हिंदु आरोपींच्या बचावासाठी हिंदू एकता मंचचे आर्थिक साहाय्य करण्याचे आवाहन

कठुआ येथील कथित बलात्काराचे प्रकरण

जम्मू – कठुआ येथील एका अल्पवयीन मुलीवरील कथित सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींसाठी हिंदू एकता मंचने निधी गोळा करण्यास प्रारंभ केला आहे. ‘हिंदूंनी पुढे येऊन साहाय्य करावे’, असे आवाहन मंचने केले आहे. आरोपींना कायदेशीर लढ्यासाठी आर्थिक साहाय्य मिळावे, हा त्यामागचा उद्देश आहे, असे संघटनेने सांगितले आहे. मंचने यापूर्वीच या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

हिंदू एकता मंचचे अध्यक्ष विजय शर्मा म्हणाले की, संघटनेच्या बैठकीत लोकांना साहाय्यासाठी आवाहन करण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र अद्याप आम्हाला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. या प्रकरणातील खर्‍या आरोपींचा शोध घेण्यासाठी सीबीआय चौकशीची आवश्यकता आहे, असे आमच्या लक्षात आले आहे. मूळ आरोपींचा शोध घेऊन विनाकारण अडकवण्यात आलेल्यांची सुटका झाली पाहिजे.