शिबिरातील वैद्यांसारखा सेवाभाव सर्व ठिकाणी पसरवायचा आहे ! – श्रीपाद नाईक, केंद्रीय आयुषमंत्री

आयुर्वेदीय न्यूरो थेरपी वैद्यकीय शिबिराची सांगता

डावीकडून डॉ. वेणू शर्मा आणि डॉ. मनोज शर्मा यांचा सत्कार करतांना आयुषमंत्री श्रीपाद नाईक
सनातनच्या साधिका सौ. अक्षता रेडकर यांचा सत्कार करतांना आयुषमंत्री श्रीपाद नाईक (उजवीकडे) मध्यभागी डॉ. अविनाश धाकणकर, तसेच डॉ. वेणू आणि डॉ. मनोज शर्मा

पणजी, २६ मे (वार्ता.) – शस्त्रकर्म करून ज्या व्याधी बर्‍या होत नाहीत. त्या या थेरपीमुळे बर्‍या होत आहेत. समाजात शस्त्रकर्माद्वारे बर्‍या न होणार्‍या व्याधी असलेल्या लोकांची संख्या ८० टक्के आहे. लाखो रुपये देऊन जे होत नाही, ते या वैद्यांनी या थेरपीद्वारे केले. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. कोणत्या उपचारांमुळे नागरिकांना चांगले वाटते, याविषयी आयुष मंत्रालय विचार करत असते. असे शिबीर अनेक ठिकाणी भरवायचे आहे. शिबिरातील वैद्यांनी ज्या निस्वार्थी भावाने येथे सेवा केली, तोच सेवाभाव सर्व ठिकाणी पसरवायचा आहे, असे प्रतिपादन आयुषमंत्री डॉ. श्रीपाद नाईक यांनी केले. गोवा वेल्हा येथे २१ मे या दिवशी चालू झालेल्या आयुर्वेदीय न्यूरो थेरपी या वैद्यकीय शिबिराची २६ मे या दिवशी सांगता झाली. या वेळी केंद्रीय आयुषमंत्री श्री. श्रीपाद नाईक, या थेरपीचे मुख्य डॉ. मनोज शर्मा, डॉ. वेणू शर्मा, स्थानिक डॉ. अविनाश धाकणकर, डॉ. तन्मय गोस्वामी, गोवा विद्यापिठाचे

प्रा. रामराव वाघ आणि फादर आग्नेल महाविद्यालयाचे प्राचार्य फादर फ्रेड्रिक रॉड्रीग्स आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. मनोज शर्मा म्हणाले की, या शिबिराचे आयोजन केल्याविषयी मी आभार व्यक्त करतो. आम्ही बोलत नाही, केवळ काम करतो. मी आणि माझ्या सहकार्‍यांनी ते केले आहे. या वेळी डॉ. तन्मय गोस्वामी म्हणाले, आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्यामुळे हे शिबीर आयोजित होऊ शकले. वर्षभरात जेवढे रुग्ण उपचारांसाठी येतात, तेवढे शिबिराच्या ५ दिवसांच्या कालावधीत आले. हा प्रतिसाद पहाता गोव्यात लवकरच राष्ट्रीय आयुर्वेदीय शिक्षणसंस्था आणि राष्ट्रीय योग शिक्षणसंस्था चालू होतील.

गोवा राज्यात झालेल्या या शिबिरात ५ दिवसांत ४ सहस्रांहून अधिक रुग्णांनी उपचारांचा लाभ करून घेतला. या शिबिराच्या वेळी स्वयंसेवक म्हणून सहभागी झाल्याविषयी सनातनच्या साधिका आणि फिजियोथेरपिस्ट सौ. अक्षता रेडकर यांचा आयुषमंत्री श्री. श्रीपाद नाईक यांनी सत्कार केला. तसेच शिबिराच्या वेळी स्वयंसेवक म्हणून उपस्थित असलेल्या सनातनच्या वैद्या (कु.) अपर्णा महांगडे, सौ. वृंदा मराठे, सौ. गौरी चौधरी आणि कु. वैदेही शिंदे यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला.


Multi Language |Offline reading | PDF