बांगलादेशमध्ये अज्ञातांकडून श्री महाशन काली मंदिरातील मूर्तीची तोडफोड

भारतातील हिंदूंची आणि त्यांच्या श्रद्धास्थानांची सुरक्षा करू न शकणारे शासनकर्ते इस्लामी देशातील हिंदूंची आणि श्रद्धास्थानांची सुरक्षा होण्यासाठी कधी प्रयत्न करतील का ?

ढाका – बांगलादेशमधील गोपालगंज या जिल्हा मुख्यालयाच्या शहरातील श्री महाशन काली मंदिरात असलेल्या देवीच्या मूर्तीची २ बोटे ९ मेच्या रात्री अज्ञातांनी तोडली, तसेच मंदिर परिसरात तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केलेली नाही, अशी माहिती बांगलादेशमधील ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांनी दिली आहे.

१. तोडफोडीच्या आवाजामुळे मंदिराचे मुख्य पुजारी श्री. चंडीदास विश्‍वास यांनी ‘कोण आहे ?’ असे विचारले. तेव्हा त्या अज्ञातांनी पुजार्‍यास शिव्या देऊन जीवे मारण्याची धमकी दिली. दुसर्‍या दिवशी पहाटे पुजार्‍यास मूर्तीची तोडफोड झाल्याचे आढळून आले. पुजार्‍यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर गोपालगंज शहराचे महापौर काझी लियाकत अली आणि पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली.

२. घटनेची माहिती मिळताच अधिवक्ता रवींद्र घोष यांनी पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क केला. पोलिसांनी त्यांना सांगितले की, गुन्ह्याचा तपास चालू असून अद्याप आरोपींची ओळख पटलेली नाही आणि कुठलाही पुरावा मिळालेला नाही.

३. अधिवक्ता रवींद्र घोष यांनी घटनेची गंभीर नोंद घेऊन ‘आरोपींना अटक करावी आणि त्यांच्यावर कडक कारवाई करावी’, अशी मागणी केली, तसेच ‘बांगलादेशातील हिंदू मंदिरांना संरक्षण देऊन ज्या मूर्तीची तोडफोड झाली, त्या जागेवर नवीन मूर्तीची स्थापना करावी’, अशीही मागणी केली.


Multi Language |Offline reading | PDF