, हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे. या संघटनेचे एक राजकीय रूप समोर येत असले, तरी प्रत्यक्षात या संघटनेच्या कारवाया छुप्या पद्धतीने चालू आहेत. या संघटनेच्या कार्यशाळा जंगलामध्ये घेतल्या जातात. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर बंदी आली पाहिजे, अशी समितीची स्पष्ट भूमिका आहे.


Multi Language |Offline reading | PDF