इंग्रजी भाषेचा ‘अट्टाहास’ आणि मराठी भाषेचा ‘र्‍हास’ !

सरकारी कार्यालयांतून ‘मराठी’ भाषेची उपेक्षा होत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या ‘मराठी भाषा विभागा’ने सरकारी कार्यालयांतून मराठी भाषेचा उपयोग अनिवार्य करण्याविषयी आदेश दिला आहे. असा आदेश द्यावा लागणे, हेच अत्यंत दुर्दैवी आहे. यावरून सरकारी कार्यालयांतून मराठी भाषेचा उपयोग किती अत्यल्प प्रमाणावर होत आहे, हे लक्षात येते.  मराठी भाषा विभागाने आदेश दिला आहे, तरीही त्यानंतर त्याचे पालन किती प्रमाणात होईल, याची निश्‍चिती कुणीच देऊ शकत नाही; कारण आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी नियम असले, तरी त्यांच्या काटेकोर कार्यवाहीविषयी साशंकता असल्याने दात नसलेल्या वाघासारखी नियमांची स्थिती आहे.

मातृभाषेवरची पकड ही भक्कमच असायला पाहिजे. त्या ऐवजी इंग्रजी भाषेवरची पकड घट्ट आहे. लहान मुलांशी कित्येक उच्च मध्यमवर्गीय मराठीजन इंग्रजीतूनच बोलतात. त्यांच्यावर लहानपणापासूनच इंग्रजीचा मारा करून, त्यांची मातृभाषेपासून नाळ तोडण्याचे दुष्कर्म करतात. त्यामुळे त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, अहल्याबाई होळकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक आदी थोर विभूती यांविषयी माहिती होत नाही, तसेच जन्माने मराठी असूनही त्यांच्यावर इंग्रजी भाषेचाच मारा झाल्याने त्याच भाषेचे संस्कार, त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसू लागतात. यास्तवच बहुतांश स्त्रियांच्या कपाळावर कुंकू, टिकली आणि पुरुषांच्या कपाळावर ‘तिलक’ दिसेनासे झाले आहेत, असे नि:संशयपणे म्हणता येईल. पेहरावाविषयीही काय स्थिती आहे, हे वेगळेपणे नमूद करण्याची आवश्यकताच नाही. एका परकीय भाषेसमवेत कोणकोणत्या गोष्टी येतात आणि त्यामुळे भाषा, समाज, संस्कृती यांना कशा प्रकारे धक्का लागतो, याची ठळकपणे जाणीव होते.

राज्यातील ५० लाख विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे विशेष धडे देण्यासाठी ‘ब्रिटीश काऊन्सिल’ने पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत ३० सहस्र शिक्षकांनाही इंग्रजी भाषेचे शिक्षण दिले जाणार आहे. याविषयी काऊन्सिलचे संचालक अ‍ॅलन गेम्मेल आणि राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. नोकरी, व्यवसाय, शिक्षण यांसाठी इंग्रजी शिकून आपापल्या क्षेत्रात स्थिरस्थावर झाल्यावरही ज्या मातृभाषेमुळे आजमितीस समृद्ध जीवन व्यतीत करत आहोत तिच्याविषयी कृतज्ञ रहाण्यासाठी या मंडळींकडून प्रयत्न होतांना दिसत नाही. लाखो विद्यार्थी, सहस्रो शिक्षक उद्या इंग्रजी भाषेत पारंगत होतील; पण मराठी भाषेचा प्रसार, संवर्धन यांविषयी कुणीही चकार शब्दही बोलायला सिद्ध नाही. अशा स्थितीत मराठी भाषेला जिवंत ठेवण्यासाठी निकराचा वैचारिक लढा लढणे अनिवार्य आहे.

– श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई


Multi Language |Offline reading | PDF