औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यापूर्वी भूमीसंदर्भातील लक्षात घ्यावयाची महत्त्वाची सूत्रे

१. लागवडीसाठी भूमी निवडतांना पुढे लावण्यात येणार्‍या झाडांच्या मुळांची होणारी वाढ आणि भूमीचे विविध थर यांचा अभ्यास करणे आवश्यक असणे

‘भूमी, हवामान आणि पीक व्यवस्थापन यांवर झाडांची वाढ अवलंबून असते. औषधी वनस्पतींच्या लागवडीचे योग्य व्यवस्थापन केल्यास लागवड जास्त फलदायी ठरते. बहुसंख्य झाडांची मुळे भूमीत खोलवर जाणारी असतात. मुळे खोलवर जात असतांना ती भूमीच्या विविध थरांतून जात असतात. औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी भूमीची निवड करतांना पुढे लावण्यात येणार्‍या वनस्पतींच्या मुळांची होणारी वाढ आणि भूमीतील विविध थर यांचा अभ्यास करणे आवश्यक असते.

२. भूमीचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म

एखाद्या वेळेस जी भूमी धान्यपिकासाठी उत्कृष्ट असते, तीच भूमी या वनस्पतींच्या वाढीसाठी अयोग्य ठरू शकते.

२ अ. भूमीचे भौतिक गुणधर्म : मातीचा रंग तिचे गुणधर्म दर्शवतो. रंगशास्त्रात तांबडा, पिवळा आणि निळा हे मूलभूत रंग असून त्यांच्या एकमेकांतील न्यूनाधिक मिश्रणाने अनेक रंगछटा निर्माण होतात. भूमी कोणत्या प्रकारच्या खडकापासून निर्माण झाली आहे आणि तिच्यात कोणती खनिजे आहेत, यांवर मातीचा रंग अवलंबून असतो.

२ आ. भूमीतील खनिजे आणि त्यांमुळे भूमीला प्राप्त होणारा रंग : बहुसंख्य खनिजे, उदा. क्वार्ट्झ, फेेेल्डस्पार ही फिकट रंगाची असतात. लोह, मँगनीज यांसारख्या मूलद्रव्यांमुळे मातीला रंग येतो. तांबडा रंग फेरिक रसायन आणि भरपूर खेळती हवा यांमुळे येतो. मध्यम खेळत्या हवेमुळे भूमीला पिवळसर रंग येतो. खेळत्या हवेत अडथळे असल्यास हिरव्या रंगाचे फेरस द्रव्य आढळते. मँगनीज आणि सेंद्रिय पदार्थ यांमुळे भूमीला गर्द काळा रंग येतो. रंगाच्या गर्दपणावरून भूमीतील सेंद्रिय पदाथर्माच्या प्रमाणाचे अनुमान लावता येते, तसेच भूमीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता, तापमान इत्यादी गुणधर्म समजण्यास साहाय्य होते.’ जेथे भूमीची धूप होते, तेथे भूमीच्या वरच्या थरांचा रंग भुरकट पांढरा किंवा करडा दिसतो. ज्या भूमीत लवणांचे प्रमाण अधिक, तेथे तिचा रंग पांढरट भुरकट दिसतो. भूमीतून निचरा होत नसल्यास पृष्ठभागावरील थरांच्या आणि खालील थरांच्या रंगांत तफावत दिसते. पृष्ठभागावरील मातीचा रंग तांबडा असेल आणि खालील थरांचा रंग भुरकट पिवळसर असेल, तर तेथे पाण्याचा निचरा नीट होत नसावा, असे मानले जाते.’ (संदर्भ : मराठी विश्‍वकोश खंड १३)

३. ‘भूमीचा पोत’ म्हणजे काय ?

‘भूमीचा पोत’ म्हणजे भूमीतील वाळू (जाड आणि बारीक), गाळ आणि चिकणमाती यांचे परस्परांशी असणारे प्रमाण. या चारही प्रकारच्या मातीचे कण न्यूनाधिक प्रमाणात असतात. त्यांच्या प्रमाणावरून भूमीचा पोत ठरवतात. भूमीतील पाण्याची चलनवलन क्षमता भूमीच्या पोतावर अवलंबून असते. मातीचे कण जितके सूक्ष्म, तितके अधिक पाणी सूक्ष्म कणांतील पोकळीत साठते. भारी पोताच्या भूमीत बारीक कणांचे प्रमाण, खनिज द्रव्यांचा साठा आणि भूमीची पाणी धरून ठेवण्याची क्षमताही अधिक असते. म्हणून पिकांच्या दृष्टीने भारी भूमी सुपीक असतात. केशाकर्षणामुळे भूमीतील पाणी बर्‍याच काळापर्यंत पिकाच्या मुळांना मिळते. हलक्या पोताच्या अथवा वाळूसर भूमीत पाणी फार वेळ राहत नाही. त्यामुळे पिकास दिलेले खत निचर्‍यावाटे बाहेर पडण्याची शक्यता अधिक असते.’ – डॉ. जनार्दन कदम, वृषाली देशमुख (सोलापूर) (संदर्भ : दैनिक लोकसत्ता, २.३.२०१३)