वाहन चालवतांना भ्रमणभाषवर बोलणे अवैध नाही ! – केरळ उच्च न्यायालय

थिरुवनंतपुरम् – वाहन चालवतांना भ्रमणभाषवर बोलणे अवैध नाही, असे केरळ उच्च न्यायालयाने एका आदेशामध्ये म्हटले आहे. कोच्ची येथील रहिवासी संतोष एम्.जे. या व्यक्तीने प्रविष्ट केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने म्हटले की, वाहन चालवत असतांना भ्रमणभाषचा वापर करणे लोकांसाठी, तसेच सार्वजनिक संपत्तीसाठी धोक्याचे आहे, असे म्हणू शकत नाही; कारण कोणताही कायदा असे करण्यापासून रोखत नाही.

पोलिसांनी संतोष यांच्यावर वाहन चालवतांना भ्रमणभाषवर बोलत असल्याने गुन्हा नोंदवला होता. यावर न्यायालयाने सांगितले की, जोपर्यंत लोकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत नाही, तोपर्यंत तो गुन्हा मानला जाऊ शकत नाही. वर्ष १९८८ ‘मोटर वाहन अधिनियम’मध्ये नमूद करण्यात आले आहे की, जर कोणी लोकांच्या सुरक्षेला धोका बसेल, अशा पद्धतीने वाहन चालवत असेल, मग ती कोणतीही परिस्थिती असो ते दंडनीय आहे. त्यासाठी दंड ठोठावला जाऊ शकतो; मात्र यामध्ये कुठेही भ्रमणभाषच्या वापराविषयी नमूद करण्यात आलेले नाही. (वर्ष १९८८ मध्ये भ्रमणभाषचा शोध लागला नव्हता. त्यामुळे त्या वेळी तसे नमूद करणे अशक्यच आहे. त्यानंतर भ्रमणभाषचा शोध लागून त्याचा वापर चालू झाल्यावर वाहन चालवतांना भ्रमणभाषवर बोलल्याने अपघात होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यामुळेच पुढे पोलिसांनी त्यावर बंदी घातली; मात्र तसे करतांना पोलिसांनी या अधिनियमात वाहन चालवतांना भ्रमणभाषच्या वापरावर बंदी घालण्याचा समावेश केला नाही, हे लक्षात येते. पोलिसांनी आता ती चूक सुधारणे आवश्यक आहे. – संपादक)